कोल्हापूर

राजस्थान शासनाकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणार-पालकमंत्री सतेज पाटील

by संपादक

राजस्थान शासनाकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणार-पालकमंत्री सतेज पाटील
-कोल्हापूर(प्रतिनिधी)राजस्थान मधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
-कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी ३४ हजार ३६२जणांनी तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी १७ हजार ४२ अशा एकूण ५१ हजार ४०४ जणांनी ऑनलाईन नोंद केली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, राजस्थानमधील एकूण १७०० कामगार जिल्ह्यात आहेत. रेल्वेच्या क्षमतेनुसार ११९७ कामगारांची यादी काल रात्री राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आली आहे. अद्याप परवानगी मिळाली नाही. ती मिळाल्यास कोल्हापुरातून रेल्वेने या कामगारांना राजस्थानकडे पाठविण्यात येईल.
– त्याच पद्धतीने बिहारमधील २१६५ कामगारांनीही ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्या परवानगीसाठीही बिहार शासनाला संपर्क केला जाईल. गेले दीड महिना कोल्हापूरकरांनी अत्यंत चांगला पद्धतीने सहकार्य केले आहे. तशाच पद्धतीने इथून पुढेही लाॕकडाऊनमध्ये सहकार्य करावे. बाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होणार असून तसे नियोजन केले आहे. निकषानुसार ज्यांची घरात रहायची व्यवस्था नाही त्यांना संस्थात्मक अलगीकरण करणार आहोत. तशा सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत.
– परवानगीने जे लोक जिल्ह्यात येत आहेत, त्यांनी दक्षता बाळगणं आवश्यक आहे. थोडी जरी लक्षणं दिसली तरी ताबडतोब प्रशासनाला कळवा. किमान १५ दिवस कुणालाही भेटू नये. घरी अलगीकरणात असताना जर बाहेर फिरताना आढळल्यास त्याला सक्तीने संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
– मुंबई-पुणे रेड झोनमध्ये असल्याने तेथून येणाऱ्यांच्या बाबतीत अजून निर्णय झाला नाही. जर तेथे व्यवस्था असेल तर थोडे दिवस तेथेच थांबावे, असे आवाहन करुन पालकमंत्री म्हणाले, कोणताही प्रादूर्भाव आपल्या जिल्ह्यात, गावाकडं होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आजपर्यंत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. प्रशासनानेही दोन पावले पुढं जावून चांगल्या पद्धतीची सहकार्याची भूमिका घेतली आहे. १७ तारखेपर्यंत अजून लॉकडाऊन आहे. आतापर्यंत जसे सहकार्य दिलेत तसेच ते पुढेही ठेवा. अनावश्यक गर्दी टाळा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेवटी केले.

You may also like

Leave a Comment