कोल्हापूर

सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समितीला अधिकार – जिल्हाधिकारी दौलत देसाई

by संपादक

कोरोना प्रतिबंधासाठी गावपातळीवर यंत्रणा राबविणार, सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समितीला अधिकार जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर (प्रतिनिधी) कोरोना प्रतिबंधासाठी गावपातळी पासून यंत्रणा राबविण्यात येणार आहे. गावातील व्यक्तीला बाहेर जाण्यासाठी आणि बाहेरुन गावात कोणाला प्रवेश द्यायचा याचे अधिकार सरंपचांच्या अध्यक्षतेखालील ग्रामस्तरीय समितीला देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. अत्यावश्यक गरज असेल तरच लोकांनी बाहेर पडावे त्यालाही समिती मान्यता देईल, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, परदेश प्रवास करुन आलेले तसेच पुणे, मुंबई आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले आहे. या व्यक्ती खरोखर घरीच राहतात की, बाहेर फिरतात का, फिरत असतील तर त्यांना अटकाव करणे याचे नियंत्रण तसेच या सर्वांचे अधिकार या ग्रामस्तरीय समितीला देण्यात येणार आहेत. गाव हे एक घटक धरुन आपल्या गावातील सर्व नियोजन करायचे आहे. या नियोजनात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवायच्या आहे. धान्य, खाद्य पदार्थ, भाजीपाला, दूध, वैद्यकीय सुविधा, टेलीफोन, इंटरनेट आदी सुविधा सुरु राहतील. ज्या कारखान्याच्या ठिकाणी ऊसतोड सुरु आहे, तो कारखाना तात्काळ बंद करता येणार नाही. अशा कारखान्याच्या मर्यादित ती सुरु राहील. त्या शिवाय इतर सर्व खासगी, शासकीय, व्यापारी आणि औद्योगिक आस्थापना बंद ठेवाव्या लागतील. जमाव बंदीमध्ये पाच पेक्षा अधिक लोक एकत्र जाणार नाहीत अथवा येणार नाहीत. बाहेरुन कोणतीही वाहन जिल्ह्यात येणार नाही अथवा बाहेर जाणार नाही, हे दि. 31 मार्चपर्यंत नियंत्रित राहील.

You may also like

Leave a Comment