कोल्हापूर

जिल्हा व आंतर राज्य मालवाहतुकीसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना लागु -जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई

by संपादक

जिल्हा व आंतर राज्य मालवाहतुकीसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना लागु -जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई
– कोल्हापूर(प्रतिनिधी)कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा व आंतर राज्य मालवाहतूक करताना संबंधित वाहन तसेच वाहन चालक, सहचालक, मदतनीस यांच्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू केल्या असून त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे.
– कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सद्यस्थितीत सर्व प्रकारच्या आंतर जिल्हा व आंतर राज्य मालवाहतुकीस संचारबंदीतून सूट दिली आहे. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अशी वाहने तसेच वाहन चालक, सहचालक, मदतनीस यांच्या कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जाणे व येण्याने बाधीत क्षेत्रातील रोजच्या संपर्काने कारोना विषाणूचा संसर्ग व प्रसार कोल्हापूर जिल्ह्यात वाढू नये यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना अशी सर्व वाहने त्यांचे चालक/वाहक/मालक त्यांच्या संघटना त्यांचे ट्रान्सपोर्टर्स यांच्यावर बंधनकारक राहतील.
– संबंधितांनी त्यांच्याकडील 1) वाहनांचे क्रमांक, चालक, सहचालक आणि मदतनीसाचे नाव सर्वांचे मोबाईल क्रमांक, ड्रायव्हींग लायसन्स क्रमांक, संपूर्ण पत्ता यांची यादी प्रशासनास त्वरित सादर करावी, 2) वाहन चालक व वाहक कोल्हापूर जिल्ह्याबाहेर गेल्यास परत आल्यानंतर स्वतंत्र राहतील. त्याचप्रमाणे परजिल्हा किंवा परराज्यातून आलेल्या वाहनांचे चालक व वाहक हे ही स्वतंत्रपणे राहतील व विषाणूचा संसर्ग होणार नाही याबाबत खबरदारी घेतील. ही खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधीत वाहन मालक त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टरर्स यांची राहील, 3) वाहनांचा व त्यामधून जाणाऱ्या चालक व इतरांचा दिनांक निहाय इतिहास नमूद करून ठेवावा, 4) प्रशासनास गरज पडल्यानंतर सदर तपशील सादर करण्याची जबाबदारी संबंधितांची असेल, 5) वापरण्यात येणारे वाहन वरचेवर निर्जुंतुक करून वापरावीत, 6) वाहन चालक, सहचालक, मदतनीस असल्यास त्यांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्क परिधान करावा. हात वरचेवर, साबणाने/सनिटायझरने स्वच्छ करावेत, 7) सर्वांनी आपण कोठे कोठे गेलो याची दिनांक व वेळ निहाय नोंद ठेवावी,8) सर्दी खोकला ताप इत्यादी कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्यावी.
– प्रशासनाने विचारणा केल्यानंतर सदर सर्व माहिती पुरविण्याची जबाबदारी संबंधित वाहन चालक/वाहक/मालक /ट्रान्सपोर्टर यांची राहील. या आदेशाचे पालन न करणान्या व्यक्ती किंवा संस्थेवर भारतीय दंड संहिता कलम १८६० (४५) व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

You may also like

Leave a Comment