केंद्र सरकारच्या ‘भारत पढे ऑनलाईन’ अभियानासाठी पहिल्या तीन दिवसांमध्ये नागरिकांनी पाठविल्या 3700 सूचना
13 एप्रिल 2020 नवी दिल्ली(प्रतिनिधी)केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी भारतातील ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने नागरिकांकडून नव्या संकल्पना मागविण्यासाठी शुक्रवारी नवी दिल्ली इथे ‘भारत पढे ऑनलाईन’ नावाच्या अभियानाची सुरुवात केली. हे अभियान सात दिवस सुरु राहणार असून समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांमध्ये ते अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. अभियानाची सुरुवात झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांतच मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे ट्विटर तसेच ईमेल द्वारे 3700 पेक्षा जास्त सूचना आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयाने सुरु केलेल्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून हा उपक्रम सुरु केल्याबद्दल मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
‘भारत पढे ऑनलाईन’ ह्या एक आठवडाभर चालणाऱ्या अभियानातून भारतातील ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये दर्जात्मक सुधारणा करण्याच्या दृष्टीने देशभरातील कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या व्यक्तींना सुचणाऱ्या अभिनव कल्पना, विचार तसेच सूचना थेट मनुष्यबळ विकास मंत्रालयाला कळविता येणार आहेत. सध्या कार्यरत असलेल्या विविध ऑनलाईन शिक्षण मंचांच्या अधिकाधिक वापराला प्रोत्साहन देण्यासोबतच या शिक्षणपद्धतीतील समस्या सोडविण्यासाठी देखील मंत्रालयाला या सूचनांचा मोठा उपयोग होणार आहे.
इच्छुक नागरिकांनी त्यांच्या संकल्पना येत्या गुरुवारपर्यंत bharatpadheonline.mhrd@gmail.com या ई मेल आय डी वर पाठवाव्यात. ट्विटरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी त्यांचे संदेश #BharatPadheOnline वर पाठवावेत तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्याची त्वरित दाखल घ्यावी यासाठी त्याची सूचना @HRDMinistry आणि @DrRPNishank यावर देखील द्यावी असे आवाहन मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.
98