कोल्हापूर

बहूजनांचे कैवारी पी. बी. पोवार यांचे निधन

by संपादक

बहूजनांचे कैवारी पी. बी. पोवार यांचे निधन
– चौऱ्याऐंशी वर्षांचा धगधगता वन्हि निमाला !
– ‘ नाडती याजना पाहवेना डोळा म्हणून हा कळवळा आला देवा’ – हे ज्या माणसाचं आयुष्यभराचे ब्रीदवाक्य होतं आणि ह्या वाक्यापासून , उद्देशापासून जो माणूस इंचभरही ढळला नाही ,ते पांडुरंग बाबूराव पोवार तथा पी. बी. अनंतात विलीन झाले. त्यांचा ८४ वर्षांचा धगधगता इतिहास बघत असताना विश्वास बसत नाही की हा वन्हि कधी थांबेल ,हा कधी निमेल ,हा कधी शांत होईल . परंतु परिस्थिती तीच आहे .
– पांडुरंग बाबुराव पोवार तथा पी. बी. आज अनंतात विलीन झाले . कोडोली सारख्या छोट्याशा गावांमध्ये जातीने डवरी असलेल्या परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला. पारंपारिक व्यवसाय बंलुतेदारी, देवांच्या आरत्या करणारे, गोंधळ घालनाऱ्या अशा परिवारात जन्माला आलेला पोरगा . प्राथमिक शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाल्यानंतर शिक्षणासाठी म्हणून कोल्हापुरात जातो . ही गोष्ट त्यावेळच्या अनुषंगाने विचार करताना खूपच क्रांतिकारक होती. त्यावेळी सर्वोदय सोसायटी कोडोली चे चेअरमन कै. द.रा.पाटील यांनी पाच रुपये कर्ज त्यांना मंजूर केले . खरंतर सर्वोदय सोसायटी किंवा सेवा सोसायट्या या शेतीच्या कामासाठी पैसे देतात व हे पाच रुपये मांडायचे कसे ? असा प्रश्न बाबुराव कुलकर्णी नावाच्या त्यांच्या सेक्रेटरीने द.रा. पाटील यांना विचारला. द.रा.पाटील यांनी सांगितलं ते पैसे खावटीत टाक.आणि ते तेवढे पैसे घेऊन तुटपुंज्या पैशात पी. बी .कोल्हापुरात आले. आणि पुरोगामी चळवळीशी जोडले गेले .
– बेळगाव पासून मुंबई पर्यंत जेवढ्या म्हणून त्या काळात वक्तृत्व स्पर्धा झाल्या त्या वक्तृत्व स्पर्धेची नेहमी पहिल्या नंबरची बक्षीस या पोरांन मिळवली … – दिवस आठवत आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे , त्यावेळी बिंदू चौकामध्ये हा तरुण व्यासपीठावर चढला आणि त्यांनी आपल्या मुखातून शब्दांचे स्फुल्लिंग वाहायला सुरुवात केली . ‘ कर्नाटकच्या सीमेवर शहीद झालेल्या बांधवांच्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला …..’ आणि एकच कल्लोळ उडाला ! गर्दीतल्या एका माणसाने क्यान हातात घेऊन रॉकेल -पेट्रोल सदृश्य वस्तू पी. बी. यांच्या अंगावर ओतली आणि पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पी. बी. तेथून परागंदा झाले. जवळ जवळ तीस किलोमीटर अंतर चालून पहाटे पहाटे ते आपल्या गावात घरी परत आले . त्यावेळी घरातील सगळे लोक चिंतेत होते, या पोराचं काय होणार ?
– तीच परिस्थिती गोवा मुक्ती आंदोलनाच्यावेळची … त्यांचे थोरले बंधू रघुनाथ पोवार आणि पी. बी. महाद्वारावर काहीतरी बाजारहाट करत होते… एक माणूस चालत त्यांचा पाठलाग करत होता… शेवटी त्यांनी त्या माणसाला बोलावले व विचारले,” काहो काय हवय??” तर “काय नाही … गोव्याहुन कधीं आलात ? ” असंच विचारलं . ती व्यक्ती CID चे अधिकारी होती व ते पी. बीं. यांच्या पाळतीवर होते . गोवा मुक्ती आंदोलना मध्ये एवढा सक्रिय सहभाग असतानाही पी. बी. नि स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या पेन्शन चा लाभ कधीही घेतला नाही .
