पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेस प्रारंभ

by Admin

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेस प्रारंभ
कोल्हापूर (प्रतिनीधी) : सुभाष रोड येथील रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंट येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, केवळ दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना शासनाने आणली आहे. शिवभोजनथाळी या महत्वाकांक्षी योजनेचा आजपासून संपूर्ण राज्यात प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 50 ठिकाणी प्रारंभ होत आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागातही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू जनतेला अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. स्वस्त दरात, स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना निश्चितपणे उपयुक्त होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली. सुभाष रोड येथील रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंट येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते आज शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे आदीसह बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज येथे महापौर वकील सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते, ताराबाई रोड येथील श्री महालक्ष्मी भक्तमंडळ येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते तसेच साईक्स एक्स्टेंशन मधील हॉटेल साईराज येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते आज शिवभोजन थाळी योजनेस प्रारंभ करण्यात आला. या ठिकाणी अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे उपस्थित होत्या.

You may also like

Leave a Comment