जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या व्यक्तींच्या निगेटिव्ह अहवालानंतर अलगीकरणाबाबत धोरण निश्चित
– कोल्हापूर (प्रतिनिधी)जिल्ह्याबाहेरुन येणा-या/परराज्यातून व परदेशातून येणा-या व्यक्तींची संख्या लक्षणीय असल्याने मागील दोन दिवसात विविध कोव्हीड रुग्णालये, कोव्हीड हेल्थ सेंटर्स कोव्हीड केअर सेंटर्स तसेच संस्थात्मक अलगीकरण केंद्रात या व्यक्तींना खबरदारीची उपाययोजना म्हणून ठेवण्यात आलेले आहे. या सर्व व्यक्तींची कोव्हीड 19 तपासणी (स्वॅब) करण्यात आलेली आहे. अशा तपासणीअंती निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तींना पुढे ग्राम स्तरीय/प्रभाग स्तरीय समितीकडे संस्थात्मक किंवा गृह अलगीकरणात पाठविण्याबाबत पुढील प्रमाणे धोरण निश्चीत करण्यात आले आहे. संचारबंदीच्या कालावधीत कोल्हापूर जिल्हयाबाहेरुन आलेल्या, रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन मधून आलेल्या व्यक्तींबाबत करावयाची तपासणी व पुढील कार्यवाहीबाबत धोरण ति करण्यात आले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने जिल्हयातील एकूण 13 कोव्हिड रुग्णालये, कोव्हीड हेल्थ सेंटर्स, कोव्हीड केअर सेंटर्स मधून बाहेरुन आलेल्या व्यक्तींच्या तपासणीबाबत व त्यांना संस्थात्मक अलगीकरण किंवा गृह अलगीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. – याबाबत काल दि. 13 मे रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले. – अ) नजीकच्या कालावधीत कोल्हापूर जिल्हयाबाहेरुन कोल्हापूर जिल्हयात येत असलेल्या व्यक्ती
– (1) कोव्हिड रुग्णालये, कोव्हिड हेल्थ सेंटर्स, कोव्हीड केअर सेंटर्समध्ये आंतर रुग्ण म्हणून दाखल परंतु कोव्हिड-19(स्वॅब) तपासणी अहवाल निगेटिव्ह (सद्य स्थितीत कोणतीही कोरोनासदृष्य लक्षणे नाहीत). – i) यावर्गवारीतील ज्या व्यक्तींना सद्यस्थितीत कोणतीही लक्षणे नाहीत असे त्या केंद्रासाठी निर्धारीत वैद्यकीय अधिका-याने प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुन प्रमाणित केल्यानंतर अशा व्यक्तींना ग्रामस्तरीय/प्रभाग स्तरीय संस्थात्मक अलगीकरणात पुढील 14 दिवसांसाठी पाठविण्यात यावे. – ii) अशा व्यक्तींनी शहरी किंवा ग्रामीण भागात शासनामार्फत निर्धारित केलेल्या खासगी संस्थात्मक अलगीकरण केंद्रात (लॉज, रिसॉर्ट, हॉटेल्स) इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने राहण्याची तयारी दाखविल्यास ग्रामस्तरीय/ प्रभागस्तरीय समितीने त्यांच्या नियंत्रणाखालील अशा खासगी संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास परवानगी दयावी. – iii) अशा व्यक्ती पैकी कांही व्यक्तींनी स्वत:च्या घरी स्वतंत्र खोलीत अलगीकरणात रहाण्याची व्यवस्था व देखभाल करणारी स्वतंत्र व्यक्ती आहे असा दावा केल्यास ग्रामस्तरीय/प्रभागस्तरीय समितीने परिशिष्ट -1 मधील नमुन्यात प्रत्यक्षात जागेवर वस्तुस्थिती तपासणी करुन प्रमाणित केल्यास समितीच्या नियंत्रणाखाली घरी अलगीकरणात पाठविण्यास हरकत नाही. परंतु अशा वेळी संबंधीत व्यक्ती निर्धारित कालावधीसाठी किमान 14 दिवस घरी अलगीकरणात राहून सर्व नियमांचे पालन करतील व कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडणार नाही त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्ती व इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही याबाबतचे हमीपत्र परिशिष्ट – 2 मध्ये भरुन घेणे बंधनकारक असेल. परंतु अशी व्यक्ती गावात / प्रभागात गेल्यावर स्थानिक परिस्थितीनुसार गृह अलगीकरण किंवा ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरण याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या त्या समितीस असेल व तो अशा व्यक्तींवर बंधनकारक असेल. – iv) ज्या व्यक्ती शासनामार्फत निर्धारीत केलेल्या लॉज, रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये स्वखर्चाने किंवा घरी स्वतंत्र खोली नसल्याने घरी अलगीकरणात राहू शकणार नाहीत, अशा व्यक्तींना ग्रामस्तरीय/प्रभाग स्तरीय समितीचे प्रमाणपत्र घेऊन ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात पाठवावे व याचे संपूर्ण नियंत्रण ग्राम/प्रभागस्तरीय समितीकडे राहील. – v) ज्या व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवून 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करावी व कोणतीही कोव्हिड-19 लक्षणे नसल्यास पुढील 14 दिवसांसाठी गृह अलगीकरणात पाठवावे (हमीपत्र परिशिष्ट-1 मध्ये घेण्यात यावे). – (ब) कोल्हापूर जिल्हयातील व्यक्ती (तपासणी अहवाल निगेटिव्ह)
– i) कोव्हिड 19 बाधीत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व तपासणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या व्यक्ती परंतु कोणतीही कोव्हिड 19 लक्षणे नाहीत अशा व्यक्तीं कोणत्याही परिस्थितीत पूर्ण 14 दिवसांच्या कालावधीसाठी संस्थात्मक अलगीकरणात राहतील. – ii) परंतु ज्या व्यक्ती स्वखर्चाने शासनामार्फत निर्धारित केलेल्या लॉज, रिसॉर्ट, हॉटेल्स इत्यादी खासगी संस्थात्मकअलगीकरणाच्या ठिकाणी रहाण्यास तयार असतील तर अशा ठिकाणी शासकीय नियंत्रणात संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यास हरकत नाही. – iii)कोल्हापूर जिल्हयातील बाधीत व्यक्तींच्या संपर्कात नसलेल्या परंतु तपासणीअंती अहवाल निगेटिव्हआलेल्या व्यक्ती ; अशा व्यक्ती शहर किंवा तालुकास्तरीय शासकीय संस्थात्मक अलगीकरणात असतील त्यांना कोणतीही लक्षणे नसल्यास घरी अलगीकरणात पाठविण्यात यावे. परंतु याबाबत ग्रामस्तरीय/प्रभागस्तरीय समितीने अशा व्यक्ती घरी अलगीकरणात राहतात यावर नियंत्रण ठेवावे व घरी अलगीकरणाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील (परिशिष्ट-1 मधील वस्तुस्थिती व परिशिष्ट-2 मधील हमीपत्र घेणे बंधनकारक). – गृह अलगीकरण व ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात पाठवितांना व्यक्तीस कोणतीही लक्षणे नसल्याबाबत डॉक्टरांकडून तपासणी व प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. – याबाबत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका, नगरपंचायत, सर्व कोव्हिड केअर सेंटर, रुग्णालय प्रभारी अधिकारी व सर्व संस्थात्मक अलगीकरण प्रभारी अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
96