राज्य उर्जा कार्यक्षमता यादीत महाराष्ट्र अग्रेसर – ‘राज्य उर्जा कार्यक्षमता यादी-2019’ जाहीर

by Admin

नवी दिल्ली, 10 : देशातील राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांनी जनतेला प्राथमिक उर्जा पुरवठा करण्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तयार करण्यात आलेल्या ‘राज्य उर्जा कार्यक्षमता यादी-2019’ मध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य ठरले आहे.

येथील प्रवासी भारतीय भवनमध्ये आयोजित केंद्रीय उर्जा , नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाच्यावतीने मंत्रालयाच्या विविध योजना व कार्यक्रमांच्या आढावा बैठकीत केंद्रीय उर्जा , नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांच्या हस्ते आज ‘राज्य उर्जा कार्यक्षमता यादी 2019 प्रसिध्द करण्यात आली. या यादीत देशातील 8 अग्रेसर राज्य व केंद्र शासीत प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

केंद्रीय उर्जा , नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाने घालून दिलेल्या महत्वपूर्ण 97 मानकांच्या आधारे उर्जा कार्यक्षमतेबाबत देशातील36 राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांनी केलेल्या उपायोजनांचा अभ्यास करून राज्य उर्जा कार्यक्षमता यादी तयार करण्यात आली आहे. अलायंस फॉर इफिसीयंट इकोनॉमी आणि उर्जा दक्षता ब्युरो या संस्थांनी राज्य उर्जा कार्यक्षमता यादी -2019 तयार केली आहे.

राज्यात उर्जा बचत आणि उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून केलेल्या कार्यक्षम वापराची दखल या यादीत घेण्यात आली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा,केरळ,कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पुडुचेरी आणि चंडीगड या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांचा या यादीत समावेश आहे.
00000

You may also like

Leave a Comment