Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

जिल्ह्यात येणाऱ्यांचे संस्थात्मक अलगीकरण करा; कोरोनामुक्तीसाठी दक्ष राहू -पालकमंत्री सतेज पाटील
– तब्बल दोन तासाच्या व्हीसीमध्ये सरपंच ते राज्यमंत्री यांच्याशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद
– कोल्हापूर (प्रतिनिधी) तब्बल दोन तास चाललेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी सरपंच, नगराध्यक्ष, महापौर, नगरसेवक, आमदार, खासदार आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यांच्याशी संवाद साधला. आजपर्यंत जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी उत्तम जबाबदारी घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढील १५ दिवसात अजिबात शिथिलता न आणता अधिक दक्षतेने प्रत्येकाने काळजी घ्यावी. बाहेरहून आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींचे जास्तीत जास्त संस्थात्मक अलगीकरण करुन कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी दक्ष राहू, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
– पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके आदी उपस्थित होते.
– यामध्ये सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, महापौर निलोफर आजरेकर,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लजच्या नगराध्यक्ष स्वाती कोरी, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, कोल्हापूरचे नगरसेवक अजित ठाणेकर, सूरमंजिरी लाटकर, राहूल चव्हाण, सत्यजीत कदम, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, खेडेच्या सरपंच रुपाली आर्दाळकर, संभाजीपूरच्या सरपंच अनुराधा कोळी आदींसह सुमारे ८०० सरपंचांनी सहभाग घेतला होता.
– सुरुवातीला सर्वांचे स्वागत करुन जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीमुळे वाहक चालक यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये संक्रमण होण्याची शक्यता आहे. माल वाहतूक होणाऱ्या वाहनातून छुप्‌या पध्दतीने लोकांना आणता कामा नये. याबाबत समित्यांनी दक्ष रहावे. चालक वाहकांची अतिशय गंभिरतेने दखल घ्यावी. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित आणि पर्यायाने आपले गाव सुरक्षित या भावनेतून सर्वांनीच काळजी घ्यावी. ग्राम समिती, प्रभाग समितीने अशा लोकांचे प्रबोधन करुन काही दिवस गावच्या भल्यासाठी त्यांना स्वतंत्ररित्या राहण्यास सांगावे. बाहेरुन गावात येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात काही दिवस ठेवावे. जेणेकरुन गावामध्ये प्रादुर्भाव होणार नाही. ग्राम समिती, प्रभाग समितीने याबाबत निर्णय घ्यावा. पुढच्या काळात या समित्यांची मोठी जबाबदारी राहणार आहे. ग्राम समिती, प्रभाग समिती यांनी यासाठी प्रभावीपणे काम करावे. घरी अलगीकरणाचा भंग झाल्यास अशांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरणात ठेवा, असेही ते म्हणाले.
– महापालिक आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, नगरसेवक, अधिकारी, प्रभाग समित्या अत्यंत प्रभावीपणे जबाबदारी पार पाडत आहेत. पुढच्या काळातही ही जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे उचलावी लागणार आहे. प्रत्येक प्रभागाला सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. पाच प्रभागाला एक समन्वय अधिकारीही देण्यात आले आहेत. खासगी डॉक्टरांकडूनही आरोग्याचा दाखला चालू शकतो. ज्यांना लक्षणं असतील त्यांना तात्काळ सीपीआरमध्ये पाठवा. जे निरोगी असतील अशा व्यक्तींनाच परजिल्ह्यात पाठविण्यात येईल. याच पध्दतीने जिल्ह्यामध्ये येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. मंगल कार्यालये, शाळा अशा ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करावे.
– जकात नाक्यांच्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांची तपासणी करुन टप्या टप्याने त्यांना प्रवेश देण्यात यावा. त्याच बरोबर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने मोलकरीण सारख्या कामगारांना कामावर जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी महापौर श्रीमती आजरेकर यांनी केली.
– चांगली जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रशासनाचे कौतुक करुन खासदार श्री. छत्रपती म्हणाले, मोठ्या संख्येने जिल्ह्यामध्ये बाहेरुन लोक येतील. अशावेळी प्रशासनाची कसोटी आहे. त्यासाठी तपासणी पथके, इंट्री पॉईंट, सॅनिटायझेशन याबाबत नियोजन हवे. संस्थात्मक अलगीकरण केंद्रात शौचालये, पाण्याची सुविधा हवी. घरी अलगीकरण होणाऱ्या व्यक्ती संसर्गाच्या वाहक होवू शकतात त्यासाठी त्यांची जबाबदारी त्या त्या नगरसेवकांकडे द्यावी. अशा नगरसेवकाने दर चार तासाने त्यांची चौकशी करावी, असे सांगितले.
