कोरोनायुध्दात उतरलेत डाकयोध्दे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना पोस्टाच्या सेवा पुरविण्याचं काम भारतीय डाक विभागाने अविरतपणे हाती घेतले आहे. कुठलाही गाजावाजा न करता एखाद्या निष्काम कर्म योध्याप्रमाणे लॉकडाऊनमध्येही ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन जीवाची बाजी लावत कोरोनाविरुध्दच्या युध्दात डाकयोध्दे म्हणून उतरले आहेत. लॉकडाऊनच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसह अन्य योजनांचे पैसे पोस्टामार्फतच बँक ग्राहकांना घरपोच केले जात आहेत. हे काम अतीशय जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचेही. पण डाकयोद्यांनी ही जोखीम पत्करुन AePS सुविधेद्वारे सर्वसामान्य माणसाला विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना सहाय्यभूत होण्याचं काम चालविलं आहे. देशभर कोरोनाने (कोव्हिड-19) थैमान घातले असून मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातही कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट बनत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन नवनव्या उपाययोजना युध्दपातळीवर राबवित आहे. यामधील सर्वार्थांने महत्वाची उपाययोजना म्हणजे लोकांनी घरी थांबून कोरोनाचं युध्द जिंकायचं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ४० दिवसांच्या लॉकडाऊनव्दारे कोरोनाविरुध्दच्या युध्दात जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालविली आहे. याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील जनतेची आर्थिक कोंडी होऊ नये, म्हणून सुमारे १ हजार ग्रामीण डाक सेवक जनतेला त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम घरपोच करीत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डाक विभागाने ही जोखीम उचलली आहे. मात्र जिल्हयातील जनतेनं लॉकडाऊनमध्ये बँकामध्ये पैसे काढण्यासाठी आता गर्दी करायची काहीही गरज नाही. तुमच्या खात्यात जमा होणारे पैसे विनामोबदला तुम्हाला घरपोच करण्याची हमी डाक विभागाचे उचलली आहे. फक्त तुम्ही घरी थांबून पोष्टाला सहकार्य करण्याचीच आज खरी गरज आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ज्या महिलांची प्रधनमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकामध्ये बचत खाती आहेत, अशा खात्यांमध्ये एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला ५०० रुपये बँक खात्यात जमा होत आहेत, त्यापैकी एप्रिल २०२० च्या रक्कमा महिलांच्या बचत खात्यामध्ये जमा झाल्या. मात्र ही रक्कम काढली नाही तर परत जाण्याच्या गैरसमजुतीतून सर्वच बँकामध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी होऊ लागल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता ग्रहीत धरुन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बँक ग्राहकांनी विशेषत: महिलांना पोष्टामार्फत घरपोच रक्कम देण्याचा निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधिक्षक ईश्वर पाटील यांनी जवळपास १ हजार ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन या कामास जोडून व्यक्तीश: लक्ष केंद्रीत केले. या उपक्रमातून आतापर्यंत कोल्हापूर जिल्हयातील जवळपास ८ हजार ग्राहकांना दीड कोटीची रक्कम विनामूल्य घरपोच करुन लॉकडाऊनमध्येही सामान्यांचा आधार बनण्याचं काम डाकयोध्दे करीत आहेत. कोल्हापूर डाकघर विभाग सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून वैद्यकीय सामुग्रीची पार्सले, जनधन योजना, गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांचे आर्थिक सहाय्य, सामान्य नागरिकांचे इतर बॅक खात्यातील पैसे AePS च्या माध्यमातून संस्था तसेच लोकांपर्यंत घरपोच करुन कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामास सहाय्यभूत होण्याची कामगिरी चालविली आहे. घरपोच पैसे दिल्यामुळे बँकामध्ये पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी व त्यामुळे होऊ शकणारा कोरोनाचा प्रादुर्भाव याला अटकाव होण्यास पोष्टाची भूमीकाही मोलाची आहे. या व्यतिरिक्त आजपर्यंत सुमारे ७० वैद्यकीय सामुग्रीचे स्पीड पोस्ट व पार्सलव्दारे बुकींग व वितरण देखील डाक विभाग देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवित आहे. मुंबईहून कोल्हापूरात अवघ्या ३० तासात कॅन्सर