कोल्हापूर

जिल्ह्यात सोमवारपासून दस्त नोंदणी- जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई

by संपादक

जिल्ह्यात सोमवारपासून दस्त नोंदणी- जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई
– कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज सोमवार दिनांक ११ मे २०२० पासून पुरेशी खबरदारी घेऊन सुरु करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज जारी केले. – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज दि.२३मार्च २०२० पासून बंद ठेवण्यात आले आहे. कोरानाच्या (कोव्हिड 19) प्रादुर्भावामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणा-या परिणामावरील उपाययोजना बाबत उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत सुरु करून मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरु करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार तसेच शासनाच अन्य आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज दि.११ मेपासून सुरु करण्यासाठी खालील अटी व शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात आली आहे. – 1) करोना विषाणूचा (COVID-१९) प्रादुर्भाव होणार नाही या अनुषंगाने बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करुन दस्त नोंदणी व्यवहार करीत असताना भारत सरकार, महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाकडुन वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच कार्यालय सुरु करण्याच्या दिवशी व नंतर दररोज संपुर्ण कार्यालयाचे निर्जतुकीकरण करावे, यासाठी सोडीयम हायपोक्लोराईड सोल्युशनचा योग्य पध्दतीने वापर करावा. याबाबत सर्व शिपायांना याचे प्रशिक्षण दयावे. – 2) सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयातील कर्मचा-यांना मास्क/स्वच्छ रुमाल, ग्लोव्हज सॅनिटायझर, कागद, कापुस, पेपरबॅग इ. साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे. – 3) पटाचा दरवाजाच्या दोन्ही बाजूंचा भाग, दरवाज्याचे हॅण्डेल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इत्यादीचे दर तासाला निर्जंतुकीकरण करत रहावे. – 4) सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचा-यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत. -5) कर्मचा-यांनी काम करताना डोळे, नाक, व तोंडाला स्पर्श करणे टाळावे. – 6) कार्यालयात येणा-या नागरिकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापुर्वी व वापर केल्यांनतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी नागरीकांना साबन व पाणी तसेच सॅनिटायझर उपलब्ध करुन दयावे. – 7) प्रत्येक दस्त नोंदणी व्यवहार करताना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापुर्वी व वापर केल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) करण्यात यावे.
-8)बायोमेट्रीक उपकरण निर्जंतुक (सॅनिटायझर वापरुन) करताना वापरलेला कापसाचा बोळा पेपर कव्हरमध्ये ठेवण्यात यावा आणि तो काळजीपुर्वक व पुरेशी दक्षता घेऊन रोज जाळून नष्ट करण्यात यावा. – 9) दस्त नोंदणीसाठी येणा-या नागरिकांना कुटुंबातील सदस्यांसह किंवा मित्रांसह समुदायाने दस्त नोंदणीसाठी न येता फक्त लिहुन घेणार, लिहुन देणार व्यक्ती आणि साक्षीदार एवढयाच लोकांना दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येण्याची सूचना देण्यात यावी. – 10) दस्त नोंदणी कार्यालयातील दोन कक्षामधील /टेबलांमधील अंतर किमान 2 मिटर राहील याबाबत दक्षता घ्यावी. – 11) नागरीकांना त्यांचे नाक व तोंडावर मास्क / स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील या दृष्टीने मार्कींग करण्यात यावी. आवश्यकता असल्यास पोलीसांची