४० प्रयोगशाळांच्या मदतीने कोरोना चाचण्यांचा टप्पा एक लाखांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
– मुंबई (प्रतिनिधी)राज्यात गेल्या सुमारे दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आज राज्यात १ लाख ८ हजार ९७२ नमुने पाठविण्यात आले. काल दि. २४ एप्रिल पर्यंत राज्यात १ लाख २ हजार १८९ नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले. राज्यात आजमितीस शासकीय आणि खासगी प्रत्येकी २० अशा एकूण ४० प्रयोगशाळा आहेत. राज्यात साधारणत: दररोज पाच ते सात हजार चाचण्यांची क्षमता असून जास्त चाचण्या होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्य होत आहे.
साधारणत: २१ जानेवारीपासून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनासाठी प्रवाशांची तपासणी केली गेली. त्यानंतर बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांची आरोग्य विभागामार्फत १४ दिवसांचा पाठपुरावा करण्यात आला. ज्या प्रवाशांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत होते.
राज्यात सुरूवातीला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) तपासणीची सुविधा होती. राज्यात साधारणत: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच जणांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत साधारणपणे तीन महिन्यात राज्यातील चाचण्यांचा आकडा लाखावर गेला आहे.
सुरूवातीला फक्त पुणे येथे असलेली ही सुविधा मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय, नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आली. संशयित रुग्ण संख्या वाढल्याने दरम्यानच्या काळात आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली. केईएम येथेही सुविधा सुरू झाली. टप्प्याटप्प्याने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांनाही चाचण्यांना मान्यता दिल्याने राज्यात झपाट्याने प्रयोगशाळांची संख्या वाढत गेली. त्यामुळे ठिकठिकाणी चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याचा रुग्णांच्या निदानात मोठा फायदा होत आहे.
75
previous post