मजेदार, मनोरंजक बालकादंबरी-“सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल” – “सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल” ही बाल कुमार कादंबरी वाचून झाली. आपली मुलं सहलीसाठी शेत शिवारात रानावनात जात असतात व सहलीचा आनंद लुटत असतात. ह्याच धर्तीवर लेखकाने जंगलातील प्राण्यांना आपल्या मानवांच्या सिमेंटच्या जंगलात आणले आणि त्यांची सहल घडवून आणली व छानपणे साजरी केली. ह्यामध्ये लेखकांनी आपली कल्पकता अतिशय सुंदरपणे वापरली आहे आणि ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. – मानवाने अमाप जंगल तोड केली आहे, त्यामुळे पूर्वी सारखे दाट झाडी असलेली जंगले आता राहिले नाहीत. त्यामुळे प्राण्यांना लपून राहण्यासाठी, जगन्यासाठी जंगलांमध्ये सुरक्षित जागाच राहिली नाही । तसेच त्यांच्या जंगल निवासावरतीही बुलडोझर फिरवून मानवाने तेथे त्यांची स्वतःची सिमेंटची जंगले निर्माण केली आहेत. त्यामुळे आज काल जंगली प्राणी सुद्धा मानवाच्या शेतशिवारात, सिमेंटच्या जंगलांमध्ये फेरफटका मारू लागले आहेत। त्यातूनच मानव व प्राणी ह्यांच्यातील संघर्ष वाढला आहे. – ह्या बाल कादंबरीमध्ये लेखकांनी प्राण्यांमधील प्राण्यांना जी स्त्री पुरुषांची नावे दिली आहेत ती खरोखरच छान व मजेशीर आहेत। ह्या बालकादंबरीत लेखकांनी, जंगली प्राण्यांनी मानवी वस्तीत येऊन जी मजा केली आहे, त्यातून जे मजेदार प्रसंग घडलेले आहेत ते छान पणे रेखाटले आहेत। तसेच वानरांच्या पोरांची धमाल तर खूप मजेशीर वर्णिली आहे। सहल संपल्यानंतर सहलीचे प्राणी शिक्षक हे त्यांच्या प्राणी विद्यार्थ्यांना त्यांच्या सहली वर जो निबंध लिहायला सांगतात त्यातून लेखकांनी प्राण्यांच्या नजरेतून केलेले मानवी जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण खरोखरच प्रशंसनीय आहे। – ह्या बालकादंबरी मध्ये प्राण्यांच्या विविध सवयी, बहुविध लकबी, त्यांचे चित्र विचित्र स्वभाव सुंदरपणे रेखाटले आहेत। तसेच प्राण्यांचे चालणे, बोलणे, वागणे, आपसातील संबंध, संघर्ष, त्यांची बोलीभाषा, शारीरिक भाषा ह्या व्यवस्थितपणे वर्णिल्या आहेत. त्यांच्या चालण्या-बोलण्या-वागण्यातून, आपसात असलेल्या संबंधांमधून, एकमेकांसोबत होणाऱ्या देहबोली मधून निर्माण होणाऱ्या गमतीजमती सुद्धा ह्या बालकादंबरीत सूक्ष्म तेने साकारल्या आहेत. – टाळेबंदी च्या कालावधीमध्ये माणूस घरात बंद आणि प्राणी मात्र स्वतंत्र याचे विरोधाभासी चित्रण लेखकाने आपल्या कल्पकतेने ह्या बालकादंबरी मध्ये अतिशय अद्भुत रम्य असे चितारले आहे। विषेश म्हणजे बालवाचकांसाठी ते नाविन्यपूर्ण आहे। – माणसाने स्वतःच्या स्वार्थ लोभी आनंदासाठी जंगलातील प्राण्यांचा आनंद हिरावून घेतला आहे । त्याचे विपरीत परिणाम माणसाला भोगण्याची सुरुवात झाली आहे आणि भविष्यात यापेक्षाही जास्त दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत हा संदेश ह्या बालकादंबरी मधून लेखकाने सहजगत्या बाल कुमारांच्या मनावर बिंबवला आहे। खरेतर मानवाला डोळे उघडण्यासाठी हा एक अप्रत्यक्ष इशाराच आहे। – तसेच ह्या बालकादंबरी द्वारे लेखकाने बाल कुमारांना स्वच्छतेचा, प्रदूषण मुक्तीचा, स्वच्छतेचा, प्राण्यांची कदर करण्याचा धडा सुद्धा शिकवला आहे। अशीही सतत शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारी मजेदार,मनोरंजक, कळत नकळत सामाजिक शिकवण देणारी, उत्कृष्ट , दर्जेदार, वाचनीय व संग्राह्य बालकादंबरी सादर केल्या बद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व त्यांच्या भावी लिखाणासाठी त्यांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा देतो। – प्रा. देवबा शिवाजी पाटील, – गोविंद नगर,खामगाव. जिल्हा – बुलढाणा – मो.9420795307.
228
previous post