कोल्हापूर

नॉकडाऊन होण्यापेक्षा लॉकडाऊन व्हा, प्रशासनाला सहकार्य करा..!

by संपादक

नॉकडाऊन होण्यापेक्षा लॉकडाऊन व्हा, प्रशासनाला सहकार्य करा..! आयुष्य हे एकदाचं मिळते…माझ्यामुळे माझ्या बहिणीला झाला.. ही खंत नेहमी राहील…प्रशासन खूप चांगल्या उपाययोजना करत आहे…प्रशासन आणि डॉक्टर आमच्यासाठी देवदूत ठरले…म्हणून आम्ही दोघेही बहीण-भाऊ कोरोनामुक्त झालो…आयुष्यातून नॉकडाऊन होण्यापेक्षा लॉकडाऊन व्हा.. प्रशासनाला सहकार्य करा.. किमान आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असा संदेश कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रूग्णाने स्वानुभवातून दिला. पुण्याहून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जिल्ह्यातील भक्तीपूजानगर येथे आलेल्या भावाला 26 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवसानंतर त्याच्या बहिणीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 23 दिवसानंतर शनिवार 18 एप्रिल रोजी टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात या दोघांनाही घरी पाठविण्यात आले. अजूनही माझ्यामुळे माझ्या बहिणीला संसर्ग झाला ही खंत भावाला लागून राहिली आहे. त्यामुळे घरी अलगीकरण होण्यापेक्षा त्याने स्वत:हून आणखी काही दिवस अथायू रूग्णालयातच स्वत:हून थांबण्याचा निर्णय घेतला आहे. ”तो” आज भरभरून बोलत होता. आपले अनुभव सांगत होता. रूग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर सुरूवातीला भीती तर वाटत होती. बहिणीच्या घरी असणारे कुटूंबिय, त्यामधील लहान बाळ या सर्वांची काळजी वाटत होती. दोनच दिवसात वाटणारी भीती खरी ठरली. माझ्यामुळे बहिणीला लागण झाली. तिच्यावरही अथायू रूग्णालयात उपचार सुरू झाले. रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक, नर्सिंगच्या अधीक्षक शीतल राणे, उप व्यवस्थापक राहूल खोत, कॅज्युलिटी इनचार्ज विजय महापुरे हे या दोघांवर उपचार करत होते. तो म्हणाला, क्षणभर असे वाटत होते कोणती दूर्बुध्दी सुचली आणि प्रशासनाचे न ऐकता मी प्रवास करून पुण्याहून इथे आलो. दररोज सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी सहा-साडेसहा वाजता उठल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या मोकळ्या जागेत थोडावेळ फिरायचो. नंतर कोवळ्या उनात पेपर वाचत बसायचो. नाश्ता झाला की पुन्हा मोबाईल आणि पेपर यात गुंतून जायचो. पण मनात विविध भीतीचे काहूर माजायचे. विशेषत: बहिणीची चिंता लागून रहायची. तिला धीर द्यायचो. रूग्णालयाचे पथक मात्र आमच्यावर उपचाराबरोबरच समुपदेशनही करायचे. यातून मानसिक ताण निघून जायचा. बाहेर पडल्यानंतर कॉलनीमधील शेजाऱ्यांकडून कशी वागणूक मिळेल याबाबत चिंता होती. माझे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आणि माझ्यापेक्षा जास्त बहिणीला आनंद झाला. तिचाही आत्मविश्वास आता वाढला होता. तिचे अहवालही निगेटिव्ह आल्यानंतरच घरी परतण्याचा आम्ही निर्णय घेतला. शुक्रवार दिनांक 17 रोजी तिचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला. मला खूप आनंद झाला. मनावरचं ओझं क्षणात उतरलं. शनिवारी सकाळी आम्हाला घरी सोडण्यात आले. संपूर्ण रूग्णालय सज्ज झालं होतं. कोव्हिड -19 या विलगीकरण कक्षातून ते रूग्णवाहिकेत बसेपर्यंत दोन्ही बाजूला रांगोळ्या काढल्या होत्या. भिंतीवर फुगे लावण्यात आले होते. मुख्य प्रवेशव्दारावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तत्पूर्वी श्री गणेशाचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले. तुळशीचे रोप देवून स्वागत करायला साक्षात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे उभे होते. भक्तीपूजानगर येथे आल्यानंतर घरच्यांनी तर स्वागत केलेच पण शेजाऱ्यांनीही स्वागत केले. हे पाहून आम्ही खूप भारावून गेलो. सर्वांशी भेटून, बोलून रात्री मीच पुन्हा काही दिवस रूग्णालयात राहण्याचाच निर्णय घेतला. प्रशासन, डॉक्टर्स जीव धोक्यात घालून आपल्यासाठीच उत्तम काम करत आहेत. या सर्वांचे आपण ऐकायला हवे. आयुष्यातून नॉकडाऊन होण्यापेक्षा काही दिवस लॉकडाऊन व्हायला काय हरकत आहे, असा स्वानुभवातून त्याने जिल्हावासियांना संदेश दिला आहे. -प्रशांत सातपुते -जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

You may also like

Leave a Comment