Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

मोडीत निघालेल्या “मोडी”ची वाढतेय गोडी..!
– बाराव्या शकतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी 1960 नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत ऑनलाईन मोडी शिकण्याकडे आणि शिकवण्याकडे कल वाढल्याचेही दिसून येत आहे.
– महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंत ते या लिपीचे जनक होते. न मोडता, न थांबता अत्यंत जलद गतीने लफ्फेदारपणे झरझर लिहील्या जाणाऱ्या लिपीस मोडी असे म्हणतात. यादव काळापासून सुरू झालेला हा प्रवास शिवकाळात बहरला होता. या लिपीचा सर्रास वापर राजदरबाराबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनात 20 व्या शतकाच्या अखेरपर्यंत होत असे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळात 1960 पर्यंत तिचा समावेश शिक्षणात होता. परंतु, छपाईच्या दृष्टिने तिची मर्यादा लक्षात घेवून काळाच्या ओघात ही मोडी लिपी मोडीत निघाली. मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. आजही शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रे पाहिली तर बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच असल्याचे दिसून येते. आजही खासगी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालये, तहसिलदार कार्यालये, भूमीअभिलेख कार्यालये, नगरपालिका या ठिकाणी जुने दस्ताऐवज मोडी लिपीत आहेत. जन्म-मृत्यूची नोंद, जमिनींची कागदपत्रे यांचा समावेश यात आहे. अभिलेखागारातील या कागदपत्रांचे वाचन व्हावे, इतिहास संशोधनास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा उपक्रम हाती घेतला. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते याचा 3 डिसेंबर 2003 रोजी शुभारंभ झाला.
– पुराभिलेख विभागाचे अभिलेखपाल गणेश खोडके यांनी याबाबत माहिती दिली. राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने मोडीचे प्रशिक्षण देण्यात येत असते. 10 दिवसांच्या या प्रशिक्षणानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा होते. उत्तीर्ण होण्यासाठी कमीत-कमी 50 गुणांची आवश्यकता असून, उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही देण्यात येते. याबाबत कोल्हापूरमध्ये डिसेंबर 2019 मध्ये प्रशिक्षण घेण्यात आले. मर्यादित प्रवेश असतानाही या प्रशिक्षणासाठी मोठा प्रतिसाद मिळाला होता.
– पुणे येथील सी डॅकच्यावतीने ‘मोडी लिपी शिका’ हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. cdac.in/index.aspx?id=lu_modi_script या ॲपच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत पध्दतीने माहिती दिली आहे. कोल्हापुरातील आदित्य माने +917709262481 या मोडी लिपी प्रेमी विद्यार्थ्याने इयत्ता 8 वी पासून स्वत: मोडी लिपीची गोडी लावून घेतली. शिवाजी विद्यापीठामधील तसेच पुराभिलेख विभागाची मोडी लिपी प्रशिक्षण पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आदित्यने ऑनलाईन प्राथमिक मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग घेतला होता. त्याचबरोबर शासनाच्या विविध कार्यालयात आवश्यकतेनुसार कागदपत्रांच्या वाचनासाठीही जात असतो. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आदित्यने लिहीलेल्या ‘प्रशिक्षण मोडी लिपीचे’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले आहे. केवळ प्रशिक्षण देवून न थांबता आदित्यने वीर शिवा काशिद पुण्य दिनानिमित्त ऑनलाईन सुंदर मोडी लिपी हस्ताक्षर स्पर्धेचेही आयोजन केले आहे.
– मोडी अभ्यासक आणि लिप्यंतरकार कांचन फिरदोस कराई या ही आपल्या “तू नळी” अर्थात “यू ट्यूब” चॕनेलच्या माध्यमातून अत्यंत साध्या, सरळ, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत मोडीची माहिती देत आहेत. त्यांच्या या चॕनेलच्या माध्यमातूनच मला सी-डॕकच्या मोडी लिपी शिका या अॕपची माहिती मिळाली. https://youtu.be/NrUPX7mrmQ4 ज्यांना ही मोडी लिपी शिकायची आहे त्यांनी जरुर यातील लिंक आणि संपर्क क्रमांकाचा उपयोग करावा. लॉकडाऊनच्या काळात यू ट्युबच्या माध्यमातून अनेकजणांनी आपले छंद जोपासण्याचा विविध प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मोडी शिकणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मोडीत निघालेल्या मोडीची पुन्हा एकदा गोडी निर्माण झाली आहे हे यावरून दिसून येते.
– प्रशांत सातपुते – जिल्हा माहिती अधिकारी,कोल्हापूर

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.