– गरीब डवरी परिवारात जन्माला आलेला एक पोरगा शिक्षणाच्या वेडाने, ध्यासाने कोल्हापुरात येतो आणि कोल्हापुरात येऊन पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करतो. खरे सांगायचे तर त्याला नेतृत्व म्हणजे काय हे ही माहित नसते, परंतु त्याच्या प्रखर ज्वलनशील वक्तृत्वाने अधिराज्य गाजवतो , नवं काही करण्याची इच्छा बाळगतो हीच गोष्ट क्रांतिकारक होती . त्यावेळी त्यांचे सहकारी होते खासदार सदाशिवराव मंडलिक ,अशोकराव साळूंखे ,खंजिरे , गोविंदराव पानसरे, दादासाहेब जगताप …. आणखी कितीतरी नावे सांगता येतील . त्यावेळी त्यांचे गुरू होते यशवंतराव मोहिते . डाव्या विचारांचे बाळकडू प्यालेले पी. बी. कालांतरानं काँग्रेसमध्ये सहभागी झाले . काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस झाले . विधान परिषदेची एक इलेक्शन त्यांनी आपल्या स्वतःच्या बळावर अपक्ष म्हणून लढविण्याचा प्रयत्न केला.
– आयुष्या मध्ये फार बरी वाईट परिस्थिती आली , परंतु बोटचेपेपणा , लांगूलचालन ह्या गोष्टी यांच्यापासून नेहमीच दूर राहिल्या. हे त्यांचे वैशिष्ट्य. राजकीय आंदोलन असुदे, सीमाभागातले आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन असूदे किंवा एखादा घरगुती विषय असू दे, हे नेहमी स्पष्टच बोलणार. आपल्या स्वतःला पटते तेच बोलणार … त्यामध्ये कधीही त्यांनी तडजोड केली नाही .
– पी. बी. यांचे वडील बाबुराव सखाराम डवरी त्यावेळचे प्रसिद्ध तमाशा कलावंत, देखणं रूप ,गाता गळा आणि विजेला ही लाजवेल असं नृत्य कौशल्य. परंतु वडील कधी संसारात रमले नाहीत . संसार खऱ्या अर्थानं त्यांची आई काशीबाई यांनीच सावरला आणि साधला . पी. बी. नि आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून लॉ ला ऍडमिशन घेतलं , एल. एल.बी ही झाले . पण पारंपरिक पद्धतीने वकिली करण्यात त्यांचे मन कधीच रमलं नाही . चळवळया धडपड्या स्वभाव आणि हृदयामध्ये असलेल्या कळवळीने त्यांना कधीही स्वस्त बसू दिले नाही . – कोल्हापूरला शाहू स्मारक भवनमध्ये नाथपंथी डवरी समाजाची एक परिषद भरली होती . त्यावेळचे समाज कल्याण मंत्री सुधाकरराव नाईक या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यावेळेला पीबी नी सत्यवादी मध्ये या विषयावर एक संपादकीय लिहिले. नाथपंथी डवरी समाजावर कशा पद्धतीने अन्याय होतो आणि विरामचिन्हांची झालेली गफलत कशी या समाजावर अन्याय करून गेली आहे, हे त्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या लक्षात आणून दिले . सुधाकरराव नाईक यांनी ही चूक दुरुस्त केली आणि विशेष अभिनंदनाचे पत्र पीबीना पाठवले . ही गोष्ट समाजाच्या प्रगती च्या अनुषंगाने कितीतरी अभिमानास्पद आहे. नाथपंथी डवरी समाजाला पूर्वी फक्त डवरी म्हणून ओळखलं जायचे आणि डवरी म्हणून असलेली जातीची नोंद ही ओबीसीमध्ये धरली जायची .भटक्या-विमुक्त जमाती मध्ये धरली जायची नाही. ही परिपत्रकात एक चूक होती . त्यासाठी पी‌.बी. यांनी केलेले कार्य हे आजच्या समाजाला कितीतरी उपयुक्त ठरलं … आज फक्त डवरी म्हणून असलेली नोंद सुद्धा भटकी विमुक्त म्हणून गृहीत धरली जाते . – शेतकरी संघावर प्रशासक म्हणून काम करीत असताना कितीतरी मूलभूत गोष्टीं मध्ये त्यांनी बदल घडवून आणले . कालांतराने ज्या वेळी शेतकरी संघाचे ऑडिट झाले त्यावेळी ऑडिटर टिप्पणी करताना असे म्हणाले की ,”वेल मेन्टेन ओल्ड मॉडेल कार” . ह्यासाठी पीबींच्या व्यवस्थापन कौशल्याचा कस दिसून आला. त्यांनी घालून दिलेली शिस्त उपयोगी पडलेली दिसत आहे. – विद्यार्थीदशेत असतानाच त्यांचा संपर्क सत्यवादी पर्यायाने बाळासाहेब पाटलांशी आला . विद्यार्थी पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केलेल्या पीबीनी पुढे सत्यवादी चे संपादक पद मोठ्या कौशल्यानं सांभाळलं. त्यावेळी सत्यवादी हे कोल्हापुरातिल अग्रगण्य दैनिक होतं आणि पीबींच्या हाताखाली पत्रकारिता केलेली कितीतरी मंडळी आज मोठमोठ्या दैनिकावर संपादक म्हणून काम करत आहेत .आज ते आवर्जून पीबींच्या नावाचा आपले गुरू म्हणून, आपण त्यांच्याकडे केलेल्या कामाचा उल्लेख अभिमानपूर्वक करतात.
