कोल्हापूर

पालकमंत्र्यांनी साधला व्ही.सी.द्वारे सरपंचांशी संवाद

by संपादक

पालकमंत्र्यांनी साधला व्ही.सी.द्वारे सरपंचांशी संवाद कोल्हापूर (प्रतिनिधी) पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गावातील सरपंचांशी संवाद साधून माहिती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, गावा गावात ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण चांगले काम करत आहात. यापुढेही अजून सतर्क राहून गावांची काळजी घ्यावी. गावामध्ये संचारबंदीच्या काळात बाहेरुन कोणीही येणार नाही याची दक्षता घ्या. आला तरी त्याला सक्तीने संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. कोणी चुकीची माहिती सांगत असेल तर तात्काळ पोलीस, तहसिलदार यांना कळवावे. यावेळी महागावच्या जोत्सना पाताडे यांनी यावेळी गावात पोलीसांनी गस्त घालण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी तात्काळ ती पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. गावातील सेवाभावी संस्था तसेच लोकांच्या मदतीतून निराधार लोकांना अन्न धान्य वाटप करावे. ग्रामस्तरावरील समस्यांवर चर्चा करुन त्या सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातील,असेही पालकमंत्री म्हणाले. जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. संचारबंदीचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या ठेकेदारांने कामगारांना आणले असेल, त्यांना अन्न धान्य देण्याची त्याची जबाबदारी आहे. अशी सोय ठेकेदार करत नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, याची जाणीव त्याला करुन द्या. किराणा मालाची दुकानं बंद केलेले नाहीत. ती सुरुच राहतील हे पहावे. त्या बरोबरच भाजी विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करावे. जेणेकरुन खरेदीसाठी गर्दी होणार नाही. काही सरपंचांनी त्यांच्या गावात मागील ३ ते ४ दिवसांत संचारबंदीचे उल्लंघन करुन परराज्यातून व्यक्ती आल्या आहेत, त्यांचे काय करावे, असे विचारले असता, अशा व्यक्तींना तात्काळ संस्थात्मक अलगीकरणात पाठवावे, असे निर्देश दिले. ज्याला कुणीच नाही अशा निराधार लोकांची यादी तहसिलदारांकडे द्यावी. त्यांच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाईल. तलाठी, मंडल अधिकारी यांच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडविल्या जातील, असेही ते म्हणाले.
जिल्हा प्रशासन जवानाच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी, कुटुंबियांसोबत अंत्यसंस्कार करा -जिल्हाधिकारी कोडोलीच्या सरपंचांनी यावेळी गावातील जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगून अंत्यसंस्कारासाठी गर्दी होण्याची शक्यता बोलून दाखवली. त्यावर जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, तुमच्या सर्वांच्या भावना मी समजू शकतो. परंतु, आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गावातील इतर व्यक्तींनी अंत्यसंस्कारासाठी गर्दी न करता अत्यावश्यक व्यक्तींची मदत वगळता केवळ कुटुंबियांसोबत अंत्यसंस्कार करावेत. गर्दी होवून ग्रामस्थांना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

You may also like

Leave a Comment