Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

पर्यटकांना खुणावतंय रंगीबेरंगी रानफुलांनी बहरले मसाई पठार
– छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेकडील पौराणिक महात्म्य लाभलेल्या व महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेबललॅंड असलेल्या मसाई पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण सुरु आहे.गेली सहा सात महिने लॉकडाऊनला कंटाळलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी सर्वात जवळचे असलेले हे मसाई पठार. निसर्ग निर्मित नवरंगांचा उत्सव पहाण्यास हौसी पर्यटकांना खुणावत आहे. – पाचगणीच्या टेबललॅंड पेक्षाही मोठे असलेल्या नजरेच्या कवेतही न मावणाऱ्या सुमारे ९१३ एकरावर पसरलेल्या निसर्गनिर्मित विस्तीर्ण अशा मसाई देवीच्या नावाने प्रसिद्दीपावलेल्या मसाई पठाराने हिरवा शालू परिधान केला आहे.मसाई पठारावरील डोंगरदऱ्या मध्ये विविध जातीची रंगांची आकाराची छोटी छोटी रंगीबेरंगी रानफुले फुलली आहेत.आजूबाजूच्या खोल दऱ्यात उतरणारे ढग,क्षणात निरभ्र होणारे आकाश व कड्यावरून कोसळत असलेले शुभ्रफेसाळणारे छोटे छोटे धबधबे, अंगाला झोंबणारे गारवारे,अधून मधून कोसळणारा पाऊस निसर्ग निर्मित हिरव्यागार मऊमखमली गालीच्यावर सर्वदूर पसरलेले विविध रंगांच्या रानफुलांचे ताटवे अशी ही मसाई पठारावरील निसर्गाची विविधरूपे मनाला भुरळ पडतात. – सध्या मसाई पठारावर रानफुलांचा हंगाम सुरु असून विविध रंगी फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. हिरव्यागवताच्या गालीच्यावर फुललेली निलवंती (सायनोटीस), सोनकी(सेनिसिओ), केना(कॅमेलीना), कापरु (बिओनिया),रानतेरडा,सीतेचीआसवे(युट्रीक्यूलेरीया),सफेदगेंद(इरीओकोलाँस),सफेदमुसळी(क्लोरोफायटंम),मंजिरी(पोगोस्टीमोनडेक्कननेन्सीस),रानकोथंबीर,रानहळद,नीलिमा(अॅनिलीमा),जंगलीसुरण(सापकांदा),पेनवा,कंदिलफुल(सिरोपेनिया),दिपकाडी(डीपकॅडी),तेरेसा,यामध्येअतिदुर्मिळ असणाऱ्या देखण्या विविध रंगामुळे व आपल्या वैशिष्ठपूर्ण आकारामुळे पटकन दृष्टीसपडणाऱ्या कंदिलफुलांच्या तीन प्रजाती या पठारावर आढळतात.तर अग्निशिका हे नाव सार्थ ठरवणारी कळलावीची पिवळसर लालभडक फुले आणि लहान सुर्यफुलांसारखी दिसणारी सोनकीची गर्दपिवळी फुले तर काही ठिकाणी पिंडावनस्पतींच्या पांढऱ्याफुलांचे ताटवे मनप्रसन्न करतात.त्याबरोबरच या सर्वफुलांच्या बरोबरीने आपले एकटेपण दाखवत व समूहाने वाढणाऱ्या अनेक वनस्पती या पठारावर मुबलक प्रमाणात आढळतात.यामध्ये सफेद मुसळी,पिवळ्याफुलांची काळीमुसळी (कुरकीलॅगो),पांढऱ्याफुलांची दीपकाडी, निळीचीराईत आणि आपल्या विचित्र आकाराने सर्वाचे लक्ष वेधणारे भुईआमरी (ग्राउंडऑर्कीड)चे सहा ते सात प्रकार मसाई पठाराच्या जांभ्याखडकावर पहावयास मिळतात. औषधीगुणधर्म सांगणाऱ्या रानकोथंबीर,रानहळद,रानआले यासोबत आकर्षक फुलांनी बहरलेली निळ्यारंगाची भारंगीची झुडपे आढळून येतात स्मिथीयाच्या फुलांच्या नऊ प्रजाती पैकी चार ते पाच प्रजाती मसाई पठारावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात स्मिथीयाची फुले पिवळ्या रंगाची असून मोठ्या पाकळीवरील दोन लालभडक ठिपक्यामुळे या फुलांना मिकीमाऊसची फुले म्हणून ओळखतात. मसाई पठाराच्या सौदर्यात भरघालणारी वनविभाच्या वतीने खोदलेली व निसर्गनिर्मित लहान मोठी वीस ते बावीस वनतळी असून या तळयाच्या काठी विविध प्रकारचे कीटक व पक्षी मुक्त विहार करताना दिसून येतात तसेच या पाणथळ परिसरात सफेदगेंदाच्या सूक्ष्म लहानफुलांना चेंडू सारख्या गोलाकार मंजिरी येतात यामध्ये गोलगेंद, तारागेंद, पानगेंद अश्या दहा प्रजाती आढळतात तसेच या पठारावर पांडवांनी वास्तव्य केल्याच्या खुणा पांडवलेण्याच्या रुपात आजही आपल्या पौराणिक महात्म्याची साक्ष देतात.तर अलीकडेच जिऊर ग्रामपंचायत,वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती जिऊर मार्फत व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क या आधुनिक जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्राची सुरवात झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कमध्ये. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याच्या झिपलाईन बरोबरच प्रामुख्याने क्लांमींग वॉल, रॉक क्लामींग ॲन्ड रॅपलींग,हाय रोप कोडस, झॉरबिंग बॉल, बंजीइजेक्शन, स्लॅक लाईन,पॅरासिलींग,साहसी खेळांतील थराराच अनुभव देणारे स्लीक लाईन,पठारावर पॅराशुट अशा वेगवेगळया ९ पर्यावरणपूरक नाविण्यपूर्ण घटकांचा समावेश आहे.यामुळे पठारावर येणाऱ्या पर्यटकाला निसर्गाच्या सानिध्यात साहसी खेळांचा अनुभव घेता येणार आहे. – अल्पावधीत प्रती कासपठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसाई पठारावरील या निसर्गाच्या आविष्काराचा मनमुराद आस्वाद घेणेसाठी पर्यटकांनी कोल्हापूर पासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसाई पठाराला आवर्जून भेट द्यावी.
– राजेंद्र दळवी (पन्हाळा)


Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.