– रक्तातच अभिनयाच्या असलेल्या आवाडीने त्यांना शेवटपर्यंत स्वस्थ बसू दिले नाही . मराठा बँकेचे चेअरमन पदी असतानासुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांची संमेलनं भरवणे ,नाटक बसवणे,दिग्दर्शित करणे आणि त्यामध्ये स्वतः भूमिका करणे , अशा विविध पद्धतीने आपला व्यासंग सांभाळला .
– मनुष्य जन्मात सर्वात मोठा आजार कोणता असेल तर वृद्धापकाळ पण परिस्थितीने पीबींना वृद्ध होऊच दिले नाही . मनुष्यजन्मामध्ये सर्वात मोठे कोणते दुख: असेल तर पुत्र वियोगाचे दुखः …. हे दुःख त्यांनी दोनदा अनुभवलं! आणि हे कमी म्हणून की काय परत त्यांच्या नातवाच्या वियोगाच दुःखही मिळाले . या सर्व परिस्थितीमध्ये एखादा सामान्य माणूस असता तर ढासळून गेला असता, कोलमडून पडला असता! पण हा धीरगंभीर आणि खंबीर माणूस शेवटपर्यंत परिस्थितीशी झुंजत राहिला . त्यांच्या मनातली दुर्दम्य जीजिवाशा त्यांच्या स्वभावाचा पोत ,त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य उद्धृत करते . खरं सांगायचं तर एक कृतकृत्य आयुष्य पीबी जगले अस म्हणता आलं असतं परंतु वृद्धापकाळामध्ये त्यांच्यावर दैवाने घातलेले आघात पाहता , ते कोणत्या मातीचे बनलेले आहेत? असा प्रश्न जाणकारांना त्यांच्या आप्तस्वकीयांना पडतो. नियतीच्या बुद्धिबळाच्या सारीपाटावरील चौसष्ट च्या चौसष्ट घरे त्यांना खेळायला लावली. आणि हा ढाण्या वाघ ती खेळत राहिला … न थकता न हारता !
– भूविकास बँकेच्या चेअरमन पदी काम करीत असताना दोन एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना विहीर काढण्यासाठी कर्ज मंजूर होत नव्हतं . कर्ज मिळाल्यानंतर वाढणारे उत्पादन आणि भरावा लागणारा हप्ता याचं गणित बसत नव्हतं. त्यामुळे सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना भूविकास बँकेच्या विहीर काढण्याच्या कर्जाचा लाभ घेता येत नव्हता.यावेळी त्यांनी धडाडीने दोन एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवता येतो फळबाग पीकवता येते आणि त्यातून मिळणारे उत्पन्न ऊस किंवा तत्सम नगदी पिकांच्या पेक्षा जास्त असू शकते अशा पद्धतीच्या युक्तिवाद मांडला आणि भूविकास बँकेच्या धोरणांमध्ये ती दुरुस्ती झाली व त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला. हा पीबींच्या कार्यकुशलतेचा एक उत्तम नमुना.
– मराठा बोर्डिंग च्या चेअरमन पदी पीबींनि बरीच वर्षे काम केले.खेड्यापाड्यातून येणाऱ्या कोणत्याही जातीपातीच्या आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी कधीही अडवलं नाही. अत्यंत कमी पैशांमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची सोय मराठी मराठा बोर्डिंगमध्ये केली जाते हा लौकिक त्यांनी शेवटपर्यंत सांभाळला. याचा लाभ घेतलेले कितीतरी विद्यार्थी पीबींची आजही आठवण काढतात.
