“पोलिसांच्या प्रती सामाजिक बांधिलकी जपणारा कल्पक उद्योजक-विश्वास चव्हाण”

by Admin

https://youtu.be/MdU5jZuVDCM
पोलिसांच्या प्रती सामाजिक बांधिलकी जपणारा कल्पक उद्योजक-विश्वास चव्हाण
आम्हां पोलिसांचे आता कर्तव्याचे संदर्भच सगळे बदलुन गेलेत. पुर्वी सारखे गुन्हे दाखल त्याचा तपास, अटक, रिमांड, सणवाराचे/ धार्मिक/व्हीआयपी बंदोबस्त हे सगळच संपत आले आहे. आता कोरोना विषाणु विरुद्ध रोजच युद्ध करावे लागतय. हद्दीतील कोणीही माणुस या शत्रुचा ( विषाणुचा ) बळी होणार नाही, यासाठी आम्हांला जे जे वाटेल ते करतोय. फटके देतोय, आरती करतोय, हात जोडतोय, गाणी/ भारूड गाऊन जागृती करतोय, नाका बंदी करून, विनाकरण भटकणाऱ्यांवर कारवाया करतोय, निराश्रीतांना आश्रय देतोय, त्यांचे अन्नपाण्याची व्यवस्था करतोय इ.इ. एक एक माणुस जगवण्याचे या विषाणु पासुन दुर नेण्याचे काम आम्हास करावे लागतयं आणि हे काम करताना आम्हां पोलिसांना संपुर्णपणे रस्त्यावर कित्येक तास काम करावे लागतयं. महापुर वगैरे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काम करताना त्यात फक्त आमचा स्वतःचा जीव धोक्यात असतो, त्याचे आम्हाला काहीच वावगे वाटले नाही. पण, यावेळी आम्ही काम करतोय तर आम्ही आमच्या सोबत आमचे कुटुंबातील जीव ही पणाला लावतोय. कारण रस्त्यावरचे हे काम करीत असताना सवयीने कळत/ नकळत एखाद्या व्यक्तीशी/ वस्तुशी/ वाहनाशी/ तपासणीचे त्या व्यक्तीकडे असलेल्या कागदपत्रांशी आमचा स्पर्श होतोच होतो आणि त्यामुळेच माझे अखत्यारीतील प्रत्येक पोलिस/ प्रत्येक होमगार्ड हा निर्जतुंक होऊनच घरी गेला पाहिजे असे मनाला कोठेतरी मी त्यांचा प्रमुख म्हणुन वाटु लागले. मग मला सोशल मिडीयाचे माध्यमातुन *सॅनिटायझर चेंबर* ची माहिती मिळाली. परंतु, त्याची किंमत ऐंशी हजार चे पुढे म्हणजे माझ्या आवाक्या बाहेरची होती. काय करावे? याचा मी विचार करत होतो. मी पुन्हा सॅनिटायझर चेंबर ची क्लीप बघितली, तेव्हा त्याला शेतीसाठी वापरले जाणारे नोझल असल्याचे दिसले. तात्काळ माझ्या लक्षात आले आणि माझे तळसंदे गांवचे मित्र व सीमा बायोटेक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.विश्वास चव्हाण यांना ती क्लीप पाठवली व फोन वरून त्यांना अशा प्रकारचे सॅनिटायझर चेंबर तुम्हाला बनवता येईल काय? याची विचारणा केली. त्यानी क्लीप पाहुन तात्काळ होकार दिला. आणि या बहाद्दराने रात्रीच बसुन एक डिझायन तयार केले. महाशय हे बायोटेकमध्ये असल्याने विषाणुंचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी नोझल सिलेक्शन पासुन ते दिर्घकालीन वापरापर्यंतच्या सर्व मुद्यांचा विचार करून एक मजबुत व उच्च प्रतीचे डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत सुरक्षा देणारे असे *सॅनिटायझर चेंबर* चोवीस तासाच्या आत बनवून ते पोलिस स्टेशनला बसवूनही दिले. त्या सॅनिटायझर चेंबर चे उद्घाटन आमचे प्रेमळ डी.वाय.एस.पी. श्री. किशोर काळे (जयसिंगपुर विभाग)यांनी अगदी अगत्याने येऊन केले. हा लेखन प्रपंच यासाठी की, सीमा बायोटेकचे श्री.विश्वास चव्हाण यांची या कोरोणा विषाणुच्या लॉक डाऊन मध्ये बांबु टिश्यु कक्चर ची या वर्षी नविन सुरु होणारी लॅब बंद ठेवावी लागल्याने त्यांचे सुमारे दोन कोटीचे नुकसान झाले आहे. तरी त्यांनी हे सॅनिटायझर चेंबरसाठी वारंवार आग्रह करूनही एक रुपयाही आमच्याकडुन घेतला नाही. आणि हे असे लोक असल्यानेच आम्हां पोलिसांना जीवावर उदार होऊन काम करण्याची एक उर्जा/स्फुर्ती मिळते, मिळत राहते. मग लोक कितीहीआमचा तिरस्कार/हेटाळणी/कुचेष्टा करोत, शिव्या घालोत की अवाजवी दबाव आणोत. *आजपासुन माझा प्रत्येक अधिकारी/कर्मचारी हा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निर्जतुंक होऊन घरी जाणार व त्याचे घरचेही सर्वजण सुरक्षित राहणार हे नक्की.* माझा सलाम या निस्पृह,कल्पक उद्योजक दात्याला .
प्रदीप काळे (मो.8805152799) पोलिस निरीक्षक पेठ वडगांव,पोलीस ठाणे ता.हातकंणगले,जि. कोल्हापूर

You may also like

Leave a Comment