कोल्हापूर

[सोलापूर] सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

by संपादक

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन
– सोलापूर (प्रतिनिधी) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत. – मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच १९९६ मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. २००१पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. २००८ पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या. -महिन्यातून २६ ते २८ दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्‍या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.

You may also like

Leave a Comment