मदत घेण्यात यावी. – 12) नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणेबाबत शासनाने /आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नागरिकांच्या सोईसाठी प्रदर्शित करण्यात याव्यात. – 13) सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असलेल्या कर्मचा-यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात यावे. -14) नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच दस्त नोंदणीसाठी यावे. – 15) दस्त नोंदणी कार्यालयाने आपले पुरेसे कर्मचारी दस्त नोंदणी कामासाठी नेमावे जेणेकरुन नागरिकांना कार्यालयामध्ये कमीत कमी वेळ व्यतीत करता येईल. -16) दस्त नोदणी कार्यालयाने एका दस्त नोंदणीसाठी आवश्यक तेवढयाच नागरीकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी दयावी प्रवेश केलेल्या नागरिकांचे काम झाल्याशिवाय पुढील नागरिकांना कार्यलयामध्ये येण्यास परवानगी देऊ नये दोन व्यक्तीमध्ये रांगेत पाच फुट अंतर ठेवावे. – 17) 60 वर्षांवरील आणि 20 वर्षाखालील नागरिकांनी आपल्या दस्त नोदणी व्यवहारांसाठी लाकडाऊन कालावधी संपेपर्यंत शक्यतो दस्त नोंदणी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊ नये. – 18) दस्ताचे नोंदणीसाठी व पक्षकारांची गर्दी होऊ नये म्हणुन दस्तांची फोन याव्दारे दस्त नोंदणीसाठी दिनांक व वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे पक्षकारांनी दिलेल्या दिनांकास व विहीत वेळेत नोंदणीसाठी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. – 19) काही अपरिहार्य कारणास्तव सदर पक्षकार त्या दिनांकास व विहीत वेळेत हजर राहू शकला नाही तर त्यांनी पुन्हा फोनव्दारे नवीन दिनांक व वेळ आरक्षित करणे बंधनकारक आहे. – 20) या कार्यालयाने या पूर्वीचा प्रथम आरक्षित करणा-यास प्रथम (FIFO-FIRST IN FIRST OUT ) या तत्वाचा अंगीकार केलेला असल्याने या कालावधीत दस्तनोंदणीसाठी याचा अवलंब प्रामुख्याने केला जाईल त्यामुळे पक्षकारांनी कार्यालयात येण्यापूर्वी त्यांच्या सोयीनुसार दिनांक व वेळ निश्चित करुनच कार्यालयात त्या वेळेत हजर रहावे. – 21) लिव्ह अँड लायसन्स व नोटीस ऑफ इंटीमेशन या दोन्ही दस्ताचे कार्यालयात येऊन प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन हे माहे जुलै २०२० पर्यंत थांवण्यिात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी वरील दोन्हीही दस्तासाठी कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधु नये. – 22) नोटीस ऑफ इंटिमेशनसाठी i-sarita मधील ऑनलाईन सुविधा वापरणे बंधनकारक राहिल. – 23) पक्षकारांना संपर्कासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्कात राहावे . – 24) कार्यालयीन परिसरात दस्तलेखक, मुद्रांक विक्रेते व वकील यांना थांबण्यास प्रतिबंध असेल परंतु दस्तलेखक, वकील यांना त्याच्या पक्षकारासोबत पक्षकाराने आरक्षित केलेल्या वेळेतच कार्यालयीन परिसरात येता येईल. – 25) पक्षकारांना व संबंधित वकील दस्तलेखक इत्यादिंना दुय्यम निबंधक कार्यालयात प्रवेश करताना केवळ दस्त व इतर कागदपत्रे सोबत आणता येतील बॅग -पर्स इत्यादी आत आणता येणार नाही. – 26) दुय्यम निबंधक यांना दररोज कार्यालय सुरु (लॉग इन) करण्यासाठी तसेच पाचव्या शिक्क्यानंतर प्रणालीमध्ये अंगठयाच्या ठशाची पध्दत पढील आदेशापर्यंत रद्द करण्यात येत आहे. कार्यालय सुरु (लॉग इन) करण्यासाठी मोबाईलवर OTP ची पध्दत कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याकरीता दुय्यम निबंधक / प्रभार सांभाळणारे लिपीक यांचे मोबाईल क्रमांक आय सरिता प्रणालीमध्ये समाविष्ट आहेत याची खात्री सह जिल्हा निबंधक यांनी करावी. – 27) कार्यालयाचे निर्जंतुकीकरण, हॅन्ड सॅनिटायझर / साबण / हॅण्ड वॉश, कर्मचा-यांना वापरण्यासाठी मास्क, फवारणीसाठीचा हातपंप व द्रव्य, होमगार्ड या साठीचा खर्च सह जिल्हा निबंधक यांनी कार्यालयीन खर्चातुन करावा. – 28) विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता कार्यालयात एका वेळी एका दस्ताची नोंदणी प्रक्रीया पुर्ण करावी. – 29) प्रथमता केवळ दस्त सादर करणा-या एका पक्षकारास व वकीलास कार्यालयात प्रवेश देणेत यावा. – 30) दस्त छाननी सादरीकरण (Stamp 1 व 2) झाल्यावरच इतर पक्षकारांना कबूली जबाब देण्यासाठी नावाचे क्रमवारीनुसार प्रवेश दयावा. – 31) जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. – 32) पक्षकारांनी कबूली जबाब दुय्यम निबंधक यांच्यासमोर रांगेत थांबावे. (त्यासाठी दुय्यम निबंधक यांनी जमिनीवर 7-7 फुट अंतर सोडून रांगेच्या खुणा कराव्यात) – 34) पक्षकारांनी केवळ फोटो काढण्यापुरता मास्क चेह-यावरुन खाली घ्यावा. -35) सहीसाठी प्रत्येक व्यक्तीने स्वत:चा पेन वापरावा. एकच पेन एकामेकात वापरु नये. -36) कबुली जबाब झालेल्या पक्षकाराने त्वरीत बाहेर जावे. -37) दस्त नोंदणी (Stamp-5) झाल्यावर दस्त सादर करणा-या पक्षकाराने व वकीलाने त्वरीत बाहेर जावे. त्यानंतर दुय्यम निबंधक यांनी दुस-या दस्ताबाबत वरीलप्रमाणे काम सुरु करावे. -38) त्याचबरोबर पहिल्या दस्ताचे पेजिंग व स्कॅनिंग करण्यात यावे. ते पुर्ण होताच दस्त सादर करणा-याला SMS मिळेल तेंव्हा किंवा त्याच्या नावाची पुकार झाल्यावर त्याने एकटयाने आत येऊन दस्त ताब्यात घ्यावा. -39) लिव्ह लायसन्स प्रकारचे दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजीकल रजिस्ट्रेशन) जुलै 2020 अखेर पर्यंत थांबवण्यात येत आहे यासाठी नागरीकांना ई-रजिस्ट्रेशनचा पर्याय उपलब्ध आहे. -40) नोटीस ऑफ इंटीमेशनचे फिजीकल फायलींग जुलै 2020 अखेर पर्यंत थांबवण्यात येत आहे यासाठी नागरीकांना ई-फायलींगचा पर्याय उपलब्ध आहे. सह जिल्हा निबंधक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या सर्व बँकांच्या (किमान त्यांच्या जिल्हा मुख्यालयाला) याबाबत तातडीने कळवावे व ई-फायलींग सुविधा दि.20 मे पुर्वी उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना द्याव्यात. – 41) सर्व नोंदणी कार्यालयामध्ये जुन 2020 अखेरपर्यंत मृत्यूपत्र, वाटणीपत्र या नोंदी व्यैकल्पिक असलेल्या तसेच हक्कसोडपत्र नात्यातील बक्षीसपत्र, चुक दुरूस्तीपत्र या कमी महत्वाच्या दस्तांची नोंदणी थांबवण्यात येत आहे. या प्रकारांपैकी ज्या दस्तांची कलम 23 प्रमाणेची मुदत संपणार आहे तेच दस्त या कालावधीत नोंदणीसाठी स्वीकारता येतील. -42) कार्यालयात कलम 57 अन्वये शोध थांबवण्यात येत आहे. यासाठी नागरिकांना ई-सर्चचा पर्याय उपलब्ध आहे. – 43) दस्ताची किंवा सुचीची प्रमाणित प्रत व मुल्यांकन अहवाल यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करणे व फी भरणे थांबवण्यात येत आहे. पक्षकारांनी या कामासाठी अर्ज करणे, फी भरणे व नक्कलेची उपलब्धता जाणुन घेणे यासाठी आपले सरकर वरील सेवेचा वापर करावा. – 44) जिल्हयातील कोणत्याही दुय्यम निबंधक यांना जुलै 2020 पर्यंत प्राप्त होणारे गृहभेटीच्या विनंतीचे अर्ज स्वेच्छाधिकारात नाकारता येतील. -45) सर्वसाधारण स्वरुपाची चौकशी करण्यासाठी येणा-या नागरिकांना कार्यालयात विनाकारण रेंगाळू देऊ नये, त्यांना सारथी हेल्पलाईनवर किंवा कार्यालयीन दुरध्वनीवर संपर्क साधण्याची विनंती करावी. -46) मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व ज्या कार्यालयात जास्त दस्त नोंदणीसाठी येण्याची शक्यता आहे ती दुय्यम निबंधक कार्यालये दुस-या व चौथ्या शनिवारी सुरु ठेवण्याबाबत सह जिल्हा निबंधक यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. -47) अभिनिर्णय प्रकरणे गतीने मार्गी लावण्याची आवश्यकता विचारात घेऊन, सह जिल्हा निबंधक / मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे माहे जुलै 2020 पर्यंतचे तपासणी दौरे पुढे ढकलण्यात येत आहेत. मात्र सत्वर तपासणीचे काम नियमितपणे सुरु राहील. -48) नोंदणी उपमहानिरीक्षक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या तपासणी पथकांनी या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन तपासणी मोडयुलचा वापर करुन तपासण्या कराव्यात. – 49) सह जिल्हा निबंधक यांनी दुय्यम निबंधकांच्या मासिक बैठका सुट्टीच्या दिवशीच घ्याव्यात व चौकशी किंवा इतर कामांसाठी त्यांना मुख्यालयात शक्यतो बोलावु नये. – 50) वरील विविध उपाययोजने बाबत नोंदणी महानिरीक्षक पुणे यांचे परिपत्रकातील क्र.2 मध्ये नमुद कार्यपध्दती व क्र.3 मध्ये नमूद नागरीकांशी सबंधीत निर्बंध यांचे सुचना फलक प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेर लावण्यात यावे. -51) सर्वसाधारण चौकशी, वेळ व आरक्षण इ.साठी दुय्यम निबंधक कार्यालयाचे संपर्क क्रमांक, सह जिल्हा निबंधक कार्यालयाचा कार्यालयीन क्रमांक व विभागाच्या सारथी हेल्पलाइनचा क्रमांक या सुचना फलकांवर नमूद असावा. – 52) दुय्यम निबंधक यांनी कार्यालयाशी नेहमी संबंधित असणारे घटक जसे कि वकील, दस्त लेखनिक यांना याबाबत अवगत करुन सहकार्य करण्याच्या सुचना दयाव्यात . -53) सह जिल्हा निबंधक यांनी या परिपत्रकातील नागरिकांशी संबंधीत मुद्यांना स्थानिक वर्तमानपत्र व इतर माध्यामातुन बातमी स्वरुपाने योग्य तो प्रसिध्दी दयावी. – 54) दुय्यम निबंधक यांनी कार्यालयात सकाळी सर्व प्रथम पक्षकारांनी आरक्षित केलेली वेळ सर्वांना पाहण्यासाठी यादीची प्रिंट काढावी व त्या यादीनुसार त्यानंतर येणारे दूरध्वनीव्दारे पक्षकारांना उर्वरीत वेळ कळवून दिवसभरातील कामकाजाचे नियोजन करावे. -55) दस्त नोंदणीची वेळ ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संचारबंदी मधुन सुट दिलेल्या वेळेपुरतीच असेल. -56) सर्व दुय्यम निबंधक यांचे कार्यालय सुरु करण्यापूर्वी व नंतर किमान ७ दिवसांनतर सर्व कर्मचारी यांचे स्क्रिनिंग करुन घेण्यात यावे. -57) दुय्यम निबंधक कार्यालयात शिस्त व सामाजिक अंतर पाळण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील कार्यालयांनी एका पोलीस कर्मचा-यांची / होमगार्डची पुर्ण वेळेसाठी कार्यालयास मागणी करावी. -58) विशेष विवाह नोंदणी कामी जिल्हयातील सह दुय्यम निबंधक तथा विवाह अधिकारी वर्ग-2, करवीर क्र.1 यांचेकडे या विभागाचे igrmahatashtra.gov.in या वेबसाईटवरुन विवाह या सदराखाली विवाह नोटीस देण्यात यावी व विवाह नोंदणीसाठी कार्यालयात येताना वधू व वर तसेच तीन साक्षीदार यांनीच हजर राहावे या इतरांना हजर राहता येणार नाही. हे आदेश केंद्रशासन / राज्य शासन यांचे लॉकडाऊन संपेपर्यंत राहील, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे. – दुय्यम निबंधक कार्यालयात येणा-या पक्षकार तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोव्हज् इत्यादी साहित्य स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी उपलब्ध करुन द्यावे असे आवाहन सुंदर जाधव यांनी केले होते, श्री. जाधव यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन क्रीडाई तसेच मे.पुरुषोत्तम नारायण ज्वेलर्स इचलकरंजी व काहीं दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले आहे.
-तरी दस्त नोंदणीसाठी येणा-या पक्षकार व नागरीकांनी वरील प्रमाणे सूचनांचे पालन करून दुय्यम निबंधक कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

You may also like

Leave a Comment