अमर रहे….. अमर रहे च्या जयघोषात जवान मनोज पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
कोडोली (प्रतिनिधी)अमर रहे…. अमर रहे…… मनोज पाटील अमर रहे, भारत माता की जय च्या घोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सजविलेल्या वाहनातून गावातील मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा काढत पंजाब येथे अपघातात मृत्यू झालेले भारतीय सैन्य दलातील जवान मनोज महादेव पाटील यांना कोडोली येथे दत्त मठी समोरील क्रीडांगणावर बंदुकीची सलामी देत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. मनोजचा भाऊ युवराज यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
राजस्थान येथील युद्धाचे प्रशिक्षण संपवून पंजाब येथील पठाणकोट येथे जात असताना जैसलमेर राष्ट्रीय महामार्गावरील दियातारा जवळ रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात मनोज यांचा मृत्यू झाला होता .त्यानंतर मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता त्यांचा पार्थिवी देह कोडोली येथे त्यांच्या घरी आणण्यात आला. यावेळी त्यांचे वडील, भाऊ व पत्नीने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित मोजक्या लोकांना गहिवरून आले. अंत्यसंस्कारावेळी कोल्हापूरच्या १०९ मराठा बटालियनच्या जवानांनी व पोलिसांच्या वतीने बंदुकीची सलामी देत मानवंदना दिली .यानंतर सैन्य दलाच्या पथकाने पार्थिवावर असलेला तिरंगा त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द केला.
अशा प्रकारची घटना कोडोली गावात पहिल्यांदाच घडल्याने अनेकांची अंत्ययात्रेत सामील होण्याची इच्छा होती परंतू कोरोनामुळे जमावबंदीचा आदेश असल्याने सहभागी होता आले नाही .त्यामुळे अनेक मंडळांनी डीजीटल फलकाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली. ग्रामपंचायत व महाराणा प्रताप मित्र मंडळ यांचे वतीने अंत्ययात्रा मार्गावर फुलांचा सडा व दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. कोडोलीचे प्रथम नागरीक शंकर पाटील ,जि. प .सदस्य विशांत महापूरे, तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार विनय कौलवकर, मंडल अधिकारी अभिजीत पवार ,प्रविण जाधव, कर्नल सुभाष पाटील, मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल डी .के .राऊत यांच्यासह २१ जवान उपस्थीत होते .दरम्यान कोल्हापूर विमानतळावर पार्थिव आणल्यानंतर राज्याचे ग्रह राज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानवंदना दिली.
74
previous post