आडाळी (दोडामार्ग) दि. ९ : विकासाची विनाशकारी संकल्पना आणि अविवेकी हाव यामुळे जीवनाचे मूलाधारच उद्ध्वस्त होत चालले आहेत. यामुळे भावी पिढ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. यासाठी निसर्ग व पर्यावरणानुकुल जीवनशैली अंगिकारणे ही आजची गरज बनली आहे, असे प्रतिपादन दापोली येथील पर्यावरण मित्र व ‘गतिमान संतुलन’ मासिकाचे संपादक दिलीप कुलकर्णी यांनी आडाळी येथे केले.
माध्यमकर्मी सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी ग्रामविकास व सामाजिक सेवेसाठी सुरु केलेल्या ‘घुंगुरकाठी’ या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे उद्घाटन व ‘घुंगुरकाठी भवन’ या वास्तुचे लोकार्पण श्री. कुलकर्णी यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे येथील लेखक व पर्यावरण पत्रकार संतोष शिंत्रे उपस्थित होते. व्यासपीठावर ’घुंगुरकाठी’चे अध्यक्ष व संस्थापक मुख्य विश्वस्त सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, विश्वस्त नीतिन सांड्ये, गौरीश काजरेकर व सचिन माजगावकर उपस्थित होते.
सुरुवातीला दीपप्रज्वलन करुन व नामफलकाचे अनावरण करुन सोहळ्याला सुरुवात झाली. श्री. कुलकर्णी म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व विशेषत: दोडामार्ग तालुक्याच्या सामाजिक, ग्रामविकास व पर्यावरण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावण्याच्या हेतुने स्थापन झालेली ’घुंगुरकाठी’ ही अशासकीय स्वयंसेवी संस्था दिशादर्शक ठरेल. आजची नेमकी गरज ओळखुन ही संस्था सुरु झाली, हे कौतुकास्पद आहे. आजच्या परिस्थितीत गावोगाव अशा संस्थांचे जाळे पसरण्याची गरज आहे.
श्री. कुलकर्णी म्हणाले की, निसर्गाच्या साथीने समृद्ध जीवन जगणे शक्य आहे. महात्मा गांधीजी म्हणाले आहेत की, निसर्ग मानवाच्या सगळ्या गरजा पुरवायला समर्थ आहे. मात्र माणसाची अतिरेकी हाव तो पुरवु शकत नाही. दरडोई उपभोग शक्तीची वाढ ही आज विकासाची संकल्पना बनली आहे. ती पूर्णत: चुकीची आहे. यामुळे उपभोगवादी समाज आणि अविचारी उपभोग वाढत आहे. यामुळे निसर्गाचे शोषण प्रचंड प्रमाणात होत आहे. उपभोग घेणे चुकीचे नाही, पण त्याच्या मर्यादा ओळखायला हव्यात. भारतीय सण निसर्गाच्या जतनाचा संदेश देतात. भारतीय संस्कृती त्यागावर आधारलेली असली तरी ती उपभोग नाकारणारी नाही, मात्र उपभोगवाद नाकारणारी आहे. मात्र चुकीच्या संकल्पना आणि हाव यामुळे आपण निसर्गाचे दोहन न करता त्याचे शोषण करीत आहोत. हे सर्व टाळून निसर्गाचे जतन करीत पर्यावरणस्नेही जीवनशैली जोपासण्याची नितांत गरज आहे.
निसर्ग संपदेचे जतन व्हावे: शिंत्रे
निसर्ग आणि पर्यावरण याची हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ती याच गतीने होत राहिली तर अगदी नजिकच्या भष्यिकाळात पृथ्वी ही सजीवांच्या जगण्यालायक राहणार नाही, अशी भीती श्री. संतोष शिंत्रे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, मानव हासुद्धा निसर्गाचाच घटक आहे. त्याचे आणि सर्व सजीवांचे जीवन निसर्गावर आधारित आहे. मात्र प्रत्येक गोष्टीतील अतिरेकामुळे निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता धोक्यात आली आहे. गेल्या काही वर्षात आपली जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. अविचार, अविवेक आणि अतिरेक वाढला आहे. धोक्याची घंटा केव्हाच वाजली आहे. पण आपले कान बहिरे झाले आहेत. हा विनाश टाळण्यासाठी सर्वांनी विवेकाने वागून निसर्गावरचा ताण कमी केला पाहिजे.
सामाजिक कृतज्ञतेसाठी संस्था: लळीत
निवृत्तीनंतर मुंबई –पुण्यात स्थायिक न होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थायिक होण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला व सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचे ठरविले. त्यानुसार या संस्थेची स्थापना केली आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘रयतेचे राज्य’ या संकल्पनेनुसार आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशानुसार ग्रामीण भागातील सर्व स्तरातील, सर्व जातीधर्माच्या सर्वसामान्य नागरिकांच्या उत्थानासाठी ही संस्था कार्य करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यप्राणीसंपदा, पर्यावरण, सह्याद्री (पश्चिम घाट) मधील विपुल जैवविविधता, सांस्कृतिक व सामाजिक पर्यावरण धोक्यात आले आहे. या सर्वांचे रक्षण ही आज तातडीची गरज झाली आहे. या संस्थेला हेच कार्य अभिप्रेत आहे.
विविध उपक्रम हाती घेणार: डॉ. सई लळीत
‘घुंगुरकाठी’ ही संस्था लवकरच आरोग्य शिबिरे, जलसंवर्धन, जलस्त्रोतांचे संवर्धन, प्रबोधनात्मक कार्यक्रम, प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृती, पर्यावरणस्नेही जीवन जगण्याच्या पद्धती, साहित्यिक मेळावे असे विविधांगी उपक्रम हाती घेणार आहे, असे उपाध्यक्षा डौ. सई लळीत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा संदेश पाठवून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा संदेशाचे वाचन डॉ. सई लळीत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि पश्चिम घाटातील जैवविविधता जपण्यासाठी ‘घुंगुरकाठी’ विश्वस्त संस्था मोलाचे योगदान देईल, याचा आपणास विश्वास वाटतो, असे श्री. ठाकरे यांनी संदेशात म्हटले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर, प्रविण गावकर, राजन गावकर, संदीप गावकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिक, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००