कोल्हापूर

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे खारघरच्या दिव्यागास मिळाले किणी टोल नाक्यावरच संजय गांधी योजनेचे पैसे

by संपादक

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे खारघरच्या दिव्यांग लाभार्थींला मिळाले किणी टोल नाक्यावरच संजय गांधी योजनेचे पैसे – कोल्हापूर (प्रतिनिधी) खारघर येथून कोल्हापुरात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थी राहूल पोळ यांना किणी टोल नाक्यावरच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने पैसे देण्याची व्यवस्था पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अल्पावधीत पूर्ण झाली. – खारघर (मुंबई) येथील दिव्यांग व्यक्तींचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतील खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे होते. लॉकडाऊनमुळे त्यांना खारघर येथेच अडकून पडल्यामुळे कोल्हापुरातील बँक खात्यातील पैसे काढणे शक्य झाले नाही. पदरी थोडेफार असणारे पैसे लॉकडाऊनच्या काळात खर्च झाले अन त्यांच्यावर अडचणीची वेळ आली होती. त्यामुळे रितसर परवानगी घेऊन दिव्यांग लाभार्थी राहूल पोळ दिव्यांगासाठीची गाडी क्रमांक MH-05- BV-3717 ने खारघरहून कोल्हापूर गाठले. अर्थात त्यांना लॉकडाऊनमुळे किणी टोलनाक्यावर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अडविण्यात आले. ही बाब पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कानावर पडताच त्यांनी या अडचणीत सापडलेल्या आणि इतक्या लांबचा प्रवास करुन थकलेल्या दिव्यांग बांधवाशी किणी टोल नाक्यावरच संपर्क साधून त्यांची हकीकत जाणून घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यामुळे या दिव्यांग बांधवांना लाखमोलाचा आधार मिळाला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समयसुचकतेमुळे खारघरच्या या दिव्यांग बांधवाना किणी टोलनाक्यावरच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे देण्याची व्यवस्था झाली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिव्यांग बांधवांसाठी लागलीच सुत्रे हालवून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने यांच्याशी चर्चा करुन पुढील व्यवस्था करण्याची सूचना केली. बँकेनेही पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार लक्ष्मीपुरी शाखेचे शाखाधिकारी एन.आर.जाधव आणि सुहास गोंजारे यांनी संजय गांधी योजनेचे लाभार्थी हे दिव्यांग असून त्यांची अडचण लक्षात घेऊन प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करुन सात महिन्याचे 7 हजार 400 रुपयांची पेन्शन केवळ अर्धा ते पाऊन तासात किणी टोल नाक्यावर समक्ष जाऊन त्यां अपंग बांधवांना दिली. पालकमंत्र्यांच्या या सकारात्मकतेबद्दल आणि कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, यावेळी त्यांच्या डोळयांत आनंदाश्रू तरळले. कोल्हापूरच्या या दातृत्व आणि कर्तुत्वाबद्दल त्यांनी आभार व्यक्त करुन पुन्हा खारघरकडे प्रयाण केले.

You may also like

Leave a Comment