कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट संपविणे ही आपलीच जबाबदारी
– देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. गेल्यावर्षी कोरोना ची पहिली लाट येऊन गेली. त्यादरम्यान अनलॉक करून ‘मिशन बिगीन अंतर्गत’ काही निर्बंध शिथिल केले गेले. पण या शिथिल केलेल्या निर्बंधानंतर लोक बेजबाबदारपणे हलगर्जीपणाने वागले आणि त्याचीच परिणीती कोरोना च्या दुसऱ्या लाटेमध्ये झालेली दिसून आली. दुसरी लाट आधीपेक्षा भयंकर असल्याचे दिसून आलेले आहे.
– महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यात एकूण रुग्णांपैकी ६७.१६ सोळा टक्के रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात उच्चांकी नवे दोन लाख १७ हजार ३५३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. (१६ एप्रिल २०२१ च्या आकडेवारीनुसार) महाराष्ट्रात ३९.६ टक्के रुग्ण आहेत.
– सध्या महाराष्ट्रात मिशन ‘ब्रेक द चेन’ सुरू आहे. त्यासाठीच दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. हे पंधरा दिवस कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्या जनतेच्या हितासाठीच तर प्रशासनाने ही संचारबंदी लागू केलेली आहे. तरीदेखील हे नियम म्हणजे लोकांना आपल्यावर लादलेली बंधने आहेत असे वाटत आहे. मात्र हे निर्बंध आपले कर्तव्य समजून नागरिकाकडून या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ करिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वयंशिस्त राखणे आवश्यक आहे. आजवर आपण ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यानुसार आपले कुटुंब व आपण स्वतः सुरक्षित कसे राहू याचा विचार केला व त्याप्रमाणे वागलो. पण आतामात्र आपल्या देशाला भेडसावणाऱ्या समस्या जसे की बेडसची कमतरता, रुग्णांची वाढती संख्या, रेमिडेसमीवीर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, लसींचा कमी-अधिक होणारा पुरवठा या सर्व गोष्टींचा विचार करता आज प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाला या संकटातून वाचविण्यासाठी ‘माझा देश, माझी जबाबदारी’ यानुसार कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून वागणे आवश्यक आहे.
– दुसरी लाट थोपविण्यासाठी सामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी व कर्तव्ये काय असावीत
– १) मास्क चा वापर योग्य प्रकारे करावा.- मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. कारण कोरोना संक्रमणासाठी कारणीभूत विषाणू हा हवेच्या माध्यमातून फैलावत असल्याने आपण जेंव्हा जेंव्हा बाहेर पडणार आहोत तेंव्हा तेंव्हा मास्क परिधान करणे आवश्यक आहे. मास्क हा स्वतःच्या संरक्षणासाठी तर आहेच पण आपल्यामुळे इतरांनाही संसर्ग होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे.
-मास्क लावा पण तो चुकीच्या पद्धतीने लावू नका. दहा पैकी सात जणांच्या तोंडाला मास्क असतो पण त्यातील केवळ दोन ते तीन जणांनी तो योग्यप्रकारे घातलेला असतो. कुणी हनुवटीच्या खाली, कुणी नाकाच्या खाली, कुणी केवळ तोंडावर तर कोणी पर्स किंवा खिशात ठेवलेला असतो व समोर पोलिस किंवा प्रशासकीय अधिकारी दिसले तर तो घाईघाईने लावला जातो असे बेजबाबदारपणे वागू नका. मास्क हा संपूर्ण नाक, तोंड ,हनुवटी असा संपूर्ण भाग झाकला जाईल अशा पद्धतीने लावावा.
– एकदा वापरलेला मास्क डिस्पोजेबल असेल तर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. पण कापडी मास्क वापरत असाल तर एकदा वापरलेला मास्क घरी आल्यावर लगेच गरम पाण्याने , साबणाने स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून मगच पुढच्यावेळी वापरा. तोच वापरलेल्या मास्क खुंटीला टांगून ठेवून सतत वापरू नका.
– सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे स्वाभाविकच आहे. चेहऱ्यावर लावलेला मास्क जर घामाने ओला झाला असेल तर तो मास्क काढून दुसरा मास्क वापरा. ओल्या मास्क मुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
– लस घेतल्यानंतरही मास्क लावा व इतरांनाही तो लावण्यास सांगा.
– २) आवश्यकता असल्यासच घरातून बाहेर पडा.
– अगदी संचारबंदी सुरू असतानादेखील विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही आहे. कोठेही बाहेर जायचे झालेस ती गोष्ट किंवा ते काम अत्यावश्यक आहे का? याचा आधी विचार करावा, मगच घराबाहेर पडावे विनाकारण फिरू नये.
– ३) सामाजिक अंतर ठेवा
– दुकाने, बॅंका, भाजीमंडई, दवाखाने, लसीकरण केंद्रे अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तींमध्ये दोन हातांचे अंतर ठेवूनच उभारावे व इतरांनाही सामाजिक अंतर पाळावयास सांगावे.
– ४) सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती टाळावी
– विनाकारण गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये. वाढदिवस, लग्न, गेट-टुगेदर यासारखे सर्वच कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचे प्रशासनाने नियम सांगितलेले आहेत. कारण लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमातील वाढत्या गर्दीमुळेच कोरोनाचे संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलेले आहे. आपल्याला एखाद्याच्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी व्हायचे असेल तर आपण त्यांना फोनद्वारे शुभेच्छा देऊ शकता किंवा व्हिडिओकॉल करूनही त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
– ५) नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी काय करावे?
– नोकरी-व्यवसायानिमित्त आपणास सार्वजनिक वाहनातून प्रवास करावा लागत असेल तर प्रवासातही योग्य ती काळजी घ्यावी. सामाजिक अंतर ठेवावे. पॉकेट सॅनिटायझरचा वापर हात वारंवार स्वच्छ करण्यासाठी करावा. मास्क वापरावा. कामाच्या ठिकाणी एकमेकांचे जेवण शेअर करू नये. ऑफिसमधून घरी आल्यानंतर बॅग बाहेर ठेवावी ती सॅनिटाइझ करून मगच आत घ्यावी. त्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करावी. कपडे गरम पाण्यात भिजत ठेवावेत. स्वच्छ धुऊन, वाळवून मगच पुढील वापरासाठी घ्यावेत. कारण दिवसभर बाहेर असताना पण कितीतरी लोकांच्या संपर्कात आलेलो असतो. त्यामुळे तेच तेच कपडे न धुता घालू नयेत. घरातील वृद्ध, गरोदर स्त्रिया व लहान मुले यांना आपल्यामुळे संसर्ग होणार नाही यासाठी ही काळजी घेणे आवश्यक आहे.
– ६) लस घ्या पण गर्दी टाळा.
– लसीकरण करणे हे आवश्यक आहेच मात्र लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर गेल्यावर सामाजिक अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. उगाचच संपेल, लसीचा तुटवडा होईल या भीतीने लोक घाईगडबड व गर्दी करताना दिसत आहेत. गर्दीमुळे ही संसर्ग होऊ शकतो. तेंव्हा गर्दी टाळावी.
– ७) लक्षणे दिसल्यास टेस्ट करा, विलगीकरण करा.
– कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसल्यास स्वतः चे विलगीकरण करा. शिवाय टेस्ट करून घेण्यास विसरू नका. लवकरात लवकर टेस्ट केल्यास कमीत कमी लोकांनाआपला संसर्ग होऊ शकतो शिवाय लवकरात लवकर निदान झालेने व्याधीतून बरे होता येईल.
– या सर्व नियमांचे एक जबाबदार, कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपण सर्वांनी तंतोतंत पालन केले तर देशावरील तसेच आपल्या महाराष्ट्रावर आलेले दुसऱ्या लाटेचे संकट निश्चितच दूर होईल यात शंका नाही.
- डॉ. सुलेखा शिवराज साळुंखे आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कोडोली
170
previous post