महाराष्ट्र

शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छतेची काळजी आवश्यक ; ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा-मुख्यमंत्री

by संपादक

शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छतेची काळजी आवश्यक ; ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा
– मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सुचना
– मुंबई (प्रतिनिधी) शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसेच शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षण विभागाला दिले. आज एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की यापुढील काळात ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत.
– मुख्यमंत्री म्हणाले की, शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून शाळा वेगवेगळ्या सत्रात भरविणे, दर दिवशी एक वर्ग भरविणे असे पर्यायही अजमावून पाहण्यात येत आहे.
– लोकप्रतिनिधी व सर्वांशी यासंदर्भात समन्वय राखावा, सर्वांचे विचार विचारात घ्यावेत. सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आपण पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षणासाठी मोबाईल कंपन्यांचीही सहकार्य घेण्यात यावे.
– शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड द्यावे, ऑनलाइन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा. टीव्ही चॅनल्सचा यासाठी उपयोग करून घ्यावा व यानिमित्ताने ऑनलाईन नेटवर्कही बळकट करून घ्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
– यावेळी बोलताना शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, प्रधान सचिव सौरभ विजय यांनी माहिती देताना सांगितले की, बालभारतीने पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा एपचा वापरही वाढला असून व्हायरस वीर पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. गुगल क्लास रूमचा तसेच रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओचा वापर करण्यात येणार आहे. शालेय पोषण आहार यासंदर्भात शाळांना स्वातंत्र्य देण्यात येत असून महाविद्यालये सुरू करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले.

You may also like

Leave a Comment