कोल्हापूर

कलाकुसरीची कल्पना उतरवणारी चित्रकार डॉ. अल्पना

by संपादक

कलाकुसरीची कल्पना उतरवणारी चित्रकार डॉ. अल्पना
– ‘ती’ वैद्यकीय क्षेत्रात व्यस्त असूनही आपल्या भन्नाट कल्पनांना विविध माध्यमातून वाट मोकळी करुन देते. कधी विविध रंगांची उधळण करत तर कधी पावडर शेडींगमधून हुबेहूब व्यक्तीचित्र साकारते. कॅनव्हॉसवर ॲक्रेलिक रंगांमधून, जलरंगांमधून निसर्गचित्र काढते. कागदाच्या लगद्यांमधून साक्षात पांडुरंगांला आकार देते. मातीच्या भाड्यांना रंगछटांमधून सजीवपणा आणते. विणकाम, नक्षीकाम, कलाकुसरीने कापडी पिशव्यांची नजाकत वाढवते. किचनगार्डनमध्ये वेस्टपासून बेस्ट बनवत बगीचा फुलवते. विविध कल्पना उतरवणारी ‘ती’ चित्रकार डॉ. अल्पना चौगुले होय.
– डॉ. सोपान आणि डॉ. अल्पना चौगुले यांचे शाहूपुरी ५ व्या गल्लीत चौगुले रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या वर असणाऱ्या छोट्याशा घरात प्रवेश करतानाच आतमधील कलाकारांची जाणीव होते. डॉ. अल्पना या मूळच्या सातारच्या. कन्या शाळेत असताना चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या परंतु, प्रत्यक्षात मुलगा दहावीला गेल्यानंतर त्यांनी तसे पहिले चित्र रेखाटले. पावडर शेडींगमधील त्यांनी काढलेले सासऱ्यांचे हुबेहूब चित्र पाहून मुलांने आणि नंतर पती या दोघांनी खूप कौतुक केले शिवाय चित्र काढण्यासाठी प्रोत्साहित केले. २००५ नंतर त्यांचा चित्रकलेचा प्रवास सुरु झाला.
– संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, बाबा आमटे, साधनाताई, चित्रपट अभिनेते निळू फुले, तेजस्वीनी सावंत, वकील उज्वल निकम अशी एकाहून एक व्यक्तीचित्र त्या काढत गेल्या.
– शिवराज्याभिषेक सोहळ्याचे त्यांनी काढलेल्या चित्रासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा, डॉ. अमोल कोल्हे यांची मालिका, इतिहासकारांची पुस्तके मार्गदर्शन म्हणून वापरली आहेत. जलरंगातील या चित्रात विविध जाती-धर्मातील मावळे, औक्षण करणाऱ्या महिला यांचा समावेश आहे. या ऐतिहासिक चित्रात सोनेरी तसेच पांढरा रंग कुठेही वापरण्यात आला नाही. या चित्रासाठी डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी विशेष गौरव करणारे पत्र दिल्याचे डॉ. अल्पना चौगुले यांनी सांगितले. या चित्राची प्रतिमा पती डॉ. सोपान हे मोफत वाटप करतात.
– आज अखेर ३०० हून अधिक विविध विषयांवर चित्र काढली असून येथील शाहू स्मारक, सातारा, इचलकरंजी या ठिकाणी प्रदर्शन भरविल्याचे त्यांनी सांगितले. चित्रकार मोहनराव वडणगेकर यांनी या कलेसाठी विशेषत: पावडर शेडींगमधील कलेबाबत मार्गदर्शन केले.
– कागदी लगद्यापासून भक्तांचा विठूराया त्यांनी साकारला आहे. याच कागदली लगद्यांचा वापर करत त्यांनी मातीच्या भांड्यांवर कलाकुसर साधली आहे. एमसिलपासून शरीरातील अवयवांचे मॉडेलही बनवले आहेत. रिकाम्या काचेच्या फिश टँकमध्ये ग्रामीण, शहरी प्रदेश निर्माण केला आहे. किचन गार्डनमध्ये सलायन, नारळाच्या करवंट्यांच्या कलाकुसरीतून कुंडीत विविध रोपं लावली आहेत. बोन्सायही त्या बनवतात.
– अशा या हरहुन्नरी कलाकार डॉ. अल्पना यांचे पती डॉ. सोपान हेदेखील कलाकार आहेत. ७० ते ७५ विविध प्रकारचे आवाज ते अगदी सहजगत्या काढतात. यात पक्षी, प्राणी, वाद्य विशेषत: हलगी, घुमके यांचा आवाज ही त्यांची विशेष खासियत आहे. नेहमी व्यस्त असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात राहूनही या दाम्पत्यांने आपली कला जोपासली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या प्रशिक्षणासाठी ते व्याख्यान देतात. शिवाय आपल्या कलाकारीने त्यांची वाहवाही मिळवतात.
-प्रशांत सातपुते -जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर



You may also like

Leave a Comment