कोरोनाच्या संकटकाळी केखले प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिके विना
– कोडोली( प्रतिनिधी) केखले ता. पन्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने अनेक रुग्णांना याचा नाहक त्रास होत आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशा संकटावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी रुग्णांच्या कडून संताप व्यक्त होत आहे.
– पन्हाळा तालुक्यातील केखले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहा उपकेंद्र अंतर्गत चौदा गावे येत असून ६७७३० इतकी लोकसंख्या आहे .या ठिकाणी दिवसाकाठी १२५ ते १५० रुग्ण तपासणीकरिता येत असतात. याबरोबरच विविध आजारांवरील उपचारासाठी अनेक रुग्ण या ठिकाणी ऍडमिट होतात. तसेच डिलिव्हरीसाठी ही अनेक रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात. अशावेळी एखाद्या रुग्णाची परिस्थिती नाजूक झाल्यास त्या रुग्णास इतरत्र हलविण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र या ठिकाणी वारंवार दिसत आहे.
– तथापि प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य केंद्राकडून २००३ मॉडेल असणारी MH09 AG 26 ही रुग्णवाहिका २०१२ साली देण्यात आली पण सदर रुग्णवाहिका 2013 झाली निर्लेखन केलीली आहे. शासनाच्या नियमानुसार निर्लेखन केलेली गाडी वापरता येत नाही असे असून देखील ती तशीच रुग्णांनाकरिता वापरून प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत आहे. निर्लेखन केलेल्या या गाडीचा दरवर्षी देखभाल दुरुस्तीचा खर्च ६० ते ७० हजार इतका होत आहे. सदर केंद्रास नवीन रुग्णवाहिका मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे वारंवार मागणी केली आहे. पण अद्याप रुग्णवाहिका उपलब्ध झालेली नाही.
— रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास आंदोलन छेडणार- डॉ. प्रताप पाटील
– केखले प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण येत असतात तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते याची दखल घेऊन केखले प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अन्यथा आपणास आंदोलन छेडावे लागेल असा इशारा वारणा बँकेचे संचालक व पोखले गावचे युवा नेते डॉ. प्रताप पाटील यांनी दिला.
130