*रमजान महिन्यात घरीच नमाज पठण करावे*
*एकत्र येवू नये ; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश*
* कोल्हापूर** (प्रतिनिधी)**कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार रमजान महिन्यात मुस्लिम बांधवानी नमाज पठणासाठी एकत्र येवू नये. मुस्लिम बांधवानी घरीच नमाज पठण करावे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले आहेत.*
रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजातील लोकांमध्ये मोठ्या संख्येने मस्जिदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा असून रमजानमध्ये नमाज, तरावीह व इफतारसाठी लोक मोठया प्रमाणावर एकत्र येतात. अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग, संक्रमण मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याने मोठया प्रमाणावर जीवित हानी होऊ शकते. कोरोना विषाणूचा संसर्ग, संक्रमण टाळण्यासाठी भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत शासनाने सूचना दिलेल्या आहेत, त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे. मस्जिद, मदरसा किंवा धार्मिक स्थळी करावयाचे विधी फक्त २ ते ३ व्यक्ती किंवा मौलवी यांनी दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर ठेऊन पार पाडावेत.
रमजानमध्ये कोणत्याही परिस्थितीत मशिद किंवा धार्मिक स्थळ सर्वसाधारण संचारासाठी किंवा नमाज पठण धार्मिक विधी यासाठी उघडू नये. तसेच घराच्या इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफतार करण्यात येवू नये. मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण इफतार करण्यात येवू नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौंटुबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आला असल्याने मुस्लिम बांधवांनी आपआपल्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफतार आदी धार्मिक कार्य पार पाडावित.
संचारबंदी लागू असल्याने घराबाहेर पडण्यास व शेजारी किंवा इतरांच्या घरी जाण्यास प्रतिबंध आहे. एखादया कुटुंबात काही घरी अलगीकरणातील व्यक्ती असल्यास अशा व्यक्तीने अलगीकरणातच रहावे. कुटूंबीयाशी संपर्कात येऊ नये, स्वतंत्ररित्या नमाज किंवा धार्मिक प्रार्थना करावी. काही मुस्लिम बांधव संस्थात्मक अलगीकरणात आहेत, त्याही ठिकाणी अलगीकरणाचे तंतोतंत पालन करावे, अशा ठिकाणी इतरांचे संपर्कात येऊ नये. नमाज किंवा धार्मिक प्रार्थनेसाठी दोन व्यक्तींनी एकत्र येऊ नये. सुरक्षित अंतर ठेवावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
या आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती किंवा संस्थेवर भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशात नमूद केले आहे.
140