अतिवृष्टीमुळे पन्हाळागड व गडाच्या पायथ्याशी गावांचे व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – पालकमंत्री सतेज पाटील

by Admin

अतिवृष्टीमुळे पन्हाळागड व गडाच्या पायथ्याशी गावांचे व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – पालकमंत्री सतेज पाटील
– पन्हाळा (प्रतिनिधी)अतिवृष्टीमुळे पन्हाळागड व गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांचे व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. या गावांच्या सुरक्षेच्या दृष्टिने कायस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी सर्वसमावेश आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिल्या. पन्हाळगड व परिसरातील गावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. तद्नंतर पन्हाळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस नगराध्यक्ष रुपाली धडेल, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, कार्यकारी अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता एस. व्ही. काटकर, गट विकास अधिकारी तुलसीदास शिंदे, पोलीस निरीक्षक ए.डी.फडतरे, दिनकर भोपळे, चैतन्य भोसले, रणजित शिंदे आदी उपस्थित होते.
– पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ज्या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त भागाची तीन टप्यात वर्गवारी करा. यामध्ये नुकसानग्रस्त कुटुंबांचे प्रस्तावांना प्राधान्य द्यावे. पन्हाळगडासह पायथ्याशी असलेल्या गावांचा सुरक्षेच्या दृष्टीने कायम स्वरूपी उपाय योजना करणे महत्वाचे आहे.भूस्खलन होऊन रस्ते बंद होऊ नयेत, यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना करणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्व विभाग आणि वन विभागाकडून आवश्यक असणारे परवाने व तांत्रिक बाबींची पुर्तता करुन सर्वसामावेशक असा आराखडा तयार करावा. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. या आराखड्यास शासनस्तरावर मान्यतेसाठी पाठपुरावा केला जाईल.
– तालुका कृषी अधिकारी रामचंद्र धायगुडे यांनी पन्हाळागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांच्या शिवारातील सुमारे शंभर ते सव्वाशे हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती बैठकीत सादर केली असता, पालकमंत्री पाटील म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, पाईपलाईन, ठिबक सिंचन योजना वाहून गेले त्याचे प्रत्यक्ष पाहणी करावी, ओढ्याला आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली अथवा कोलमडून पडली आणि ज्यांच्या शेतात माती व दगड धोंडे येऊन पडले आहेत याचे पंचनामे करुन स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करावे. तसेच या पुरामुळे ओढ्या लगतच्या विहिरी ढासळलेल्या आहेत, त्यामुळे झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करावेत. पोल्ट्री व घरांची आणि गोठ्यांची पडझड तसेच जनावरे जीवितहानी बाबत पंचनामा करुन नुकसानग्रस्त कुटुंबांना योग्य मदत द्यावी, असे पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.
– बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील यांनी पन्हाळा तालुक्यातील कोरोना रुग्ण, उपाय योजना याचा आढावा घेतला. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे ही चिंतेची बाब असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करावे. सार्वत्रिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करावा. लक्षणे दिसता नागरीकांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. कोरोना रुग्णांना त्वरीत उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने कोव्हिड सेंटरवर सुविधा द्याव्यात. यासाठी आवश्यक असणारी मदत शासनस्तरावरुन उपलब्ध करुन दिली जाईल.
– तत्पुर्वी पालकमंत्री पाटील यांनी बुधावर पेठ पन्हाळा येथील तीन दरवाजा येथे पावसाने उखडलेल्या रस्त्याची, रेडेघाट जंगलातून ढग फुटी दृश्य पाऊसने खचलेल्या भागाची, सिकंदर मुजावर यांच्या घराची तसेच साधोबा तलावाची पाहणी पहाणी केली.

You may also like

Leave a Comment