दहावी व बारावी वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 13 मे पर्यंत मुदतवाढ

by Admin

दहावी व बारावी विद्यार्थ्यांना वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 13 मे पर्यंत मुदतवाढ – विभागीय सचिव सुरेश आवारी
– कोल्हापूर(प्रतिनिधी) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी सन २०१९-२० मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास १४ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे माध्‌यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी सांगितले.
– कोल्हापूर विभागीय माध्‌यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अखत्यारितील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व क. महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३० एप्रिल पर्यंत होती, तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २१ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खेळाडू विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव सादर करणे शक्य झालेले नाही. पात्र खेळाडू विाद्यार्थी क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहू नये म्हणून संबंधित शाळा, क. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना खेळाडू विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यात दि. १३ मे पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यास व संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून २० मे पर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशीसह सादर करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. एन.सी.सी. व स्काऊट गाईड मधील विद्यार्थी व शास्त्रीय कला चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सवलतीचे अतिरिक्त गुण मिळविण्यासाठीचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळांकडे १३ मे पर्यंत व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे दि. २० मे पर्यंत सादर करायचे आहेत. मार्च २०२० माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ठ सर्व खेळाडू, एन.सी.सी., स्काऊट गाईड, शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व माध्यमिक शाळा व क. महाविद्यालय यांनी नोंद घेऊन कार्यवाही करावी. कोणताही पात्र विद्यार्थी गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची सर्व शाळा व क. महाविद्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही श्री. आवारी यांनी केले आहे.

You may also like

Leave a Comment