जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुरु झाले कम्युनिटी किचन

by Admin

*जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुरु झाले कम्युनिटी किचन*
दि.१६ एप्रिल २०२०-
*कोल्हापूर (प्रतिनिधी)* * जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रत्येक तालुक्यात किमान तीन कम्युनिटी किचन सुरु करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हॉटेल आनंद कोझीचे मालक आनंद माने यांनी १०० जणांचे फूड पॅकेट्स आज साळोखेनगर येथील परराज्यातील कामगारांना वाटलीत. त्याचबरोबर करवीर, हातकणंगले, गगनबावडा, राधानगरी आणि कागल या तालुक्यांमध्ये ७ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु झाले आहेत.*
कदमवाडीतील साळोखेनगरात आणि परिसरात ६५ परराज्यातील कामगार संचारबंदीमुळे अडकले आहेत. या कामगारांना आज आनंद कोझीमधून फूड पॅकेट्स तलाठी राजकुमार कोरे आणि मंडळ अधिकाऱी शिवकुमार पाटील यांनी वाटप केले. आम्ही सर्वजण कोल्हापूरमध्ये फिरस्ते आहोत. जुन्या साड्यांसह इतर वस्तुंची देव-घेव करण्याचा व्यवसाय करतो. सद्या संचारबंदीमुळे आम्ही अडकले आहोत. आतापर्यंत आम्हाला दोन वेळा अन्न धान्याचे किट मिळाले असून आज प्रथमच तयार जेवणाचे पॅकेट्स मिळाल्याचे कामगार महमद सोहेल खान या परराज्यातील कामगाराने सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आनंद कोझी हॉटेलच्या मार्फत आजपासून फूड पॅकेट्सचे दोन्ही वेळेला वापट करण्यात येत असल्याचे हॉटेल मालक आनंद माने यांनी सांगितले. आज १०० जणांचे फूड पॅकेट्स तयार करण्यात आले आहेत. मागणीनुसार यामध्ये वाढ केली जाईल. सकाळी ५०० आणि संध्याकाळी ५०० जणांसाठी फूड पॅकेट्स देण्याची आम्ही तयारी केली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी नगरसेवक अर्जुन माने उपस्थित होते.
*तालुका निहाय सुरु झालेली कम्युनिटी किचन*
करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हातकणंगले- निवासी गुरुकुल वडगाव येथे अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- माधव विद्यालय आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. राधानगरी- पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानरगी . कागल श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल अशा सात ठिकाणी कम्युनिटी किचन आजपासून सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट, रात्रीचे जेवण देण्यात येत आहे. याचा लाभ ७३१ स्थलांतरीत कामगारांना होत आहे.

You may also like

Leave a Comment