पेशंटचे औषध घरपोच दिले, यासाठी प्रवर अधिक्षक ईश्वर पाटील यांनी मुंबईला खास गाडी पाठवून औषध मिळविण्याची सोय केली. कोल्हापूर डाक विभागाने सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील १५ उपेक्षित व गरजू कुटुंबांना लॉकडाऊनच्या काळात एक महिना पुरेल इतके किराणा सामान देऊन त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसह अन्य शासन योजनांतर्गत आलेले पैसे ग्राहकांना-शेतकऱ्यांना आता पोस्टामधून किंवा ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जात आहे. जी बचत खाती आधार क्रमांकाशी जोडलेली आहेत अशा खात्यावरील रक्कम बायोमेट्रिक मशीनद्वारे पोस्ट ऑफिस किंवा ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता इतर सर्व बँकातील खातेधारक ज्यांच्या खात्यात आधार क्रमांक जोडलेला आहे, असे लाभार्थी पोस्ट ऑफिसमधून पैसे काढू शकतील, पोस्ट ऑफिसमधून या प्रकारचे पैसे काढण्याची मर्यादा प्रतिदिन दहा हजार रुपये आहे. जिल्हयात ५३५ पोस्ट कार्यालये कार्यरत असून त्यापैकी ४३९ ग्रामीण भागामध्ये आहेत. ग्रामीण पोस्ट कार्यालयामधुन प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक आधार क्रमांक आधारित रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत. आधार क्रमांकाशी जोडलेल्या कुठल्याही बँकेच्या बचत खात्यावरील व्यवहार या ग्रामीण डाक सेवकांकडून करता येणार आहेत. मात्र यासाठी आपले खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदाराला त्याचे आधार कार्ड क्रमांक, बँक पासबूक व मोबाइल क्रमांक ग्रामीण डाक सेवकास द्यावा लागेल. या व्यवस्थेमुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसह अन्य योजनांच्या लाभार्थी खातेदारांची सोय झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर डाक विभागाने लॉकडाऊनच्या काळात पोस्ट ऑफिस आपल्या दारी ही योजना राबवून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांची सोय केली. कोल्हापूर डाक विभागाची ही कामगिरी राज्यात अव्वल ठरत आहे. लॉकडाऊनमध्येही ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये २३७ तसेच ग्रामीण भागामध्ये ७३९ ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन कार्यरत असून त्यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले असून AePS सेवेद्वारे इतर कुठल्याही बँकेच्या आधार लिंक खात्यातून (जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता) संबंधित खातेदारास आधार क्रमांक व अंगठ्याच्या ठशांद्वारे दिवसाला रु.१००००/- पर्यंत रक्कम काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाऊनच्याकाळात कोल्हापूर डाक विभागामध्ये ८७ सब पोस्ट ऑफिसेस व ग्रामीण भागातील ४३५ ब्रंच पोस्ट ऑफिसेस कार्यरत असून या काळात पोस्टाच्या खातेदारांनी आजअखेर १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम पोस्टात जमा केली तर पोस्टामधून २२ कोटीहून अधिक रक्कम खातेदारांना अदा केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बँकात होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार जिल्हातील सर्व बँकांनी विशेषत: बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आदि बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या सुमारे ३ लाख लाभार्थ्यांची माहिती पोस्टास दिली आहे. संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम घरपोच देण्याचे काम पोष्टाकडून केले जात आहे. यात बँक खात्याला आधार लिंक नसणे ही एक अडचण ठरत असून लॉकडाऊनच्या काळात आज अखेर पोस्ट ऑफिस ३७ हजार २४९ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे, परंतु त्यापैकी २२ हजार ८२२ लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्याने त्यांना ह्यासेवेचा लाभ देता आलेला नाही, तरी देखील सर्व ग्रामीण डाक सेवक, पोस्टमन व इतर कर्मचारी सामाजिक भावणेतून मोठ्या उमेदीने लोकांपर्यंत पोहचून हा लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनमध्येही जिल्हयातील ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्हयातील गोरगरीब जनतेसाठी राबत आहेत, त्यांच्या या कार्याचा आपण सर्वजण केवळ घरात बसूनच सन्मान करुया ! आणि कोरोना विरुध्दच्या युध्दात यशस्वी होऊया ! – एस.आर.माने – कोल्हापूर
96
previous post