स्थलांतरित कामगारांना प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी मोफत
– मुंबई (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे.
– यासंदर्भात आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्रवास करु इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांची प्रवास सुरु होण्यापूर्वी डिजिटल थर्मामीटरच्या सहाय्याने तपासणी आणि सिम्टोमॅटिक एक्झामिनेशन (रोगलक्षणात्मक तपासणी) होणे गरजेचे आहे. शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत ही वैद्यकीय तपासणी पूर्णत: मोफत केली जाईल. किंवा महापालिकांकडून याकामी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घेता येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
– तसेच, तपासणी करण्यात आलेल्या आणि एन्फ्लुएन्झासारखा कोणताही आजार न दर्शविणाऱ्या व्यक्तींची एकत्रित यादी प्रमाणित करुन वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जारी करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, असेही आजच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या यादीतील व्यक्ती प्रवास करु शकतील.