खताचे लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्र, खत कंपन्यांवर कठोर कारवाई करा- पालकमंत्री सतेज पाटील
– खरीप हंगामाच्या पूर्व तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा
– कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यात खताचे लिंकिंग होता कामा नये, खताचे लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर तसेच खत कंपन्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.
– यंदाच्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा घेतला. वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेद्वारे घेतलेल्या या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार, जिल्हा समन्वयक अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. – शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन-
– शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यात हेतुपुरस्सर हायगय आणि टाळाटाळ करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा देवून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, युरिया खताचे लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केल्या असून या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. खताचे लिंकिंग करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांनी खताच्या लिंकिंगबाबत काही तक्रारी असल्यास हेल्पलाईन क्रमांक 0231-2652034 किंवा dsaokolhapur@gmail.com मेलवर करावी. या तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली जाईल, असेही ते म्हणाले. – जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना त्यांच्या मागणीनुसार खत उपलब्ध करुन देण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, ज्या तालुक्यात आतापर्यंत खताचा कमी पुरवठा झाला आहे त्या तालुक्यांना तात्काळ प्राधान्यक्रमाने खत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. विशेषत: शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा या तालुक्यांना प्राधान्यांने खत देण्याची सूचनाही त्यांनी केली. शेतकऱ्यांना खते पोहचविण्याचे योग्य नियोजन व्हावे याबाबत आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रश्नाविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कषी विभागामार्फत खते उपलब्ध करुन दिली जातील.
– जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख ३२ हजार ९८२ मेट्रीक टनाचे आवंटन मंजूर असून एप्रिलसाठीचे १७ हजार ५८८ मेट्रीक टन खत तसेच मार्चअखेर शिल्लक असलेले १५ हजार ३६४ मेट्रीक टन असे ३२ हजार ९५२ मेट्रीक टन उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खत उपलब्ध करुन दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात युरियाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. आतापर्यंत ९ हजार ४८७ मेट्रीक टन युरिया उपलब्ध झाला आहे. एप्रिलच्या मंजूर आवंटनाच्या १४८ टक्के युरिया खत उपलब्ध झाले असून एप्रिलअखेर आणखी २ हजार ५५० मेट्रीक टन युरिया उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया व इतर खतांची अडचण भासणार नाही, असा दिलासाही पालकमंत्र्यांनी दिला आहे. – १४ भरारी पथके तर ३६ गुणनियंत्रणक पथके कार्यान्वित-
– यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक अथवा फसवणूक होता कामा नये. यासाठी जिल्ह्यात १४ भरारी पथके तैनात केली आहेत. या बरोबरच जिल्ह्यात ३६ गुणनियंत्रणक पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करुन शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे मिळेल याची व्यवस्था केली आहे. भरारी पथकाच्या तपासणीत दोषी आढळलेल्या राधानगरी तालुक्यातील ३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. – जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेततळ्यांची मोठी मागणी असून अनुदानाअभावी ही मागणी पूर्ण होवू शकत नाही. याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी लक्ष वेधले असता पालकमंत्री म्हणाले, प्रत्येक तालुकानिहाय शेतकऱ्यांची मागणी घेवून जिल्हास्तरावरुन जादा अनुदानासाठी याबाबत स्वतंत्र प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
– बंद ट्रान्सफॉरमर्स तात्काळ दुरुस्त करा-
– जिल्ह्यातील कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्याबाबत विद्युत वितरण कंपन्यांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे तसेच बंद असलेले ट्रान्सफॉरमर्स तात्काळ दुरुस्तीसाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री श्री पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाबाबत दिली. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना ठिबक संच उपलब्ध व्हावेत या दृष्टिने ऑनलाईन नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रबोधन आणि जनजागृतीचे काम कृषी विभागाने प्राधान्याने हाती घ्यावे. ठिबक सिंचन योजनेसाठी भरीव निधीची मागणी करुन त्याचा पाठपुरावा केला जाईल असे पालकमंत्र्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीबाबत बोलतांना स्पष्ट केले. – संभाव्य पूर परिस्थितीबाबत आतापासून नियोजन-
– संभाव्य पुराचा धोका लक्षात घेवून आतापासूनच पूर व्यवस्थापनासंबंधितच्या उपाय योजना व्हाव्यात या खासदार धैर्यशील माने यांच्या सूचनेविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले, पुराचा धोका संभावल्यास नागरिकांचे सक्तीने स्थलांतर केले जाईल. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय समन्वय ठेवून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपाया योजनांचे आतापासूचन नियोजन केले जाईल. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी पाटबंधारे विभागामार्फत सुयोग्य समन्वय ठेवला जाईल. – राष्ट्रीकृत बँकांनी कृषी पत पुरवठ्यावर भर द्यावा
– जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठा प्राधान्याने व्हावा यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनीही सक्रिय व्हावे यादृष्टीने जिल्हास्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी व ग्रामीण बँकांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अधिकचा कर्जपुरवठा करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना केली. तसेच महापुराच्या नुकसान भरपाईसाठी संयुक्त खाती असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासही प्रधान्य दिले जाईल. – प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी या वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेतील सहभागी मान्यवरांचे स्वागत केले व खरीप हंगाम पूर्व नियोजनाची माहिती दिली. शेवटी कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार मानले. या वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेमध्ये जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहूल माने, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कवाळे यांच्यासह सर्व तालुक्यांचे कृषी अधिकारी तसेच सर्व संबंधित मान्यवर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
खताचे लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्र, खत कंपन्यांवर कठोर कारवाई करा- पालकमंत्री सतेज पाटील
103