जिल्ह्याबाहेरुन कोल्हापुरात येणाऱ्या व्यक्तींवर प्रभागसमिती व ग्रामसमितीचे नियंत्रण -जिल्हाधिकारी दौलत देसाई
-कोल्हापूर (प्रतिनिधि)स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी, प्रवासी व अन्य नागरिक संचारबंदीमुळे परराज्यात तसेच इतर जिल्ह्यात अडकलेले आहेत. केंद्र तसेच राज्यशासनाने दिलेल्य निर्देशानुसार या व्यक्ती परवानगी घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये येतील. प्रभागसमिती आणि ग्रामसमितीने त्यांची वैद्यकीय तपासणी करुन गावातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात त्यांना ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. अलगीकरणाबाबत प्रभाग/ ग्रामसमितीस अधिकार देण्यात आले आहेत
– जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा समन्वयक संजय शिंदे, महसूलचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, भू-संपादन अधिकारी हेमंत निकम, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई आदी उपस्थित होते.
-जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी, विद्यार्थी आणि इतर त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याबाबत राज्य शासनाकडूनही आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने बाहेरून व्यक्ती येण्याची शक्यता आहे. किमान ५० लोकांसाठी संस्थात्मक अलगीकरण कक्षाची व्यवस्था ग्रामस्तरावर करण्याचे नियोजन करा. अशा केंद्रांमधील व्यक्तीचा गावातील व्यक्तीशी संपर्क येणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्या. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल, वस्तीवरील घरांमध्ये सोय असेल तर अशा ठिकाणी त्यांना होम क्वारंटाईन करा. याबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्यासाठी ग्राम/ प्रभाग समिती सक्षम असेल. त्यांनी संबंधित तहसीलदारांच्या आदेशाने काम करावे.
– गावनिहाय यादी करा- – जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी ऑनलाईन माहिती भरण्याची सोय करण्यात आली आहे. बऱ्याचजणांना ऑनलाईन माहिती भरता येत नसेल, इंटरनेट नसेल अथवा अँड्राॕइड मोबाईल नसेल तर अशांसाठी प्रभागसमिती, ग्रामसमितीने त्याची माहिती नोंद करुन यादी बनवावी. त्याचबरोबर त्यांची वैद्यकीय तपासणी करुन प्रमाणपत्र द्यावे.
– याच पद्धतीने बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी गावात संस्थात्मक अलगीकरण केंद्राचे नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, अशा व्यक्तींवर प्रभाग समिती आणि ग्रामसमितीने नियंत्रण करावे. गावातील लोकांशी त्यांचा संबंध येणार नाही हे पहावे. आतापासून दक्ष रहा. वेळीच दक्षता घेतल्यास संसर्ग वाढणार नाही. गावात स्वतंत्र घर असेल, स्वच्छता गृह असेल तरच अशा व्यक्तींना घरी अलगीकरण करण्यास परवानगी द्यावी. परंतु, करी अलगीकरणाचे तंतोतंत पालन न करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ पोलिसांच्या मदतीने संस्थात्मक अलगीकरणात पाठवावे.
-वाहनांचा खर्च ज्यांनी-त्यांनी करावा- – ज्या व्यक्ती आपल्या जिल्ह्यातून त्यांच्या जिल्ह्यात जणार असतील तर ते स्वतःच्या अथवा भाड्याच्या वाहनातून जावू शकतात. या वाहनांचा खर्च त्यांनी करावयाचा आहे याची कल्पना अशा व्यक्तींना द्यावी.
-अधिकारी-कर्मचारी यांनी काळजी घ्यावी-
-तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्याने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हायड्राक्सी क्लोरोक्वीनचा डोस वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना द्यावा. रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे घ्यावीत. तसेच आयुष मंत्रालयाने परवानगी दिलेली होमिओपॕथी, आयुर्वेदीक औषधेही घ्यावीत. मास्क, सॕनिटायझर यांचा वापर करावा, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
-वाहक-चालकांवर लक्ष ठेवा.
– जीवनवश्यक वस्तुंची वाहतूक करणारे तसेच इतर माल वाहतूक करणारे वाहनचालक-वाहक यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे. त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याविषयी प्रबोधन करा. याद्या तयार करा. खबरदारी घेतली जाती का ते पहा, असेही ते म्हणाले.
-प्रभाग समित्यांनी अधिक दक्ष रहावं- डाॕ कलशेट्टी
– शहरातील प्रभाग समित्यांनी आजवर अधिक चांगलं काम केलं आहे, असे सांगून महापालिका आयुक्त डाॕ कलशेट्टी म्हणाले, यापुढे अधिक दक्ष रहावे. विशेषतः वयस्क आणि लहान मुलांकडे अधिक लक्ष द्या. नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
-ग्रामस्तरीय समितीला अधिक कार्यक्षम बनवा- अमन मित्तल
– बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्ती मोठ्या संख्येने गावामध्ये येतील. गावामध्ये संसर्ग होणार नाही याची वेळीच खबरदारी आता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी संस्थात्मक अलगीकरणावर अधिक भर द्या. गृह निर्माण सोसायटीमधील माहिती ठेवावी. गावची सुरक्षितता वाढवण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना अधिक कार्यक्षम बनवा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
65