देशभरातील बचत गटांच्या महिलांनी तयार केले एक कोटीपेक्षा अधिक मास्क
-मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात अग्रेसर
– मुंबई (प्रतिनिधी)देशभरातील महिलांच्या स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गटांच्या महिलांनी एक कोटींपेक्षा जास्त मास्क बनवले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाच्या DAY-NULM योजनेअंतर्गत कोविड-19 शी लढा देण्यासाठी या महिलांनी प्रचंड परिश्रम, सकारात्मक ऊर्जा आणि एकत्रित निश्चयातून हे काम केले आहे.
– हे दिव्य आव्हान यशस्वी करत महिलांनी आपल्यातल्या उद्योजिकेचे मेहनती रूप आणि दृढ निश्चयाचा परिचय दिला आहे. त्यांचा निश्चय इतर सर्व महिलांसाठी प्रेरणादायक ठरला आहे. आयुष्यरक्षणासाठी उतरलेल्या स्त्रीशक्तीचे हे खरे रूप आहे.
– मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात अग्रेसर.
– सद्यस्थितीत कोरोना विषाणुचे संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे नागरिकांनी ‘मास्क’ वापरणे हाच आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून यवतमाळ जिल्हा ग्रामीण व विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) च्या बचत गटातील महिला पुढे सरसावल्या. नागरिकांसाठी मास्क निर्मितीचे काम या महिलांनी हाती घेतले आणि पाहता पाहता मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम ठरला. उमेदच्या महिलांनी एक, दोन नव्हे तब्बल ५ लाख १५हजार ७७५ मास्क एका महिन्याच्या काळात तयार केले.
– यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १४२२ उमेदच्या महिला बचत गटांनी मास्क शिवण्याचे काम हाती घेतले. या कामासाठी जिल्ह्यातून बचत गटाच्या २४६६ महिला पुढे आल्या. या महिलांनी ५ लक्ष १५ हजार ७७५ मास्कची निर्मिती करून एक उच्चांक गाठला. विशेष म्हणजे संकटाच्या या काळात ‘ना नफा ना तोटा’ या संकल्पनेतून त्यांनी मास्कची निर्मिती केली. सामाजिक जाणीव लक्षात ठेवून गावातील नागरिकांना, गावातील अपंग, ज्येष्ठ नागरिक व गरजू लोकांना ५७०४ मास्क मोफतसुध्दा वाटले. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर ३ लाख ४० हजार ६४८ मास्क तयार करून दिले. तयार केलेल्या मास्कपैकी वैद्यकीय कर्मचारी, ग्रामपंचायत, किरकोळ विक्री, सामाजिक संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र आदींना मास्कची विक्रीसुध्दा केली. विक्री करण्यात आलेल्या मास्कची संख्या १ लाख ८ हजार ८५२ असून यातून बचत गटाच्या सर्व महिलांना १६ लक्ष ६५ हजार ३६९ रुपयांची मिळकत झाली आहे.
– सर्वात जास्त मास्कची निर्मिती यवतमाळ तालुक्यात झाली असून तालुक्यातील ८२ बचत गटाच्या १८० महिलांनी ५८३५० मास्क तयार केले. यानंतर उमरखेड तालुक्यात ८१ बचत गटाच्या ११७ महिलांनी ५४४०० मास्क, घाटंजी तालुक्यात ६२ बचत गटाच्या २०० महिलांनी ५१६०० मास्क, वणी येथील १०३ बचत गटाच्या ११८ महिलांनी ३५४०४ मास्क आणि केळापूर तालुक्यातील ३८ बचत गटाच्या ८८ महिलांनी ३४१६० मास्क तयार केले. याशिवाय सर्वच तालुक्यातील उमेदच्या बचत गटाच्या महिलांनी मास्क निर्मितीत आपले योगदान दिले आहे.
– बचतगटाच्या काही महिलांच्या प्रतिक्रिया-
– श्रीमती शुभांगी चंद्रकांत धायगुडे, समृद्धी एरिया लेव्हल फाउंडेशनच्या अध्यक्ष, यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य, त्यांच्या कामाविषयीचे समाधान आणि अभिमानाची जाणीव करून देणारे आहे. त्यांनी फोनवरून ऑर्डर घेऊन त्यांच्या टिटवाळा (महाराष्ट्र) येथील घरात, हे मास्क बनवण्याचे काम पूर्ण केले. त्यांनी सुमारे ४५ महिलांच्या मदतीने ५०,०००मास्क बनवले आहेत.
– श्रीमती मीनू झा, राजस्थानच्या कोटा इथल्या सावरनी महिला बचत गटाच्या सदस्या म्हणाल्या की त्यांना कधीही वाटलं नव्हतं कि त्यांची ही छोटीशी कृती इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल. मीनू झा यांच्या या भावना हेच अधोरेखित करतात की आपल्यापैकी प्रत्येकात या लॉकडाऊनच्या काळात समाजात काही ना काही योगदान देण्याची क्षमता आहे.
– आसामचे पारंपारिक वस्त्र आणि आसाममध्ये आदराचे प्रतीक मानला जाणारा गमछा आज आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेचेही प्रतीक बनला आहे. नागांवच्या श्रीमती लक्ष्मी, रूनझुन बचत गटाच्या सदस्या असून, सध्या त्या या पारंपरिक गमछापासून मास्क बनवण्यात व्यस्त आहेत.
61