देशात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी ग्राम पंचायतीनी केल्या विविध उपाययोजना
संकेतस्थळे, सोशल मिडिया, भित्ती पत्रके याद्वारे जन जागृती, गरजूंना मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत यासह इतर उपायांचा समावेश
दि.१४ एप्रिल २०२०
नवी दिल्ली (प्रतिनिधी)कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर पंचायत राज मंत्रालयाने,राज्य सरकारांच्या सहकार्याने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या रोगाचा प्रसार रोखण्याकरिता लॉक डाऊन आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन सुनिश्चित करण्यासाठी राज्ये आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा आणि मार्गदर्शन केले जात आहे.
महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक,राजस्थान, तामिळनाडू, केरळ, अंदमान निकोबार,बिहार, यासह आणखीही काही राज्यात पंचायत स्तरावर विविध स्तुत्य उपक्रम आणि उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. त्याचे इतरांनीही अनुकरण करण्याजोगे आहे.
यापैकी काही –
महाराष्ट्र- महाराष्ट्रातून निघून आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या स्थलांतरीत मजुरांची अन्न पाण्याची आणि निवाऱ्याची सोय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
गोवा- उत्तर गोव्यातल्या सत्तारी मधल्या सोनाळ गावच्या रहिवाश्यांनी एक लाकडी वेस उभी केली असून गावातला तरुण वर्ग तिथे सतत लक्ष ठेऊन असतो.रहिवाश्यांना बाहेर जावे लागू नये यासाठी ग्राम पंचायत त्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देते.
कर्नाटक – भटकळ किनाऱ्यावर लोकांची वर्दळ कमी व्हावी यासाठी सीमा सील करण्यात आली. यामध्ये शेजारी ग्राम पंचायतींनाही सहकार्याचे आवाहन करत त्यांना सहभागी करून घेण्यात आले. कोविड संदर्भात माहिती पत्रकांचेही वाटप करण्यात आले.
राजस्थान – राज्यातल्या सर्व खेड्यांमध्ये जन जागृतीसाठी ग्राम पंचायतीमधे, सोशल मिडिया व्हाटस ऐप ग्रुपचा उपयोग केला जात आहे. सर्वत्र भित्ती पत्रके लावून सर्व स्तरावर माहिती पोचवण्यात येत आहे.गावातल्या लोकांना अन्नधान्य देण्याबरोबरच समाजसेवी संस्थांकडून जनावरांना चाराही पुरवण्यात येत आहे.
छत्तीसगड- सोशल डीस्टन्सिंग आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत कांकेर जिल्ह्यात गावी परतलेल्या व्यक्तींना माहिती देण्यात येत आहे.मनरेगा कृषी मजूर आणि कामगारामधेही सोशल डीस्टन्सिंग आणि हात धुण्याबाबत जागृती करण्यात येत आहे.
तामिळनाडू-मेत्तुपट्टी ग्रामपंचायतीत अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू खरेदी करताना नागरिक सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत आहेत.
तिरुवन्नमलाई जिल्ह्यात घरोघरी जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्याना ३ प्रकारच्या पीपीई संचाचे वाटप करण्यात आले आहे.
ओदिशा – लॉकडाऊनच्या काळात कटक,भुवनेश्वर आणि भद्रक मधे विविध ग्राम पंचायतीत, निराश्रिताना अन्न वाटप करण्यात येत आहे. ग्राम पंचायत हद्दीतील भाजी पिकवणाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी, सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत भद्रक इथे स्थानिक बाजार भरवण्यात येत आहे. बिलासपुर जिल्ह्यात जन जागृती बरोबरच,शाळा , अंगणवाडी यासारख्या इमारती, देवळे, घरे निर्जंतुक करण्यात येत आहेत.
तेलंगण – तेलंगण मधे कोविड-19 संदर्भात सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, तहसीलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर बैठका घेण्यात येत आहेत.
लडाख-कारगिल जिल्ह्यात चौकीयाल, द्रास इथे अन्न वाटप करण्यात येत आहे.
झारखंड –कोडर्मा जिल्ह्यात दुर्गम खेड्यात वन विभागाचे कर्मचारी मोफत अन्नधान्य वाटप करत आहे.
98