डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांची कोरोना जनजागृती अभियानात आघाडी
– हिंदी भाषेतून तयार केलेल्या ऑनलाईन प्रश्नावलीला उदंड प्रतिसाद
– कोडोली(प्रतिनिधी)वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी कोरोना जनजागृती अभियानात आघाडी घेतली असून विद्यापीठ अनुदान आयोग आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या निर्देशानुसार त्यांनी देशात प्रथमच हिंदी भाषेतून तयार केलेल्या ऑनलाईन प्रश्नावलीला अल्पावधीतच देश विदेशातून पाचशेहून अधिक नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. हिंदीमधून आयोजित केल्याबद्दल देशभरातील मान्यवरांनी डॉ. चिकुर्डेकर यांचा सर्वोत्कृष्ट प्रयोग म्हणून गौरव ही केला आहे. – सध्या देशभरात लॉक डॉऊन मुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. प्रत्येकाचे ऑनलाइन कामकाज सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असल्याने प्रत्येकाने कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारित केली जात आहे त्या माहितीच्या आधारे वीस गुणांची प्रश्नावली तयार करण्यात आली. एकूण वीस प्रश्नांबरोबरच त्या प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देऊन जन जागृती बरोबरच, सामान्य ज्ञान, बौद्धिक पातळी आणि बुद्धीला चालना देण्यासाठी प्रश्नांचे पर्याय तयार करून देण्यात आले आहेत. – आधुनिक देवता के रूप में किसे देखा जाता है- या प्रश्नाचे सर्व स्पर्धकांनी शंभर टक्के बरोबर उत्तर दिले असून डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्या कार्याचा ही या निमित्ताने गौरव झाला आहे. याच बरोबर कोरोना रोखण्यासाठी सर्वात प्रथम काय करावे, कोणत्या प्रकारचे मास्क वापरणे, संक्रमित व्यक्तीपासून कसा प्रसार होतो, कोरोनाचा शरीरातील कोणत्या अवयावर सगळ्यात जास्त परिणाम होतो, कोरोनाचे सगळ्यात पहिले लक्षण कोणते, कोरोना शरीरावर किती तास राहू शकतो, संसर्ग झालेल्या व्यक्तीने लगेच कोठे भरती व्हावे, जगात सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या देशात कोरोना आढळला, आज सगळ्यात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या कोणत्या देशात आहे, याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतात कोणकोणत्या गोष्टींचा आग्रह धरला आहे. कोरोना संदर्भातील महाराष्ट्रातील स्थिती इ. प्रश्नांनाही ७० टक्क्यांहून अधिक चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यानिमित्ताने गुगलच्या माध्यमातून ऑनलाइन प्रश्नावली तयार करण्यात आली असून २० पैकी १५ अंक मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या ई-मेल वरती ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान होते. प्रश्नावलीच्या अगोदर स्वतःचे नाव, शिक्षण, पद,स्थान, संस्था, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी इ. ऑनलाईन माहिती भरावी लागते. त्यानंतर उत्तर पत्रिका ऑनलाइन सादर केल्यानंतर लगेच मूल्यांकन होते आणि २० पैकी किती अंक प्राप्त केले याचीही माहिती स्पर्धकाला लगेच मिळते. शिवाय कोणती उत्तरे चुकली तेही लगेच समजते. यशस्वी स्पर्धकांना त्यांच्या ईमेलवर लगेचच प्रमाणपत्र येते. – “कोरोना,कोव्हीड-१९”या विशेष शीर्षकांतर्गत संपन्न सामान्य ज्ञान स्पर्धा संयोजना बद्दल डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांचे दिल्ली स्थित प्रसिद्ध लेखक सर्वश्री डॉ. रामदरश मिश्र, डॉ. भगवानदास मोरवाल, डॉ. स्मिता मिश्र, प्रसिद्ध आलोचक शिवाजी विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. अर्जुन चव्हाण, अर्थ तज्ञ डॉ. जे.के. पवार,श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे ,प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम, प्राचार्य डॉ. सुरेखा शहापुरे यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. या विशेष उपक्रमात प्रा डॉ. सुधाकर इंडी (इचलकरंजी),एन. बी. जाधव यांनी तांत्रिक सहाय्य केले आहे. – दरम्यान स्पर्धेची माहिती आणि स्पर्धेची लिंक देश-विदेशात पोहोवण्यासाठी व्हाट्सअप ची सर्वोत्कृष्ट मदत झाली असून दहा टक्के लोकांनी आपला ईमेल आयडी चुकीचा भरल्याने एक तर दुसरीकडे अथवा संयोजकांच्या ईमेल वरती प्रमाणपत्र परत आली आहेत. असाही एक वेगळा अनुभव या निमित्ताने आला असल्याचे संयोजक डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांनी सांगितले. – त्यांनी तयार केलेल्या forms.gle/arG3b1mYZkX2ZZjy5 या स्पर्धात्मक प्रश्नावली ला विदेशातून ही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून नॉर्वे, स्विझरलँड, पोलंड, लंडन, अमेरिका स्थित भारतीय लोकांनीही या स्पर्धेला ऑनलाइन प्रतिसाद दिला आहे. याशिवाय देशभरातील विविध ५० हून अधिक विद्यापीठातील मान्यवरांसह विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवून यश संपादन केले आहे.