कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडली दुर्मीळ नाणी

by संपादक

शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडली ७१६ नाणी
– कोल्हापूर (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहायाने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना ७१६ नाण्यांचे गुप्तधन सापडले. उपकोषागार अधिकाऱ्यांकडे सुरक्षा कक्षामध्ये ही नाणी ठेवली असून पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी याबाबत पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती शाहूवाडीचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी दिली.
– जमीन मालक विनायक बापुसो पाटील हे गट क्र. १८६ आपल्या शेत जमिनीमध्ये २५ मे पासून विकास पाटील, उत्तम पाटील यांच्या समवेत जेसीबीच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण करत होते. यावेळी जमिनीत असणारे मडके फुटून आतमधील असणारी नाणी सापडली. ही नाणी श्री. पाटील यांनी शेतामधील घरात असणाऱ्या लोखंडी कपाटात नायलॉन पोत्यामध्ये आणि टीशर्टमध्ये मातीच्या मडक्याचे तुटलेले तुकडे ठेवले होते. याबाबत श्री. पाटील यांनी काल सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची कार्यालयात समक्ष भेट घेवून त्यांना सापडलेल्या गुप्तधनाबाबत माहिती दिली.
– त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दिलेल्या आदेशानुसार काल रात्री उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, करंजफेणचे मंडळ अधिकारी, अणुस्कुराचे तलाठी, तीन पंच आणि जमीन मालक यांच्या समवेत रात्री ३ वाजेपर्यंत गुप्तधन सापडलेल्या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा केला व नाणी ताब्यात घेतली.
– सापडलेले गुप्तधन व मातीचे तुटलेले तुकडे याची मोजमाप करण्यात आली. त्यामध्ये अंदाजे २ सें.मी. व्यासाची व २ मि.मी. जाड अशी एकूण ७१६ नाणी आणि मडक्याचे १९ तुकडे असल्याचे दिसून आले. हे गुप्तधन लोखंडी पेटीमध्ये सिलबंद करण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असून, सापडलेले मडके व नाणी यांचे आयुष्यमान व कालावधी कार्बन डेटींगच्या माध्यमातून करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी दिले आहेत.

You may also like

Leave a Comment