– माझे चुलते म्हणून व्यक्तीश: माझे आणि पीबींचे संबंध हा एक आणखी मजेशीर विषय आहे . खरं तर आमच्या दोघांमध्ये मैत्रीचे नातं होतं . आम्हा दोघांना जोडणारा एक दुवा होता तो म्हणजे ‘वाचन ! ‘ पीबींचा वाचनाचा व्यासंग प्रचंड होता. अगदी लहानपणापासूनचा माझा अनुभव असा आहे की, कधीही भेटलं तर ते नेहमी प्रश्न विचारायचे, ‘ नवीन काय वाचालस? काय वाचतो आहेस ?अमुक वाचल आहेस का? तमुक का नाही वाचलं?’ ते कशाला वाचतोस असे कधीही ते म्हणाले नाहीत. माझ्या वाचन प्रेमाबद्दल त्यांना प्रचंड कौतुक होते .
– आमच्या पत्रकार मित्राचं तीन तेरा नावाचं आत्मचरित्र मी त्यांना आवर्जून वाचायला दिले तर त्यांनी त्याचा फोन नंबर मिळवून त्याच्याशी या विषयावर चर्चा केली, गप्पा मारल्या . असा हा गोष्टीवेल्हाळ माणूस ! तीन तेरा च्या निमित्तानं मला त्यांनी दोन पुस्तकं परत सुचवली, एक ‘जिहाद’.. कोल्हापूरच्या एका मुस्लिम सत्यशोधक कार्यकर्त्याचे आत्मचरित्र आणि कोल्हापूर च्या एका मुस्लिम प्राध्यापक महिलेचे आत्मचरित्र ‘भोगले जे दुःख त्याला’ ही दोन पुस्तकं त्यांनी मला वाचायला सुचविली .मला ही पुस्तके मिळत नव्हती तर त्यांनी करवीर नगर वाचन मंदिरातून ती मिळवली आणि मला फोन करून सांगितलं पुस्तक आणली आहेत घेऊन जा . आणि लगेच वाच. तसेच आमचे मित्र ,हाडाचे शिक्षक अनिल शिनगारे यांनी ‘गोपाळांची पोर ‘ नावाचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केले होते, हे पुस्तक त्यांना वाचायला दिले . ते वाचल्यानंतर त्यांना अनिल शिनगारे यांचे कौतुक झाले. त्यांनी शिनगारे सरांना फोन केला आणि त्यानंतर ते मित्र होऊन गेले . मी हे पुस्तक अद्याप का वाचलं नाही? असा प्रश्न त्यांना नवीन पुस्तक बघितले की नेहमी पडायचा . उत्तर आयुष्यामध्ये अरुण साधूंच्या ‘मुखवटा ‘आणि डॉक्टर उत्तमराव पाटलांचं ‘क्रांतीपर्व’ ही दोन पुस्तके त्यांना खूपच आवडून गेली आणि दोन्ही पुस्तकं मी त्यांना सुचवली होती. याबद्दल त्यांना माझं भयंकर कौतुक होतं यांचा फोन आला की तासाभरात कधी संपायचा नाही. दैनंदिन कामाच्या व्यापात काही वेळा त्रास व्हायचा पण या माणसाचा व्यासंग, वाचनाची आवड, वक्तृत्वशैली हे विषय नेहमी आमच्यासाठी अभिमानास्पद होते. – जाता जाता शेवटचा एक प्रसंग सांगतो म्हणजे त्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीची वाचकांना कल्पना येईल . सदाशिवराव मंडलिक यांचा स्मृतिदिन, त्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी पीबी होते . प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना सदाशिवराव मंडलिक यांच्या एका स्वभाव वैशिष्ट्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला . मंडलिकांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्याने जेवण करूनच गेले पाहिजे असा मंडलिकांच्या शिरस्ता होता आणि तसा हुकूम ते सौभाग्यवती मंडलिकांना सोडायचे. परंतु घरात काही आहे नाही याचं भान मंडलिकांना कधी राहिले नाही. याचा अनुभव अनेक मंडलिकांच्या जवळच्या लोकांनी घेतला आहे. याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आणि व्यासपीठा सह दहा हजाराहून समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आलं! – एक वादळ आता शांत झालय,चौऱ्यांऐशी वर्षे धगधगणारा एक वन्हि निमालाय यावर विश्वास बसत नाही !!! – पद्मनाभ पोवार , वारणानगर, कोडोली

You may also like

Leave a Comment