भारतीय सैन्यदलाकडून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा सत्कार
– कोरोना योद्ध्यांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना
– पुणे(प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्य आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धे आहेत. दरम्यान, त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलाने आज संपूर्ण देशभरात आकाशातून पुष्पवृष्टी करत कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला असल्याचे सांगत कोरोनाच्या लढाईत भारतीय सैन्य दल आपल्या सोबत आहे. कोरोनाच्या लढाईत या कोरोना योद्ध्यांना बळ देणे आवश्यक असल्याचे मत मेजर जनरल नवनीत कुमार यांनी व्यक्त केले. तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत कार्यरत असलेले जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा त्यांनी विशेष गौरव केला.
– जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात सोशल डिस्टंसिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीयाल आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
– भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उप्रकमाबददल आभार व्यक्त करून जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून भारतीय सैन्य दल प्रशासनासोबत समन्वय ठेवून आहे. जिल्ह्यात पूरस्थिती किंवा संकट आले त्यावेळी भारतीय सैन्य दल कायम प्रशासनासोबतच असते. आजच्या कोरोना संसर्गाच्या स्थितीत प्रशासनाला पाठबळ देण्याचे काम भारतीय सैन्य दलाने केले, कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यामध्ये हिंमत देण्याची भारतीय सैन्य दलाची परंपरा असल्याचे सांगत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा हा सन्मान असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
– यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
67