कोल्हापूरचे युद्ध कोरोनाशी…. जिंकण्यासाठीच.
जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचं मानवी जीवनावरचं आक्रमण काही केल्या थांबायला तयार नाहीयं. दिवसागणिक कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट बनत चालला आहे, ही चिंतेचीच बाब आहे. सारं जग कोरोनानं आपल्या विळख्यात घेतलं असताना भारतानं मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक भूमिका घेऊन जवळपास ४० दिवसांच्या लॉकडाऊनव्दारे कोरोनाला हरविण्याचा यशस्वी प्रयत्न चालविला आहे. मात्र यापुढेही कोरोनाला हरवायचं असेल तर जनतेनं शासन आणि प्रशासनाच्या हाकेला साथ द्यायला हवी. कोरोना आज दाराच्या उंभऱ्यावर आला आहे, मात्र त्याला उंबऱ्यावरुनच परत पाठवायचं असेल तर लोकांना घरी राहूनच कोरोनाशी युध्द जिंकायलाचं हवे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधकांचे अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत, मात्र आज तरी कोरोनावर कोणतेही औषध वा लस नाही, त्यामुळे घरी राहणे आणि सुरक्षित राहणे तसेच सोशल डिस्टन्सिंग हाच एकमात्र उपाय आहे. त्यामुळे जनतेनं घरीच राहावे, जर घराबाहेर पडावेच लागले तर आरोग्य विभागाच्या सूचनांचे कोटेकोर पालन करणे काळाची गरज आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयानेही जनतेसाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये १) योगासने, प्राणायाम आणि साधना किमान ३० मिनिटे करावी, २) हळद, जिरे,धने आणि लसूण यांचा आहारात समावेश करावा ३) दररोज सकाळी १० ग्रॅम (चमचाभर) च्यवनप्राश सेवन करावे ४)दिवसभर आणि आवश्यकता भासेल तेव्हा गरम पाणी प्यावे ५) मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी शर्करामुक्त च्यवनप्राशचे सेवन करावे ६) तुळस, दालचिनी,मिरी, सुंठ, मनुका, आलेयुक्त हर्बल चहा प्यावा आणि ७) १५० मि.ली.दुधात अर्धा चमचा हळद घालून दोनदा प्राशन करावे.
याबरोबरच लॉकडाऊनच्या काळात जनतेसाठी सप्तसूत्रीही जाहीर केली आहे. यामध्ये १) वयस्कर लोकांची विशेष काळजी घ्या. ज्यांना पूर्वीपासून असाध्य विकार आहेत, अशा व्यक्तींकडे अधिकच लक्ष द्या, त्यांना सुरक्षित ठेवा.२) लॉकडाऊनच्या लक्ष्मणरेषेचे काटेकोरपणे पालन करा, सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने जोपासा, घरगुती मुखावरणे उपयोगात आणा. ३) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी आयुष मंत्रालयाने प्रसारित केलेल्या दिशा निर्देशांचे सातत्याने पालन करा. ४) आरोग्य सेतू हे मोबाईल ॲप स्वत: डाऊनलोड करा व इतरांना त्यांसाठी उद्युक्त करा, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी हे ॲप अत्यावशक आहे. ५) गरीब आणि त्यांच्या कुटुंबाचे उत्तरदायित्व स्वीकारा, त्यांच्या आहार आणि खाण्यापिण्याची काळजी घ्या. ६) उद्योग, उत्पादन केंद्रे आणि व्यापारात काम करणाऱ्या कर्मचारी आणि कामगार वर्गाची विशेष आपुलकीने आणि उदारपणे काळजी घ्या. ७) कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नका तसेच देशभरातील कोरोनायोध्दे, डॉक्टर्स, परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांविषयी आदराने वागा, त्यांना सहाय्य करा. कोरोनाला हरविण्यासाठी सारा भारत एकवटला असून कोरोनाविरुध्दची देशवासियांची एकीची वज्रमुठ, घरीच राहण्याचा दृढ निर्धार आणि शासन-प्रशासनाच्या सूचनांची काटेकारपणे पालन या गोष्टी कोरोनाला हारविण्यास उपयुक्त ठरत आहेत. कोरोना विरुध्दच्या युध्दात जिंकण्यासाठी प्रत्येकाने घरीच थांबून सुरक्षित रहावे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे आज काळाची गरज बनली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्चला संपूर्ण देशभर एक दिवसाचा जनता कर्फ्यू यशस्वी करुन नंतर २१ दिवसांचा लॉकडाऊनही यशस्वी केला. त्यानंतर १९ दिवसांचा दुसरा लॉकडाऊनही यशस्वीपणे सुरु आहे. कोरोनाच्या महामारीतून देश वाचविण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे प्रत्येक भारतीयाने काटेकोरपणे पालन करणे गरजेच आहे. महाराष्ट्रातही आज कोरोनाचा झपाट्याने फैलाव होऊ लागला आहे. मुंबई आणि पुणे या राज्यातील प्रमुख दोन शहरात कोरोनाने आपले पाय खोलवर पसरायला सुरुवात केली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वोच्च प्राधान्य दिल्याने राज्याच्या अन्य भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होत आहे. संपूर्ण राज्यभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्या आहेत. कोरोनाबरोबरच्या युध्दात महाराष्ट्र निश्चिपणे