– खासदार श्री. माने म्हणाले, शाहूवाडी सारख्या डोंगराल भागात शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा नाहीत. याभागात बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी तशा सुविधा निर्माण कराव्यात. खाणकाम व्यावसायिक तसेच कामगारांना परवानगी मिळावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
– खासदार श्री. मंडलिक म्हणाले, प्रशासनाबरोबरच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधीनीही उत्तम काम केले आहे. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखली आहे. लोकांचे आरोग्य वाचवणे आणि देशाची अर्थ व्यवस्था सुरु ठेवणे यामध्ये सुवर्णमध्य साधायचा आहे. त्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे.
– घरी अलगीकरण करायचे की संस्थात्मक अलगीकरण करायचे याबाबत त्या त्या गावांना अधिकार द्या. त्याचबरोबर गावं लॉकडाऊन करण्याची जबाबदारीही गावांना द्या. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांवर गावे अधिक चांगल्या पध्दतीने लक्ष ठेवतील, असे आमदार श्री. आवाडे म्हणाले.
– जिल्ह्यात येणाऱ्या लोक संख्येनुसार नियोजन करावं. त्याचबरोबर लोकांचं प्रबोधन करुन शिस्तपध्दतीने देशातून कोरोना हद्दपार करु,असा विश्वास आमदार श्री. जाधव यांनी व्यक्त केला.
– सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यावेळी म्हणाले, काही दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असणारा सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. शेजारच्या सातारा जिल्ह्यामध्येही रुग्णांची संख्या वाढलेली आहे. आपल्या जिल्ह्यातमात्र लोकप्रतिनिधी, प्रशासन या सर्वांनी चांगली परिस्थिती हाताळून उत्तम कामगिरी केली आहे. येणाऱ्या काळातही अतिशय दक्ष राहून आपला जिल्हा ग्रीन झोन मध्ये कसा जाईल याबाबत आपणाला जबाबदारी निश्चित करायची आहे. फिरत्या भाजी विक्रीबाबत धोरण‍ निश्चित करावे लागेल. त्याचबरोबर खाणकामगार, असंघटीत कामगार यांना परवानगी देण्याबाबतही निर्णय घ्यावा लागेल.
– पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, २० ठिकाणी प्रवेश नाक्यांवर बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या लोकांची यादी संबंधित गावांना दिली जाईल. त्यामुळे गावांना त्याबाबत नियोजन करता येईल. घरी योग्य सुविधा असेल आणि सर्व नियम तंतोतंत पाळले जात असतील तरच अशा व्यक्तींना घरी अलगीकरणात ठेवावे. गावाची सुरक्षितता महत्वाची असल्याने जास्ती जास्त लोकांना संस्थात्मक अलगीकरण करावं. याबाबत गावांनी निर्णय घ्यायचा आहे. लक्षणे दिसली तर ताबडतोब ती कळली पाहिजे आणि त्याला उपचारासाठी दाखल केले पाहिजे. याची जबाबदारी आता गावांवर आहे. गावामध्ये येणाऱ्या प्रत्येकावर योग्य लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शंका घेवून वाद विवाद होणार नाहीत याची दक्षताही घ्यावी लागणार आहे. पुढील १५ दिवस सर्वांनी दक्ष राहून कोव्हिड-19 पासून जिल्हा मुक्त करुया. त्यासाठी २४ तास प्रशासनाबरोबर आम्ही उपलब्ध आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-100 टक्के लढा यशस्वी कराल-पालकमंत्री
– गेल्या दीड महिन्यात ग्राम समिती, प्रभाग समिती आणि प्रशासनाने जिल्ह्यातील सुमारे ४० लाख लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. त्याबद्दल प्रथम मी त्यांचे कौतुक करतो, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये सुमारे ५० हजारहून अधिक बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेले लोक येणार आहेत. या सर्वांवर यापुढेही ग्राम समिती, प्रभाग समिती, प्रशासन यांनी प्रभावीपणे दक्ष राहून लक्ष ठेवावे. आता आणखी जबाबदारी वाढली आहे. कोव्हिड-19 विरुध्द १०० टक्के लढा आपण यशस्वी कराल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
– डोळ्यात तेल घालून दक्ष रहा-जिल्हाधिकारी – आपण सर्वांनी आजपर्यंत आपल्या जिल्ह्याला व नागरिकांना तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून जीवाचे रान केले आहे. प्रसंगी कठोर झालो त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसले. परंतु पुढील कालावधीतही आपल्याला अजून संयमी झाले पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, कोरोना विरुध्द लढाईत आपल्याला १०० पैकी १०० गुण मिळाले तरच आपण सुरक्षित राहणार. एकही गुण कमी होणार नाही यासाठी सर्वांनी डोळ्यात तेल घालून दक्ष रहा.

– माझे गाव सुरक्षित ठेवणारच…
– आजपर्यंत ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी आमचे गाव कुटुंबाप्रमाणे सुरक्षित ठेवले आहे. येथून पुढेही गावाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य राहील. कोणत्याही परिस्थितीत गाव सुरक्षित ठेवले जाईल. असा निर्धार यावेळी सरपंचांनी बोलून दाखवला.

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.