जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींचे अलगीकरण न झाल्यास फार मोठा धोका -जिल्हाधिकारी दौलत देसाई
-कोल्हापूर(प्रतिनिधी) रेड झोनमधील जिल्ह्यांतून, परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना संस्थात्मक अथवा गृह अलगीकरणात ठेवण्याबाबत सांगण्यात येत आहे. याचे पालन न झाल्यास परिसरातील नागरिकांना त्याप्रमाणे अशा व्यक्तींना फार मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
– जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा रेड झोन जिल्ह्यांमधून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती या बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा व्यक्तींमुळे जिल्ह्यातील, गावातील व्यक्तींना, प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी प्रभाग समिती आणि ग्रामस्तरीय समित्यांनी घ्यावी. बाहेरून जिल्हृयात येणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी नाक्यांवर स्लिप दिली जाते. मात्र, असे निदर्शनास आले आहे की, या व्यक्ती रूग्णालयात न जाता परस्पर गावी जात आहेत. ग्राम समितीने तसेच प्रभाग समितीने अशा व्यक्तींना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.अशा व्यक्ती पुढील किमान १४ दिवस ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरण किंवा गृह अलगीकरणात न राहिल्यास, त्यांच्यापासून त्यांचे कुटुंबीय किंवा गावातील नागरिकांना बाधा होण्याचा फार मोठा धोका आहे. यासाठी गावातील सर्व नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. ग्राम व प्रभाग समितीने प्रभावी काम करणे आवश्यक आहे.
– बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना संस्थात्मक तसेच गृह अलगीकरणात राहण्याबाबत सांगण्यात येत आहे. त्या व्यक्तींच्या हातावर शिक्केही मारण्यात येत आहेत. परंतु, अशा व्यक्ती संस्थात्मक तसेच गृह अलगीकरणाच्या नियमांचे पालन करत नसल्यास, कुटुंबाच्या संपर्कात येत असल्यास अशा व्यक्तींना पुन्हा सीपीआरमध्ये दाखल करा तसेच त्यांच्यावर नियमाचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हेही दाखल करा.
– ज्या व्यक्तींना गृह अलगीकरण सांगण्यात आले आहे अशा व्यक्तींच्या घरावर त्याबाबत स्टीकर लावण्यात आले आहे का याची आजूबाजूच्या लोकांनी पाहणी करावी आणि तसेच स्टीकर लावण्याबाबत समितीला बंधनकारक करावे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समित्यांनी दक्ष रहावे. गावामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या हातावर शिक्का आहे का, नागरिकांनी याची पाहणी करावी. शिक्का नसल्यास तो मारण्यास समितीस बंधनकारक करावे. गावामध्ये चोरट्या मार्गाने आला असणार अशा व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नये त्याला सीपीआरला पाठवावे, असेही श्री. देसाई म्हणाले.
– यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
100