कोल्हापूर

लॉकडाऊनच्या काळात स्वयं-सहाय्यता समुहाची उडान

by संपादक

लॉकडाऊनच्या काळात स्वयं-सहाय्यता समुहाची उडान
– 305 समुहाकडून 71 लाख 35 हजारच्या मास्कची विक्री
– जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 305 स्वयं-सहाय्यता समुहाने या लॉकडाऊनच्या काळात 5 लाख 55 हजार 742 मास्कची निर्मिती केली. केवळ निर्मिती करून न थांबता 71 लाख 35 हजार 16 रूपये किंमतीला या मास्कची विक्री करून कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर स्थानापन्न झाला आहे.
– जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य या स्वयं-सहाय्यता समुहांना मास्क निर्मितीसाठी लाभले आहे.
– 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू सर्वप्रथम झाला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात लॉकडाऊनला सुरूवात झाली. या लॉकडाऊनच्या काळात घराघरात नवनवे उपक्रम, विशेषत: खाद्यपदार्थांच्या निर्मितीवर भर राहिला आहे. पण तो कुटूंबातील सदस्यांसाठी मर्यादित असेल. बदलत्या काळाची पावले ओळखत त्याच पध्दतीने स्वत:मध्ये बदल घडवण्याचे काम जिल्ह्यातील स्वयं-सहाय्यता समुहातील महिलांनी केले आहे. बाजारातील मागणी आणि पुरवठा याचे गणित समजावून घेत जिल्ह्यातील या महिला सदस्यांनी लॉकडाऊनचा उत्तम फायदा करून घेतला आणि जिल्ह्यालाही दिला आहे. गेल्या 64 दिवसात मिळालेल्या संधीचं सोनं करत जिल्ह्यातील 305 स्वयं-सहाय्‌यता समुहातील 1301 महिला सदस्यांनी 5 लाख 55 हजार 742 मास्कची निर्मिती आजअखेर केली आहे. आजअखेर 71 लाख 35 हजार 16 रूपयांना याची विक्री झाली आहे. – आजरामधील 12, भुदरगडमधील 150, चंदगडमधील 15, गडहिंग्लजधील 17, बावडामधील 11, हातकणंगलेमधील 12, कागलमधील 17, करवीरमधील 16, पन्हाळ्यातील 14, राधानगरीतील 16, शाहूवाडीतील 13 आणि शिरोळमधील 12 अशा एकूण 305 समुहांचा समावेश आहे. यामध्ये कागलमधील समुहाने सर्वाधिक म्हणजे 2 लाख 42 हजार 10 मास्कची निर्मिती करून विक्री केली आहे.
– या निर्मिती झालेल्या मास्कची खरेदी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे. बाजारापेक्षा अत्यंत कमी किंमतीत पण दर्जेदार असणाऱ्या या मास्कला आता मागणी वाढती आहे.
– बाजारात उपलब्ध झालेली गरज, असणारी मागणी आणि आलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या युध्दात महिलांनीही लावलेला हातभार यशस्वी ठरतोय. आम्ही महिलाही मागे नाही, योध्दे ठरतोय असाच काहिसा संदेश जिल्ह्यातील या महिलांनी स्वकर्तृत्वाने दिला आहे. -प्रशांत सातपुते – जिल्हा माहिती अधिकारी – कोल्हापूर

You may also like

Leave a Comment