कोल्हापूर

उचत मधील एमएच-09 इएल 1653 या रिक्षामधून प्रवास केलेल्यानी तपासणी करुन घ्यावी -जिल्हाधिकारी

by संपादक

उचत मधील एमएच-09 इएल 1653 या रिक्षामधून प्रवास केलेल्या ग्रामस्थांनी स्वत:ची तपासणी करुन घ्यावी -जिल्हाधिकारी दौलत देसाई दि.१५एप्रिल २०२० कोल्हापूर (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे आज पॉझिटिव्ह अहवाल आलेला तरुण हा रिक्षा चालक आहे. तो त्याच्या वडीलांची रिक्षा क्र. एमएच-09 इएल 1653 चालवतो. दि. १७ ते २४ मार्च या कालावधीत पुणे, मुंबई येथून आलेल्या ट्रॅव्हर्ल्समधील प्रवाशांना या रिक्षामधून या तरुणांने सोडले आहे. त्यामुळे या रिक्षामधून प्रवास केलेल्या ग्रामस्थांनी स्वत:हून आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, महसूलचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम, प्रांताधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते. राज्यातील तसेच परराज्यातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरु करुन त्यांना त्याचे वाटप करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, संस्थात्मक अलगीकरण कक्षासाठी अतिरिक्त ठिकाणांची पाहणी करुन ठेवा. शाळा महाविद्यालयांना सद्या सुट्टी आहे. अशांची वसतीगृहे पहावीत. निवारा शिबिरांसाठी संपर्क अधिकारी त्याचबरोबर अन्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळांचे आदेश निर्गमित करावेत. प्रत्येक संपर्क अधिकाऱ्यांनी नोंदवही ठेवून त्याचा घोषवारा काढावा. काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावयाची आहे. धान्य दुकानांवर ग्राम समितीने लक्ष ठेवावे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ, नियमित अंत्योदय व प्राधान्य कार्डवरील ऑनलाईन नोंद असणाऱ्या सदस्य संख्येनुसार १०० टक्के धान्य सर्व दुकानांपर्यंत पोहच करण्यात आले आहे. अशा दुकानांबाबत येणाऱ्या तक्रारींची पडताळणी करा. प्रभाग समिती, ग्राम समिती सदस्यांची तसेच शिक्षकांचीही नेमणूक या दुकानांवर लक्ष ठेवण्यासाठी करा. पोर्टीबिलिटीच्या माध्यमातून ऑनलाईन यादीची पडताळणी करुन बाहेरुन आलेल्या पण सध्या इथे असणाऱ्या लाभार्थ्याला लाभ द्या, असेही ते म्हणाले. गावामध्ये चोरुन आलेल्या लोकांना शोधण्यासाठी तसेच लक्षणं असणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी काटेकारेपणे सर्व्हेक्षण करावे. जेणेकरुन अशा लोकांना अलगीकरण कक्षात ठेवून होणारा प्रसार थांबवता येईल. तुमच्या स्तरावर दररोज सर्वांशी संपर्क ठेवून सर्व नियोजन योग्य पध्दतीने होत असल्याची खात्री करा. तरच आपण कोरोनाला थांबू शकू, असेही ते म्हणाले. अंगणवाडी सेविकांसाठी निधी देवू नगरपालिका क्षेत्रासाठी सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी नगर विकास विभागाकडून मानधन देण्याबाबत आदेश आला नाही तर त्यासाठी निधी उपलब्ध करुन देवू, असा दिलासा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. सर्व्हेक्षणासाठी शिक्षकांची नेमणूक करा अंगणवाडी सेविकांबरोबरच सर्व्हेक्षणाच्या कामासाठी शिक्षकांचीही मदत घ्या. तसे आदेश काढून त्यांची सर्व्हेक्षणासाठी नेमणूक करावी. आजारपणाच्या कारणावरुन शिक्षक जर काम टाळत असतील तर अशा शिक्षकांची शासकीय रुग्णालयात तपासणी करावी. जर अंगणवाडी सेविका अथवा नेमलेले शिक्षक काम करत नसतील तर तसा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. वैद्यकीय तपासणी करण्याबाबत दवंडी द्या शाहूवाडी तहसिलदार गुरु बिराजदार यांनी आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाबाबत यावेळी दिलेल्या माहितीवर जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, दि. १७ ते २४ मार्च या कालवधीत पुणे, मुंबई येथून आलेल्या आणि शाहूवाडी, मलकापूर या गावात रिक्षा क्र. एमएच-09 इएल 1653 मधून प्रवास केलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. अशा ग्रामस्थांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्या त्या गावामध्ये दवंडी द्यावी. त्याचबरोबर दि. १७ ते २४ मार्च या कलावधीत पुणे, मुंबई येथून आलेल्या प्रवाशी बसमधून आलेल्या प्रवाशांना कोणतीही प्राथमिक लक्षणे आढळल्यास तात्काळ त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. ग्राम समित्यांना माहिती पोहचवा-अमन मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यावेळी म्हणाले, शाहूवाडीमध्ये ट्रॅव्हर्ल्सने पुणे, मुंबई येथून आलेले प्रवाशी आणि रिक्षा क्र. एमएच-09 इएल 1653 ने प्रवास केलेल्या ग्रामस्थांची गावनिहाय संपर्क क्रमांकासह यादी तयार करा. या सर्वांची 100 टक्के तपासणी करा. कोणताही धोका घेवू नका. सर्वांनी दक्ष राहून होणारा प्रसार थांबवावा.

You may also like

Leave a Comment