महाराष्ट्र

पालकमंत्री सतेज पाटील यांचा आयटी क्षेत्राच्या वाटचालीबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांशी व्हिसीद्वारे संवाद

by संपादक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांचा आयटी क्षेत्राच्या वाटचालीबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांशी व्हिसीद्वारे संवाद
-कोल्हापूर (प्रतिनिधी)केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद व केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून आय.टी. क्षेत्राची सद्यस्थिती व कोरोना नंतरच्या काळातील रोडमॅप निश्चित करण्यासंदर्भात आय.टी. क्षेत्राची भविष्यातील वाटचाल व धोरणासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली. – पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री व राज्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादात केलेल्या चर्चेतील काही महत्वपूर्ण बाबी – कोरोना मुळे भविष्यात निदान आय.टी. क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची गोष्ट होवून जाईल. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे आव्हान मोठे असेल. या सर्वांचा विचार करुन यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभारणे व घरातून काम करण्याच्या नियमांची चौकट तयार करण्यावर भर दिला पाहिजे. – येणाऱ्या काळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये डिजीटलायझेशनची वाढ होणार आहे. अशावेळी सायबर गुन्ह्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेवून ही समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक संशोधकांनी ए.आय. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) / रोबोटिक्स आणि हेल्थकेअर क्षेत्रात बरचे नवीन संशोधन केले आहे. या सारख्या संशोधकांना किंवा संशोधन संस्थांच्या नवनवीन शोधांना मंजुरी देण्यासाठी तसेच ते प्रत्यक्षात वापरात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक खिडकी योजना आखावी. जेणेकरुन कोरोना नंतरच्या काळात नवनवीन संशोधन करण्यासाठी संशोधकांना प्रोत्साहन मिळेल. भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हेच सर्वव्यापी असेल. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करताना सद्या वापरत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये काही समस्या आढळतात. यावर उपाय म्हणून जर केंद्र शासनाने देशात तयार झालेले स्वदेशी तंत्रज्ञान सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत उपलब्ध कसे करुन देता येईल, याबाबत मार्गदर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करावी. – केंद्र शासनाने आधार सक्षम पेमेंट सिस्टिम वापरण्याला प्रात्साहन द्यावे. – भारत नेट 2 हा उपक्रम महाराष्ट्र राज्य उत्तमरित्या राबवत आहे. पण याला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शन व मदतीची गरज आहे. त्यामुळे आपणांस विनंती आहे की, या संदर्भातील निधी राज्य शासनाला तात्काळ देवून सहकार्य करावे. – देशामध्ये एक समिती स्थापन करुन कोरोना नंतरच्या काळातील आय.टी. क्षेत्रासमोरील आव्हानांबाबत एक सविस्तर मसुदा तयार करावा. जो या येणाऱ्या काळामध्ये नवीन उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. – महाराष्ट्र राज्य हे मुंबईला फिनटेक कॅपिटल म्हणून उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. जागतिक बाजारपेठमधील गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी आमचे हे प्रयत्न सुरु आहेत. आम्हाला खात्री आहे केंद्र सरकार म्हणून आपले मोलाचे सहकार्य आम्हाला मिळेल, असा विश्वासही पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. – या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामाराव यांनी मांडलेले खालील मुद्दे तितकेचे महत्वाचे आहेत. – भारतीय आयटी इंडस्ट्री ही सर्वाधिकपणे परप्रांतीय ग्राहकांवर अवलंबून आहे. पण कोरोना महामारीमुळे आयटी क्षेत्र अडचणीत आले आहे. आमची केंद्र शासनाला विनंती आहे की, देशातच माहिती तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासंदर्भातील एक सुस्पष्ट आराखडा तयार करुन मेक फॉर इंडिया या उपक्रमाला चालना देवून डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
– अमेरिकेप्रमाणे ई-गव्हर्नन्स कार्यपध्दती राबवित असताना केंद्र व राज्य शासनामध्ये समन्वय असण्याबरोबरच खासगी क्षेत्राशीही संलग्नता आवश्यक आहे. त्याचबरोबर सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे भारतातील इतर आयटीतील तज्ज्ञांना सोबत घेवून कोरोना नंतरच्या युगातील आयटी क्षेत्रासंदर्भातील नवीन रणनीती तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे. -कोरोनामुळे भारतासमोर अनेक संधी आज दार ठोठावत उभ्या आहेत, गरज आहे ती या संधींचं सोन करुन भारताला नवी उभारी देण्याची. – आय टी क्षेत्राबद्दल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून महत्वपूर्ण चर्चा घडवून आणल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

You may also like

Leave a Comment