कोल्हापूर

व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे जिल्हाधिकाऱ्यांनी साधलेला संवाद हा राज्यातील बहुतांशी पहिलाच प्रयोग

by संपादक

*जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मंडल अधिकाऱ्याशी* * संवाद साधत घेतला आढावा.*
*व्ही सी द्वारे साधलेला राज्यातील असा पहिलाच संवाद*
*कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हयातील सर्व मंडल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे थेट संवाद साधत आढावा घेतला. जिल्ह्यातील सुमारे 78 मंडल अधिकारी आणि त्यांचा कर्मचारी वर्ग आपापल्या मंडलाच्या ठिकाणाहून यात सहभागी झाले होते. मंडल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे जिल्हाधिकाऱ्यांनी साधलेला संवाद हा राज्यातील बहुतांशी पहिलाच प्रयोग असावा.*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच गावात घर ते घर सर्व्हेक्षण, संपर्क याद्या, वैद्यकीय तपासणी, निर्जंतुकीकरण, आवश्यकतेनुसार अलगीकरण आणि कुटुंब पातळीवरही समुपदेशनाची कामे युध्दपातळीवर हाती घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांना दिले.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी गावातील ग्रामसमितीचे काम सुरळितपणे सुरु ठेवण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, ग्रामसमिती आणि संपर्क अधिकारी यांनी समन्वय ठेऊन गावातील लोकांची वैयक्तिक माहिती तयार करावी. गावात जीवनावश्यक वस्तू तसेच सेवांच्या उपलब्धतेबाबत खातरजमा करावी. तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी ग्रामसमितीच्या कामाचा दररोज आढावा घेऊन, सर्व ती मदत आणि मार्गदर्शन करावे.
परगावाहून तसेच बाधित भागातून गावात आलेल्या व्यक्तींच्या निवास सुविधा तसेच सेवा-सुविधांबाबतही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी माहिती घेतली. अलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींना विशेषत: महिला, लहान मुले तसेच वृध्दांना वैद्यकीय मदत, जेवण अशा अत्यावश्यक बाबी उपलबध करुन देणे गरजेचे आहे. यामध्ये सेवाभावी संस्थाची मदत घ्यावी. या सर्वाबाबत नोंदवही ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तिंच्या बाबतीत अधिक दक्षता घ्या. कुटुंब रहात असलेल्या ठिकणी तसेच गावच्या सर्व सीमा, वाहतूक बंद करण्याची उपाययोजना करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व कुटुंब व त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा मागील इतिहास घेणे, यामध्ये प्रथम संपर्क, व्दितीय संपर्क आणि तृतीय संपर्क अशा याद्या तयार कराव्यात, तसेच आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करावे, तसेच वैद्यकीय तपासणी, परिसर निर्जंतुकीकरण या कामासही प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. गावात सर्व्हेक्षण करुन कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तिंना तातडीने रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करावी. त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. आवश्यकता वाटल्यास संस्थात्मक अलगीकरण किंवा गृह अलगीकरण करावे, असे निर्देशही त्यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिले.

You may also like

Leave a Comment