कोल्हापूर

जीवाणूवर आधारित मजल्यात होतेय सेंद्रीय केळीचे उत्पादन….

by संपादक

जीवाणूवर आधारित मजल्यात होतेय सेंद्रीय केळीचे उत्पादन…. महागड्या खते आणि कीटकनाशकांसाठी निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नाला जीवाणूवर आधारित केळी उत्पादनाचे उत्तर हातकणंगले तालुक्यातील मजले येथील प्रमोद आण्णा पाटील यांनी शोधले आहे. इयत्ता 12 वी नंतर प्रमोद पाटील हे घरची शेती करत आहेत. एकूण पावणेतीन एकर असणाऱ्या शेतीमध्ये त्यांनी विविध पिके घेतली आहेत. शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचासाठी त्यांनी अनुदानही घेतले आहे. या शेतीवर आधारित जनावरांचा मोठा गोठाही त्यांनी विकसित केला आहे. त्यावेळी हत्तीगवताची लागवड केली होती. वाढलेल्या कीटकनाशकांच्या किंमती आणि खतांच्या किंमतीमुळे लागवडीचा खर्च वाढत होता. या आर्थिक प्रश्नाचे उत्तर शोधताना त्यांनी जीवाणूवर आधारित शेतीकडे भर दिला. नऊ वर्षापासून ते केळीचे उत्पन्न घेत आहेत. गेल्या एक वर्षापासून असणाऱ्या त्यांच्या केळीच्या बागेत 100 टक्के जीवाणूवर आधारित ते उत्पन्न घेतात. गुळ, डोंगरात फिरणाऱ्या जनावरांचे मूत्र, शेण, मोहरी, जवस, तीळ, सूर्यफूल, लसूण, हळद, हिंग, हत्तीचे शेण, घोड्याची लीद, कोंबडीची विष्ठा आदींच्या माध्यमातून त्यांनी कीटकनाशक आणि खतांची निर्मिती केली आहे. यावर आधारित सध्या ते सेंद्रीय केळीचे उत्पन्न घेत आहेत. रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशक यांच्या बेसुमार वापराने जमिनीचा पोत तर ढासळत आहेच त्याशिवाय त्यापासून निर्माण होणारा भाजीपाला अथवा फळे हे तितकेसे मानवाला आरोग्यदायी नाहीत, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, पूर्णत: सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला भाजीपाला असेल अथवा फळे असतील याकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे. निरोगी राहण्यासाठी ग्राहक सेंद्रीय शेती उत्पादनाकडे वळलेला आहे. यामधून शेतकऱ्याला आर्थिक फायदा शिवाय ग्राहकांना आरोग्याचा फायदा होत आहे. सध्या माझ्या केळींना स्थानिक बाजारपेठ मिळाली आहे. आजू-बाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेवून पुढील वर्षी जीवाणूवर आधारित सेंद्रीय शेती उत्पादन वाढवण्याकडे आमचा प्रयत्न राहणार आहे. सेंद्रीय केळीसाठी 8600971377 वर ग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. शासनाच्या आत्माच्या माध्यमातून राष्ट्रीय फलोत्पादन योजनेमधून शीतगृहाची उभारणी केल्याचे सांगून याच गावातील अविनाश पाटील म्हणाले, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमधून शेती उत्पादने विशेषत: केळी खरेदी करून ती शीतगृहाच्या माध्यमातून गोवासारख्या राज्यात विक्रीकरिता पाठविण्यात येतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. ग्राहक आणि शेतकरी यांनी या सुविधेसाठी 9850557753 वर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गरज ही शोधाची जननी असते, या उक्तीप्रमाणे प्रमोद पाटील यांनी होणाऱ्या आर्थिक खर्चावर मात करण्यासाठी जीवाणूवर आधारित सेंद्रीय केळी उत्पादन घेण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा आणि ग्राहकांचा आरोग्य फायदा हे दोनही या मधून साधले जात आहे. – प्रशांत सातपुते – जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर


You may also like

Leave a Comment