महाराष्ट्र

मोजक्‍या शिवभक्‍तांच्या उत्साहात दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा

by संपादक

मोजक्‍या शिवभक्‍तांच्या उत्साहात दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा

– रायगड (प्रतिनिधी) मोजक्‍या शिवभक्‍तांच्या उत्साहात दुर्गराज रायगडावर साजरा झालेला सोहळा ऐतिहासिक ठरला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा झाला. लाखो शिवभक्तांची उपस्थिती नसली तरी मोजक्या शिवभक्तांनी वातावरणात जल्लोष निर्माण केला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी, जय जिजाऊ जय शिवाजी या जयघोषाने गड दणाणून गेला. खासदार संभाजीराजे यांनी रायगड जिल्ह्याला कोरोना व निसर्ग वादळाचा मोठा फटका बसला असून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करताना रायगड परिसरातील एकवीस गावांसाठी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाईल, अशी ग्वाही दिली.
– संभाजीराजे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना घरोघरी शिवराज्याभिषेक साजरा करण्याचे आवाहन केले होते. समितीचे मोजकेच कार्यकर्ते गडावर सोहळा साजरा करतील, असेही सांगितले होते. त्यानुसार काल समितीचे कार्यकर्ते दाखल झाले होते. आज सकाळी दाट धुक्‍यात सोहळ्याला सुरुवात झाली. यौवराज शहाजीराजे यांच्या हस्ते नगारखान्यासमोर ध्वजवंदन झाल्यानंतर युवराज संभाजीराजे व शहाजीराजे शिवरायांची उत्सवमुर्ती घेऊन राजसदरेकडे रवाना झाले. शिवरायांच्या अखंड जयघोषात राजदरबार यावेळी दणाणून गेला. राजसदरेवर उत्सव मूर्तीचे पूजन झाल्यानंतर मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्यास सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. संभाजीराजे म्हणाले, रायगड जिल्ह्याला कोरोनासह निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मुख्यमंत्र्यानी या जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. रायगड किल्ला परिसर गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. महाराष्ट्रातील तरुणाईलाही त्याची झळ पोचली आहे. शिवाजी महाराजांचे विचार लक्षात घेऊन प्रत्येकाने वाटचाल करण्याची गरज आहे.” त्यानंतर होळीच्या माळावरून उत्सव मूर्ती जगदीश्‍वर मंदिराकडे नेण्यात आली. शिवसमाधीला अभिवादन झाल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.
– या सोहळ्यास समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, माजी नगरसेवक विनायक फाळके, वरुण भामरे, संजय पोवार, प्रवीण हुबाळे, सत्यजित आवटे, सुखदेव गिरी राहुल शिंदे, सागर दळवी, प्रवीण पोवार, अमर पाटील, सोमनाथ लांबोरे, योगेश केदार, दयानंद हुबाळे, श्रीकांत शिराळे, अमर जुगर, दीपक सपाटे, उदय बोंद्रे उपस्थित होते.
– राजसदरेवरून सन्मान व्हावा याकरिता ‘कोरोना योद्धा’ प्रमाणपत्र-
– कोरोनाच्या संकटात विविध क्षेत्रातील कर्मचारी, महिला, युवक सेवा बजावत आहेत. कोरोना योद्धा म्हणून त्यांची ही सेवा उल्लेखनीय ठरत आहे. त्यांचा राजसदरेवरून सन्मान व्हावा याकरिता ‘कोरोना योद्धा’ प्रमाणपत्र त्यांना आज समर्पित करण्यात आले. बंदोबस्ताच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना ते प्रतिकात्मकरित्या देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हे प्रमाणपत्र ई-मेल द्वारे सर्व कोरोना योद्ध्यांना पाठवले जाणार आहे.

You may also like

Leave a Comment