जिंकेलच, असा दृढनिर्धारही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री महोदयांचा हा निर्धार यशस्वी करण्यासाठी शासनाच्या उपाययोजना आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे हे मात्र राज्यातील जनतेच्या हाती आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना जीवनावश्यक गोष्टी प्राधान्यक्रमाने उपलब्ध करुन देण्याबरोबरच गोरगरीब उपाशी राहू नये याचीही काळजी घेतली आहे. जनतेने कोरोनाला घाबरु नये, मात्र काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं मात्र कोरोनाला हरविण्याचा चंगच बांधला असून प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील जनतेला कोरोनापासून मुक्त ठेवण्यासाठी कणखर भूमिका घेऊन सर्वच यंत्रणा गतीमान केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांना जिल्ह्यातील सर्वच मंत्रीमहोदयांबरोबरच मान्यवर लोकप्रतिनिधींनीही सकारात्मक भूमीकेतून सहकार्य करण्याची घेतलेली भूमीकाही तितकीच महत्वाची आहे. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची शांत, संयमी, प्रसंगी कठोर कार्यशैली सर्वार्थाने महत्वाची वाटते. त्यांनी सर्व मान्यवरांसह सहकारी अधिकाऱ्यांना बरोबरच घेऊन कोरोना विरुध्दची लढाई जिंकण्याचा चंग बांधला आहे. मात्र कोल्हापूरवासियांनी प्रशासनाच्या उपाययोजनांना यापुढेही सक्रीय सहकार्य करणे, कोरोनामुक्त कोल्हापूर घडविण्यासाठी महत्वाचेच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घर टू घर सर्व्हेक्षण, तपासणी, होम तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर दिला. अलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आलेल्यांची सर्वती व्यवस्था करण्यात पुढाकार घेतला, एकूणच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना युध्दपातळीवर हाती घेतल्या. सर्व यंत्रणामध्ये सुयोग्य समन्वय ठेऊन जिल्हा, तालुका ते गांव पातळीपर्यंत सर्व यंत्रणा सतर्क केल्या. शहरात प्रभागाच्या तर गावांत गावच्या सीमा बंद करण्यात आल्या. जिल्ह्यात कोरोना बाधीत ९ जणांची नोंद असून भक्तीपूजानगरमधील पहिला रुग्ण आणि त्याच्या बहीणीच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने ते दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना कालच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता जिल्ह्यात कोरोनाचे ६ रुग्ण असून तेही कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी प्रशासन विशेषत: आरोग्य विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाबरोबरच स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि मान्यवरही सरसावले आहेत. आजमितीस जिल्ह्यातील १५ निवारागृहे उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवारागृहामध्ये राज्यातील ११५ आणि परराज्यातील ६३७ अशा एकूण ८१२ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. सीपीआर हे आता कोरोना रुग्णालय केल्याने या ठिकाणी येणाऱ्या इतर रुग्णांवर सीपीआरप्रमाणेच मोफत उपचार करण्याचा भार शहरातील खासगी रुग्णालयांनी सामाजिक बांधिलकीतून उचलला आहे, जिल्हयात सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या लढयात शासन आणि प्रशासनाबरोबरच प्रत्यक्षकाम करणाऱ्या कोरोना योद्यांची अनमोल कामगिरी लाभली आहे. या सर्व कोरोना योद्यांच्या प्रयत्नास सलाम ! संचारबंदीच्या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला, औषधे, दवाखाने, गॅस पुरवठा, रेशनिंग यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी गर्दी करु नये, अनावश्यकरित्या गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सींगची अंमलबजावणी करावी, या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. शहरात व गावागावांत निजंर्तुकीकरणासह स्वच्छतेवर भर दिला आहे. याबरोरबच जनतेनेही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वारंवार साबणाने अथवा हॅन्डवॉशने हात धुवावेत, तसेच सॅनिटायझरचाही वापर करावा, तोंड, नाक, डोळयांना हात लावू नये, घराबाहेर जावे लागलेच तर सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा, तोंडाला मास्क वापरावा, आवश्यकतेनुसार हँन्डग्लोजचाही वापर करावा. यासह आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणेही तितकेच अनिवार्य आहे. कोरोनारुपी शत्रू समोर दिसत नाही, तो अदृश्य स्वरुपात असून या अदृश्य शत्रुशी युध्द जिंकायचे आहे, तर मग चला आपण साऱ्यांनी घरी थांबून कोरोनाविरुध्दची लढाई जिंकुया !
– एस.आर.माने – कोल्हापूर
92