कोल्हापूर

कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावर करू कोरोनावर मात

by संपादक

कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावर करू कोरोनावर मात
– कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावरच कोरोनावर मात करून कोरोनाचे संकट लवकरच दूर करू, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. गेल्या साडेपाच महिन्याच्या कालावधीत पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने उपस्थित राहून कोरोनाच्या नियंत्रणाबाबत आणि संभाव्य महापुराबाबत उपाययोजना करत आहेत. याविषयी जाणून घेवू.
– कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही अत्यंत चांगले आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कोल्हापुरी-जगात भारी ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना स्वत:हून कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.
– प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान-
– कोरोना रुग्णावरील प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. आजअखेर 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे.
– 7 हजार 332 बेडची उपलब्धता-
– जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी
– 8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सीजन या सुविधा उपलब्ध आहेत. सीपीआरसह समर्पित कोरोना हॉस्पीटल आणि समर्पित कोरोना मदत केंद्र यांना एकूण 12 एक्सरे मशिन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात दररोज होणारी 2 हजार स्वॅब नमुने तपासणी क्षमता आता 5 हजार पर्यंत करण्यात येत आहे. प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सी.पी.आर. मध्ये 20 किलो लिटर ऑक्सीजन टँक बसविण्यात येणार असून जम्बो सिलेंडर व लिक्वीड ऑक्सीजन प्राधान्याने उपलब्ध केले आहे. सर्व कोरोना काळजी केंद्रे आणि समर्पित कोरोना मदत केंद्राला एकूण 700 आणखी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 14, दुसऱ्या टप्प्यात 24 कोव्हिड काळजी केंद्रे, समर्पित कोरोना सेवा केंद्र 15, समर्पित कोरोना हॉस्पीटल 4 कार्यान्वित करण्यात आली आहेत. एकूण 7 हजार 332 बेडची उपलब्धता असून यामध्ये 808 ऑक्सिजन बेड व 288 आयसीयू बेड आहेत.
– खासगी रूग्णालयांच्या बिलासाठी लेखा परिक्षकांची नियुक्ती-
– रुग्णांना हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडची माहिती कळावी तसेच बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत. दिवसाला सरासरी 400 ते 500 फोन स्वीकारण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पीटलमध्ये शासकीय दराने बील आकारणी व्हावी तसेच उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी एका शासकीय कर्मचाऱ्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीसाठी लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हॉस्पीटलांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.
– गृह विलगीकरणाचा वडणगे पॅटर्न-
– कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेवून हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी केला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितपणे कमी झालेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजअखेर जिह्यात 3 हजारहून अधिक कोरोना बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून त्यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिझीटल थर्मामीटर, मास्क इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक आता बरे झाले आहेत.
– कोल्हापूरकरांची साथ दातृत्वाचा हात
– कोरोनाच्या या संकट काळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंड याला मदत करुन दातृत्वाची परंपरा जपली आहे. रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर तर्फे 62 लाख रुपये खर्चून 538 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी 120 बेड्स च्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. या ठिकाणी क्रिडाई कोल्हापूर तर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच शिरोली येथील जैन मंदिरामध्ये जैन समाजातर्फे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. कसबा बावडा, राजोपाध्येनगर, फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजक व औद्योगिक संघटना यांनी 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले असून त्यापैकी 3 व्हेंटीलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत.
– घाटगे ग्रुपने शववाहिका उपलब्ध करुन दिली आहे. व्हाईट आर्मी संस्थेने कोवीडच्या काळात लाखो गरजूंना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने यांनी सुध्दा आपल्या कडील सुविधा कोरोना केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. होर्डिंग ॲण्ड आऊट सोर्सींग ॲडव्हर्टायझर्स असोसिएशनच्या माध्यमातून 2 हजार प्रबोधनाचे फलक लावण्यात आले आहेत.
– उत्तम नियोजनाने अतिवृष्टीवर मात-
– ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात अतिवृष्टिमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतूनही जिल्ह्याला सावरता आले. यापुढे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे नियोजन सुध्दा केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.
– पूर परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफच्या 4 पथकांसह स्वयंसेवी संस्थांची पथकेही तैनात आहेत. यात जवळपास 808 स्वयंसेवक आहेत. 51 रबर बोट, 700 लाईफ जॅकेट, 400 लाईफ रींग, 18 आस्का लाईट उपलब्ध आहेत. पुढारी रिलिफ फौंडेशनतर्फे दोन यांत्रिकी बोटी महापालिकेला नुकत्याच प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही पाच यांत्रिकी बोटी जिल्हा प्रशासनाला प्रदान करण्यात आल्या आहेत.
– गणेशोत्सव साजरा करताना सोशल डिस्टंसिंगसह स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दान सारखे उपक्रम राबवावेत. मोहरमच्या उत्सवात सुध्दा सर्वांनी आपली काळजी घ्यायला हवी.
-श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील – गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर – (शब्दांकन: प्रशांत सातपुते, – जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर)

You may also like

Leave a Comment