आपत्कालीन काळातील कार्याबद्दल बँकांचा ‘कोव्हिड वॉरिअर्स’ने गौरव
– आपत्कालीन मदत कर्ज योजना कृतीशीलपणे राबवा- पालकमंत्री सतेज पाटील
-कोल्हापूर(प्रतिनिधी) कोव्हिड 19 च्या संकटामुळे जिल्ह्यातील जे उद्योग धंदे ठप्प झाले आहेत, त्यांना माझं कोल्हापूर माझा रोजगार या मोहिमे अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत आपत्कालीन मदत कर्ज योजना बँकांमार्फत कृतीशीलपणे राबवावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
– जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य सेवक, डॉक्टर्स, स्वच्छता सेवक यांच्या बरोबर गेल्या दोन महिन्यापासून कोव्हिड-19 च्या आपत्कालीन काळामध्ये आवश्यक सेवांमध्ये बँका येत असल्याने जिल्ह्यातील सर्व कार्यरत बँकांनी ज्या पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या तक्रारी उद्भवू न देता ग्राहकांना आवश्यक सेवा व्यवस्थितरित्या उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल “कोविड वारियर्स” अशा शब्दात पालकमंत्र्यांनी बँकांचाही गौरव केला. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बँकांची आज अग्रणी जिल्हा बँके मार्फत बैठक झाली. पालकमंत्र्यांनी मुंबई येथून सर्व बँकांशी संवाद साधला. यामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने सहभागी झाले होते.
– पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोव्हिड-19 च्या संकटामुळे जिल्ह्यातील जे उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. ते नव्याने उभे करण्यासाठी ‘माझं कोल्हापूर माझा रोजगार’ या मोहिमेअंतर्गत जिल्हयातील राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँकांनी उद्योग धंद्यांना आपत्कालीन प्रोत्साहनपर योजनांतर्गत जास्तीत जास्त कर्ज वितरण करावे. बँकांनी आपत्कालीन काळामध्ये किरकोळ तक्रारी वगळता चांगलं काम केले आहे. त्याचप्रमाणे रोखडबाबत कोणतीही ही समस्या उद्भवू दिली नाही. काही बँकांनी सक्रिय राहून सामाजिक दायित्व सुद्धा पार पाडले आहे. हे कौतुकास्पद आहे.
– पुढील कालावधीत सर्व बँकांनी डिजिटल बँकिंगचा जास्तीत जास्त प्रसार करावा. त्यामध्ये वाढ कशी होईल आणि ग्राहकांना घरबसल्या सेवा कशा पद्धतीने पुरवता येईल यावर अधिक लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे घरफाळा, पाणीपट्टी आदीबाबत बँका ऑनलाईन स्वरूपामध्ये काय सुविधा देऊ शकतील यावरही मार्गदर्शन केले. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना यांच्या खातेदारांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकेत जास्त प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत या बाबतीमध्ये कॅश व्हॅन व इतर सुविधा उपलब्ध करून लोकांच्या दारापर्यंत या सुविधा कशा पद्धतीने देता येतील याबद्दल पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या.
– आता जाहीर होणार असलेले राज्य सरकारचे पॅकेज तसेच केंद्र सरकारचे पॅकेज यामध्ये नवीन उद्योजक यांना जास्तीत जास्त कसं सहभागी करून घेता येईल यावर लक्ष द्या, असे सांगून ते म्हणाले, येत्या कालावधीमध्ये सप्लाय चेन अंतर्गत सुद्धा जास्तीत जास्त कर्ज वितरण करून सप्लाय चेन बळकट करुन जिल्ह्याचा सहभाग यामध्ये जास्तीत जास्त वाढवा. नुकत्याच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रॉनिक हब बाबतीत माहिती देऊन जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक हबच्यादृष्टीने भरघोस काम करता येईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला उभारी देता येईल, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
– जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सुरुवातीला राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांच्या पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँक आणि खासगी बँकांनी येत्या महिनाभरात त्यांना दिलेल्या पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ततेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करावे. खरिपाच्या दृष्टीने सर्व तयारी सुरु असून शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी तसेच महात्मा फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत लाभ मिळालेले शेतकरी यांना जास्तीत जास्त कर्ज वितरण करावं. या बाबत वेळोवेळी माहिती घेऊन जिल्हा अग्रणी बँकेकडून बॅंकांचा पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.
– जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. माने म्हणाले, जिल्ह्यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी कोव्हिड-19 आपत्कालीन मदत कर्ज योजनांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू केलेले असून जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 2495 खातेदारांना 45 कोटीचे कर्ज वितरण केले आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रीयकृत बँकांकडून हा सहभाग असाच राहणार आहे. त्याचप्रमाणे ज्या बँकांकडे अजूनही वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आलेल्या नाहीत. त्यांनी त्या प्राप्त करून घेऊन जिल्ह्यातील उद्योग धंदे यांना सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये जास्तीत सक्रिय सहभाग दर्शवावा.
– जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक श्री. शेळके यांनी जिल्ह्यामध्ये पीएमईजीपी व सीएमईजीपी त्याचप्रमाणे इतर शासकीय योजनांच्या मध्ये बँकांनी सक्रिय राहून येत्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त उद्योगधंद्यांसाठी कर्ज पुरवठा करण्याचे आवाहन केले.
– जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी, कोविड-19 च्या आपत्कालीन कालावधीमध्ये सहकारी बँकासुद्धा सहभागी असच्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या अनुषंगिक तारणाशिवाय असणाऱ्या योजनेमध्ये सहकारी बँकांना समाविष्ठ करण्याबाबत यावेळी त्यांनी निवेदन केले. उपस्थित चार्टर्ड अकाऊंट ब्रांच चे चेअरमन अनिल चिकोडी यांनी केंद्र शासनाच्या पॅकेजमधील बॅंकांची संलग्न असणाऱ्या गोष्टींबद्दल विशेष मार्गदर्शन करुन, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगधंद्यांच्या आलेल्या नवीन व्याख्यांचे विस्तृत विवेचन केले.
– नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक नंदू नाईक यांनी, सर्व बँकांना कर्ज देण्याचा कालावधी, सीजीटीएमएससी कवर तसेच सहकार क्षेत्राला अनुषंगिक तारण विरहीत कर्जाच्या अनुषंगाने शासनस्तरावर सहभागी करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्डतर्फे नवीन तीन कॅश व्हॅन दिल्याची माहितीही दिली.
– जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने यांनी बँकेद्वारे कोव्हिड-19 आपत्कालीन कालावधीत दिलेल्या सुविधांबाबत विस्तृत माहिती दिली.