*संकेश्वर अथवा बेळगाव जिल्ह्यातील अन्य गावामधून सीमा भागातील गावात होणारी जीवनावश्यक वस्तूसह सर्व वाहतूक बंद*
*उपविभागीय दंडाधिकारी विजया पांगारकर यांचे आदेश*
दि.१६ एप्रिल २०२०
* कोल्हापूर (प्रतिनिधी)गडहिंग्लज तालुक्यालगतच्या बेळगाव जिल्ह्याच्या सीमा भागातील गावांमध्ये 17 कोरोना बाधित रुग्ण असल्याची बाब निदर्शनास आली. यामध्ये संकेश्वर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील कळवीकट्टी, तेरणी हलकर्णी, चंदनकुड, इदरगुच्ची, कडलगे, अरगुंडी, नांगणूर, कुंबळहाळ, खणदाळ, हिटणी, मुत्नाळ, निलजी, हेब्बाळ, कसबा नूल, हस्सूरचंपू आदी गावे संकेश्वर पासून 10 किलो मीटरच्या परिसरात म्हणजेच कन्टेंमेंट झोनमध्ये येतात*. *सीमेलगतच्या हुक्केरी तालुक्यातील म्हसोबा हिटणीचा मार्ग वगळता इतर गावातील सर्व रस्ते जीवनावश्यक वस्तुच्या वाहतुकीसह सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विजया पांगारकर यांनी आज दिले.*
या आदेशात म्हटले आहे, गडहिंग्लज तालुक्यालगतच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या सिमेलगतच्या काही गावामध्ये आज दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी 17 कोरोना बाधित रुग्ण असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामध्ये हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील नमूद केलेल्या गावांसह इतर तालुक्यातील नागरिकांची संकेश्वर अथवा बेळगाव जिल्ह्याच्या इतर ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी ये-जा चालू असते आणि त्यामुळे संबंधित 14 कोरोना बाधित रुग्ण अथवा त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांचा गडहिंग्लज तालुक्यात नागरिकांशी संपर्क आला असल्याची अथवा भविष्यात सदर कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींशी संपर्क येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडहिंग्लज तालुक्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा असून गरज पडल्यास उपविभागांतर्गत त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार आहे. सीमेलगतच्या हुक्केरी तालुक्यातील म्हसोबा हिटणीचा मार्ग वगळता इतर गावांतील सर्व रस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसह सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक आहे.
फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार सर्व रस्ते पुढील आदेश होईपर्यंत जीवनावश्यक वस्तुसह सर्व वस्तुंच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश दिला आहे. गडहिंग्लज पोलीस निरीक्षकांनी तात्काळ सर्व सीमा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करून तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवावा. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरून तवंदी घाटातून म्हसोबा हिटणीचा रस्ताही केवळ अत्यावश्यक सेवांसाठी खुला राहील. या मार्गावर तपासणी नाका कार्यरत ठेवून सर्व वाहने व प्रवाशांची काटेकोर तपासणी करून अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली गैरवापराने वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेवर भादंसं १८६० (४५) याच्या कलम १८८, आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
63