कोल्हापूर

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ : जिल्ह्यात राबविणार प्रभावी मोहीम

by संपादक

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ : जिल्ह्यात राबविणार प्रभावी मोहीम
– कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोनवेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य शिक्षण, संशयित कोविड रूग्ण शोधणे तसेच सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती शोधून काढणे ‘स्वस्थ महाराष्ट्रासाठी’ लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य मोहीम म्हणजे ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ते २४ ऑक्टोबर अशा दोन फेऱ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

– या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचे गृहभेटीव्दारे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी करण्यात येणार आहे. तीव्र श्वसनाचे आजार सारी आणि फ्ल्यूसदृश्य आजार ईली याचे सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणात रूग्ण आढळल्यास त्याची कोविड चाचणी करून त्याच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत. सहव्याधी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन, उपचार सुरू नसल्यास मोफत उपचारांसाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. कुटूंबात प्रत्येकास व्यक्तीगत संवादाव्दारे कोविड प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षणही देण्यात येणार आहे. ही या मोहिमेची प्रामुख्याने उद्दिष्ट्ये आहेत.

– जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील घरांना भेट देण्यात येईल. आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले 2 स्वयंसेवक (आरोग्यदूत) यांचे पथक बनवण्यात येणार असून प्रत्येक 5 ते 10 पथकांमागे 1 वैद्यकीय अधिकारी नेमण्यात येईल. आरोग्य पथक पहिल्या फेरीत 50 घरांना भेटी देईल आणि दुसऱ्या फेरीत 75 घरांना भेटी देईल. भेटी दरम्यान ताप, ऑक्सिजनचे प्रमाण, खोकला आणि इतर लक्षणे असणारे सहव्याधी रूग्ण आढळल्यास त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संदर्भित करेल. वैद्यकीय अधिकारी रूग्णास तपासून आवश्यतेनुसार तेथेच उपचार करतील किंवा फिवर क्लिनीक / कोविड -19 रूग्णालयास संदर्भित करतील. आरोग्य पथक घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या कोविड स्थितीनुसार आरोग्य शिक्षण देईल.

– पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामधील मोहिमेचे आयोजन होणार आहे. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, ग्रामीण भागात सरपंच आणि आमदार यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. त्यांच्या सल्ल्याने कार्यक्षेत्रातील मोहिमेचे नियोजन व उद्घाटन होईल. शक्य असेल तिथे सीएसआर व स्थानिक निधीमधून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते मोफत मास्क व साबणाचे वाटप होईल. शहरातील, गावातील सर्व धर्माचे धर्मगुरू आणि भागातील प्रभावशाली व्यक्ती यांच्या बैठका घेतल्या जातील आणि त्यांना या सर्वेक्षणात सहभागी होण्याची विनंती केली जाईल.

– बक्षिस योजना :-

– या मोहिमेसाठी विद्यार्थी, पालक, सामान्य नागरिक यांच्यासाठी कोविड -19 बाबत सर्वोत्तम निबंध, पोस्टर, संदेश, लघुचित्रपट यासाठी बक्षिस योजना असणार आहे. सर्वोत्तम स्पर्धकाला बक्षिस आणि ढाल देण्यात येईल आणि त्याच्या कलाकृतीस प्रसिध्दी देण्यात येईल.

– प्रत्येक शहर, ग्रामपंचायतीला मिळालेल्या गुणानुसार हिरवे (75 टक्के +), पिवळे (41 -74 टक्के) आणि लाल (41 टक्केपेक्षा कमी) कार्ड देण्यात येईल. हिरवे कार्ड मिळालेल्या गावामधून आमदार मतदारसंघ, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रत्येकी 3 शहरे, ग्रामपंचायती निवडल्या जातील.

– प्रशांत सातपुते
– जिल्हा माहिती अधिकारी,कोल्हापूर

You may also like

Leave a Comment